मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान हा केवळ त्यांचाच नाही तर संपूर्ण आदिवासी समुदायाचा आणि देशाचाही अपमान आहे. त्यामुळे काँग्रेसच्या राजघराण्याने राष्ट्रपतींसह संपूर्ण देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
काँग्रेस नेते सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर केलेल्या विधानावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान हा केवळ त्यांचाच नाही तर संपूर्ण आदिवासी समुदायाचा तसेच देशाचाही अपमान आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणावर सोनिया गांधी यांनी केलेले अपमानजनक विधान अत्यंत निषेधार्ह आहे."
एकीकडे राजघराणे हातात संविधानाच्या नावाने लाल किताब घेऊन नाटक करत आहे. तर दुसरीकडे, हेच राजघराणे देशातील सर्वोच्च संवैधानिक पद भूषवणाऱ्या आणि आदिवासी समुदायातून येणाऱ्या देशाच्या राष्ट्रपतींचा अपमान करतात. राजघराण्यातील लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, महामहिम द्रौपदी मुर्मू जी 'गरीब' महिला नाहीत, तर एका लहानशा गावातील एका साध्या कुटुंबातून आलेल्या २१ व्या शतकातील बलवान भारताच्या स्वावलंबी महिला आहेत. त्या भारताचा अभिमान आहेत आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे. या विधानाबद्दल काँग्रेसच्या राजघराण्याने महामहिम राष्ट्रपती आणि संपूर्ण देशाची जाहीरपणे माफी मागितली पाहिजे," असे ते म्हणाले.