मुंबई : हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेत हत्तीरोगग्रस्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवार, १० फेब्रुवारी रोजी दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत केले.
राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने १० फेब्रुवारीपासून १३ राज्यांतील १११ जिल्ह्यांमध्ये हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावर राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचा शुभारंभ झाला. दरम्यान, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य स्तरावर या मोहिमेला सुरुवात झाली.
हे वाचलंत का? - भाजपने गाठला १ कोटी सदस्य नोंदणीचा ऐतिहासिक टप्पा! मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
राज्यातील पालघर, नांदेड, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर या ५ जिल्ह्यांतील ३४ तालुक्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये एकूण ५४ लाख ९८ हजार ८८४ लोकसंख्या आहे. यापैकी ५१ लाख ५८ हजार १७० पात्र लाभार्थ्यांना औषधे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने २०२७ पर्यंत या आजाराचे देशातून दुरीकरण करण्याचे ध्येय ठेवले आहे.