मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'बटेंगे तो कटेंगे' हा संदेश इंडिया आघाडीलासुद्धा दिला आहे, असे वक्तव्य संजय राऊतांनी केले. तसेच काँग्रेसचे काम समन्वायचे आहे फक्त जागा वाटपात मोठा वाटा मिळवण्याचे नाही, अशी टीकाही त्यांनी केली. त्यांनी सोमवा, १० फेब्रुवारी रोजी माध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊत म्हणाले की, "बटेंगे तो कटेंगे हा संदेश मोदींनी इंडिया आघाडीलासुद्धा दिला आहे. आम्ही लोकसभेला एकत्र लढलो. आघाडीतील प्रत्येक घटक एकमेकांसाठी काम करत होता. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, केरळ याठिकाणी सगळे एकमेकांसाठी काम करत होते. पण त्यानंतरच्या राज्याराज्यांतील निवडणूकांमध्ये इंडिया आघाडीचे गणित जमू शकले नाही. महाराष्ट्रात आणि दिल्लीतही जमले नाही. भविष्यात इतरही काही निवडणूका आहेत. इंडिया आघाडीला लोकसभेत चांगला रिझल्ट मिळाला. त्याआधी सातत्याने बैठका आणि चर्चा होत होत्या."
हे वाचलंत का? - देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीत नेमकं काय घडलं?
"त्यानंतर इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी फक्त निवडणूक लढण्यापुरतीच आहे का? असा प्रश्न लोकांच्या मनात आहे. निवडणूकीत हार-जीत होते. पण इंडिया आघाडीने अनेक प्रश्नांवर एकत्रित येणे गरजेचे आहे. विरोधी पक्षाचे हे कर्तव्य विधानसभा आणि लोकसभेइतकेच रस्त्यावरसुद्धा आहे. आज इंडिया आघाडी फक्त पार्लमेंटला दिसते. ती बाहेर येणेसुद्धा गरजेचे आहे. इंडिया आघाडीत आजही अनेक मोठे नेते आहेत. इंडिया आघाडी मजबुतीने टिकायला हवी, असे प्रत्येकाला वाटते," अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
काँग्रेस फक्त जागा वाटपात बिग ब्रदर नको!
"काँग्रेस पक्ष हा इंडिया आघाडीचा बिग ब्रदर आहे. राष्ट्रीय स्तरावरचा मोठा पक्ष म्हणून प्रत्येक बाबतीत काँग्रेसच्या नेतृत्वाने पुढाकार घेणे आम्हाला अपेक्षित आहे. फक्त जागावाटपात खेचाखेची करण्यासाठी आम्हाला आघाड्या नकोत. जागा वाटपात बिग ब्रदर नको. काँग्रेसचे काम समन्वयाचे आहे फक्त जागा वाटपात मोठा वाटा मिळवण्याचे नाही," अशी टीकाही संजय राऊतांनी काँग्रेसवर केली.