काहीजण नेहमीच व्हीआयपी संस्कृतीत जगले; योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांना टोला

11 Feb 2025 17:48:19
up cm yogi adityanath slams oppositions


नवी दिल्ली :   
  कुंभमेळ्याबद्दल नकारात्मकता पसरवणारे लोक नेहमीच व्हीआयपी संस्कृतीत जगले आहेत. त्यामुळेच हे लोक सनातन धर्माविरुद्ध अपप्रचार करत आहेत, असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना लगावला आहे. पं. दीनदयाल उपाध्याय पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते लखनऊ येथे बोलत होते.

प्रयागराजमध्ये, २९ दिवसांत, ४५ कोटी भाविकांनी संगमात पवित्र स्नान केले आहे, ही एक ऐतिहासिक घटना आहे. ते म्हणाले की, भारत आणि चीननंतर जगात ४५ कोटी लोकसंख्या असलेला दुसरा कोणताही देश नाही. ४५ कोटींहून अधिक भाविक एका तात्पुरत्या शहरात येऊन स्नान करतील ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. ही लोक व्हीआयपी स्नानाशी जोडून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु महाकुंभ हा सद्भावना आणि श्रद्धेचा संगम आहे, जिथे सर्व भाविक जात, धर्म, भाषा आणि प्रदेशातील भेद दूर करून एकत्र येतात, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

नकारात्मकता पसरवणारे कधीही चांगले बघू शकत नसल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, आयुष्यभर सरकारकडून व्हीव्हीआयपी वागणूक घेतली आहे आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला आहे. हे तेच लोक आहेत जे नेहमीच नकारात्मकता निर्माण करून भारत आणि सनातनच्या विरोधात उभे राहतात आणि प्रचार करण्यात व्यस्त असतात. मात्र, त्यांच्या नकारात्मक प्रचारास जनाधार मिळत नाही, असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी नमूद केले आहे.
 


  
 
Powered By Sangraha 9.0