स्टार्टअप संस्कृतीला बळ देण्यासाठी रत्नम कॉलेजमध्ये स्टार्टअप फेस्टीवलचे आयोजन

11 Feb 2025 14:48:50
 
ratnam
 
मुंबई : भारतातील स्टार्टअप संस्कृतीला बळ देण्यासाठी मुंबईतील रत्नम कॉलेजमध्ये स्टार्टअप फर्स्ट फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले होते. याच फेस्टीवलचा भाग म्हणून १० फेब्रुवारी रोजी मुंबई प्रिमियर आंत्रप्रेन्युअरशिप फेस्टिवलचे आयेजन केले गेले होते. यावेळी फेस्टीवलमध्ये सहभागी स्टार्टअप्सना त्यांच्या संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्टार्टअप एक्स्पोचे आयोजन केले गेले होते. रत्नम कॉलेजचे या फेस्टीवलच्या आयोजनाचे हे नववे वर्ष आहे. याप्रसंगी मार्गदर्शन करताना रत्नम कॉलेज आणि एनईएस – एसव्हीबी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर वरदराजन यांनी सांगितले की “कॉलेजच्या प्रत्येक विद्यार्थ्याने उद्योजकतेचा विचार केला पाहिजे, विद्यार्थ्यांनी नोकऱ्या करणारे नाही तर नोकऱ्या देण्याचे सामर्थ्य कमावले पाहिजे त्यातुनच विद्यार्थ्यांचा आणि पर्यायाने देशाचाही विकास होत राहिल. हे आपण लक्षात घ्यायला हवे.”
 
या फेस्टीवल प्रसंगी व्यवसाय तसेच स्टार्टअप क्षेत्राशी निगडित अनेक विषयांवरचे तज्ज्ञ लोक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. यांमध्ये स्टार्टअप क्षेत्राच्या तज्ज्ञ आणि विधिज्ञ डॉ. शिवांगी झारकर, संतोष गत उद्योग निरीक्षक मुंबई महानगर उद्योग संचालनालय, पुरस्कारप्राप्त स्टार्टअप असलेल्या डॉ. रश्मी सावंत यांसारखे तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित होते. तसेच विद्यार्थ्यांसाठी स्टार्टअप आणि उद्योजकता या विषयांशी निगडीत कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उद्योजक आणि उद्योजकाची मानसिकता, स्टार्टअप्सना पतपुरवठ्यात येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करायचा या महत्वाच्या विषयांशी निगडीत चर्चासत्र आणि मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली होती.
 
या फेस्टीवलला तरुणांनी तसेच विविध स्टार्टअप्सनी मोठा सहभाग नोंदवला होता. मुंबई तसेच परिसरातील विविध कॉलेजेसमधील अतिशय नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सनी सहभाग घेतला होता.
 
 
Powered By Sangraha 9.0