महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 'पुस्तकरुपी दिंडी'चे स्वागत

    01-Feb-2025
Total Views |
Maharashtra state cooperative bank

मुंबई
: सहकारी पतसंस्थांच्या कार्यास बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत ( Maharashtra State Cooperative Bank ) दि. १ फेब्रुवारी रोजी सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले. पुस्तकरुपी दिंडीचे राज्य बँकेत स्वागत केले गेले. यावेळी सहकारी दिंडीतील कार्यकर्त्यांना सहकाराची शपथ दिली गेली. यामध्ये काका कोयटे यांना १० लाखांचा धनादेश देण्यात आला.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने सहकारी पत संस्थांच्या कार्यास बळकटी देण्यासाठी आणि संपूर्ण राज्यभर सहकारी पत संस्थेची चळवळ सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आयोजित केलेल्या 'सहकार दिंडी'चे स्वागत आज महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत अत्यंत उत्साहाने करण्यात आले. यावेळी सहकारासंबंधीच्या पुस्तकरुपी दिंडीचे राज्य बँकेत मंत्रोपचाराने स्वागत करण्यात आले.

या निमित्त दिंडीतील सहकारी कार्यकर्त्यांना सहकाराची शपथ देण्यात आली तसेच सहकाराच्या सक्षमीकरणासाठी चालू असलेल्या आंदोलनास मदत म्हणून राज्य सहकारी बँकेतर्फे, बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांना रु. १० लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. सदर 'सहकार दिंडी'चा समारोप दि. ८ फेब्रुवारी २०२५ रोजी शिर्डी येथे पतसंस्था फेडरेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'सहकार परिषदेत होत आहे.