मुंबई : समय रैनाच्या "इंडियाज गॉट लेटेंट" या शोमध्ये केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. वादग्रस्त असा प्रश्न अलाहाबादियाने एका स्पर्धकाला चालू कार्यक्रमात विचारला. या एपिसोडमध्ये आशिष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा मुखिजा जी इंस्टाग्रामवर 'द रेबल किड' म्हणून ओळखली जाते. यांच्यासारखे कंटेंट क्रिएटर्सही सहभागी होते. रणवीरच्या या वक्तव्यामुळे तो चांगलाच अडचणीत सापडलाय. मनोरंजन विश्वासह राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांनीही त्याच्या वक्तव्यावरून टीका केली आहे. या प्रकरणी आता प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी यानेही प्रतिक्रिया दिली आहे.
ध्रुव राठी याने आपल्या ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली. त्यावर त्याने इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये घडलेल्या अश्लील वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. "मी नेहमीच अश्लील आणि अपमानास्पद भाषेच्या विरोधात राहिलो आहे. मी तयार केलेल्या हजाराहून अनेक व्हिडिओ, शॉर्ट्स आणि रील्समध्ये तुम्हाला कोणत्याही व्यक्तीसाठी एकही अपमानास्पद शब्द सापडणार नाही.
आज ‘डॅंक कॉमेडी’च्या नावाखाली जे काही घडत आहे, ते निव्वळ मूर्खपणा आहे. केवळ प्रेक्षकांना धक्का देऊन घाणेरड्या पातळीवर नेऊन व्ह्यूज मिळवणे, एवढाच त्याचा उद्देश आहे. यामुळे आपल्या तरुण पिढीच्या नैतिक जडणघडणीवर अतिशय वाईट परिणाम होत आहे. मात्र, सरकारकडून अशा गोष्टींवर बंदी घालण्याची मागणी करणे हा यावरचा उपाय नाही, कारण यामुळे कठोर सेन्सॉरशिपचा धोका निर्माण होऊ शकतो. त्याऐवजी, निर्मात्यांवर चांगला कंन्टेंट तयार करण्यासाठी दबाव आणला पाहिजे.
‘इंडियाज गॉट लेटंट’ यांसारख्या कार्यक्रमांचा समाजाच्या नैतिक अधःपतनावर तितकाच प्रभाव आहे, जितका ‘अॅनिमल’ सारख्या चित्रपटांचा आहे, आणि अशा गोष्टींवर ठामपणे टीका होणे आवश्यक आहे.