मुंबई : ही माझी वैयक्तिक भेट असून यात कुठलीही राजकीय चर्चा नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर दिले. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज ठाकरेंशी घेतलेली भेट ही कुठलीही राजकीय भेट नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा मला अभिनंदनाचा फोन आला. त्यावेळी त्यांना घरी येईल असे सांगितले होते आणि मी त्यांच्या घरी गेलो. मी त्यांच्याशी गप्पा मारल्या. या गप्पांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही. केवळ मैत्रीकरिता मी त्यांच्या घरी गेलो होतो. ही माझी वैयक्तिक भेट असून यात कुठल्याही युतीबद्दल किंवा राजकीय चर्चा नाही," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - मनातील भीतीवर विजय मिळवणे महत्वाचे! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
ते पुढे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी परीक्षा पे चर्चा हा सुंदर कार्यक्रम घेतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या मनातील भीती आणि त्यावरचे उपाय या चर्चेतून त्यांना सांगतात. या माध्यमातून विद्यार्थ्यांना जीवनाचा मंत्र मिळत असतो. यावेळीसुद्धा वेगळ्या पद्धतीमध्ये ही चर्चा झाली आणि विद्यार्थ्यांना ती अतिशय आवडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण देशाला आपला परिवार मानतात आपल्याच परिवारातील मुलांसाठी घेतलेला हा उपक्रम अतिशय सुंदर आहे," असेही ते म्हणाले.