मुंबई : स्टँड-अप कॉमेडियन समय रैना यांच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोच्या अलीकडच्या एपिसोडमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मखीजा यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला आहे. या शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला अत्यंत अश्लील प्रश्न विचारला, ज्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या घटनेनंतर मुंबईतील वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मखीजा, समय रैना आणि शोच्या आयोजकांविरुद्ध 'अश्लील भाषा' वापरल्याबद्दल आणि 'अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याबद्दल' सोमवार, दि. १० फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणावरुन मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार अशोक सराफ यांनी 'मुंबई तरुण भारत' ला दिलेल्या प्रतिक्रियेत अश्लील विनोदावर विरोध दर्शवला. ते म्हणाले की,"विनोदाची व्याख्या ही प्रत्येक कलाकारासाठी वेगळी असते. जे कलाकार कंबरेखालचे विनोद करतात त्यांना अश्या विनोद निर्मितीत रस असतो. आपण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची ठळक प्रतिक्रिया देऊ शकत नाही. प्रत्येकाची विनोद करायची एक विशिष्ट पद्धत असते, त्याप्रमाणे ते विनोद करत असतात. पण असे जरी असले तरी या विनोदांना कॉमेडी म्हणता येत नाही."
पूर्वीच्या कलाकारांचे निखळ विनोद आणि आत्ताच्या कलाकारांचे उथळ विनोद यात बराच फरक जाणवतो यावर ते म्हणाले, "मी, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आम्ही कंबरेखालचे विनोद करायचे नेहमीच टाळले. आणि प्रकर्षाने असे विनोद कुठे अढळले तर आम्ही तो प्रसंग वगळून टाकायचो. कारण असे विनोद करून कोणीही हसवू शकतं आणि अश्या विनोदांचा एक विशिष्ठ वर्ग आहे. ज्यांचं अश्या विनोदांवर मनोरंजनही होतं. पण हा कॉमेडी चा भाग नाही आणि अश्या विनोदनिर्मितीवर माझा विश्वास ही नाही.
या वादानंतर, संबंधित एपिसोड यूट्यूबवरून हटविण्यात आला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) यूट्यूबला हा व्हिडिओ हटविण्याचे निर्देश दिले होते, ज्यानंतर हा व्हिडिओ यूट्यूबवरून हटवण्यात आला. रणवीर अल्लाहबादियाने त्याच्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर माफी मागितली आहे. तो म्हणाला, "माझे वक्तव्य केवळ अनुचितच नव्हते, तर ते विनोदीही नव्हते. कॉमेडी माझी विशेषता नाही. मी येथे फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे. यासाठी मी कोणतेही कारण देणार नाही, फक्त माफी मागत आहे."
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी समय रैना आणि रणवीर अल्लाहबादिया यांच्याशी संपर्क साधला असून, त्यांना तपास अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आणि या प्रकरणी आपली बाजू मांडण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर 'इंडियाज गॉट लेटेंट' शोवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. या शोच्या आयोजकांविरुद्ध कठोर कारवाईचीही मागणी केली जात आहे.