केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय? वाचा सविस्तर...
01-Feb-2025
Total Views |
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवार, १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राला मिळालेली पहिली गोष्ट म्हणजे एमयुटीपी-३ या प्रकल्पासाठी १४६५ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. सर्वात प्रतिक्षेत असलेल्या पुणे मेट्रोसाठी या अर्थसंकल्पात ८३७ कोटींची तरतूद करण्यात आलीये. मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी जायकांतर्गत २३० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.
या अर्थसंकल्पात रेल्वे प्रकल्पांसाठीदेखील मोठी तरतूद करण्यात आली आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार प्रकल्पांसाठी ४ हजार ३ कोटी, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे-प्रशिक्षण संस्थेसाठी १२६ कोटी ६० लाख, मुंबई मेट्रोसाठी १६७३कोटी ४१ लाख, महाराष्ट्र ग्रामीण दळणवळण सुधारणांसाठी ६८३ कोटी ५१ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क-मॅग्नेट प्रकल्पासाठी ५९६ कोटी ५७ लाख, ऊर्जा संवर्धन आणि लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी १८६ कोटी ४४ लाख, मुंबईच्या इंटीग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्पासाठी ६५२ कोटी ५२ लाख, सर्वसमावेशक विकासासाठीच्या आर्थिक क्लस्टर जोडणी कामांसाठी १ हजार ९४ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी महाराष्ट्राला मिळाला आहे.
देशात तयार होणारे कपडे, चामड्याच्या वस्तू, मत्स्योत्पदनांवरील शुल्क कमी झाल्यामुळे महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार आहे. तसेच कापूस आणि डाळींच्या उत्पादनवाढीसंदर्भात घेतलेले निर्णयही महाराष्ट्राच्या फायद्याचे ठरणार आहे.