मुंबई : नवीन कॉटन मिशनचा महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्र हे कापूस उत्पादक राज्य आहे. आपल्याकडे जवळपास ५५ लाख हेक्टर जमिनीवर कापूस लावला जातो. त्यामुळे या नवीन कॉटन मिशनचा महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा होणार आहे. तसेच तेलबियांच्या संदर्भातील निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास फायदा होईल. आतापर्यंत केंद्र सरकार तेलबियांची २५ टक्के खरेदी करत होते. आता सरकारने १०० टक्के खरेदी करणार असल्याचे सांगितले आहे."
हे वाचलंत का? - भारताला गतीने पुढे नेणारा अर्थसंकल्प! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
"स्टार्टअपची संख्या आणि गुंतवणूक या दोन्ही बाबतीत आता महाराष्ट्र नंबर वन झालेला आहे. त्यामुळे स्टार्टअपसाठी सुरु केलेल्या योजनांचा मोठा फायदा महाराष्ट्राला मिळणार आहे. तसेच ५० वर्षांचे बिनव्याजी इन्फ्रास्ट्रक्चर लोनचा सर्वाधिक फायदा गेल्या तीन वर्षात महाराष्ट्राला झाला असून यावर्षीसुद्धा याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्र घेईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विमा कंपन्यांच्या गुंतवणूकीबाबत कल्पक निर्णय!
"विमा क्षेत्रात १०० टक्के परकीय गुंतवणूक खूप महत्वाची आहे. आता १०० टक्के प्रिमियम हा भारताताच गुंतवावा लागेल. विमा क्षेत्रातील गुंतवणूकीतून येणारे २६ टक्के जास्तीचे पैसे आता भारताताच गुंतवावे लागतील. यापूर्वी विमा कंपन्या हा पैसा काही प्रमाणात भारतात आणि बाकी परदेशात गुंतवत होत्या. पण आता हा सगळा पैसा भारतात गुंतवल्यामुळे भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्राला ज्याप्रमाणे एलआयसीने मदत केली तशीच आता सगळ्या विमा कंपन्यांना मदत करावी लागेल. केंद्र सरकारने हा अतिशय कल्पक निर्णय घेतला आहे," असे ते म्हणाले.
कॅन्सर रुग्णांकरिता महत्वाचा निर्णय!
"या अर्थसंकल्पाने आरोग्य क्षेत्रात कॅन्सरसारख्या वेगाने वाढणाऱ्या आजाराला मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक सरकारी रुग्णालयात कॅन्सरचे डे केअर सेंटर काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून २०० डे केअर सेंटर एकाच वर्षात काढण्यात येणार आहेत. कॅन्सरमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन सुरु असून परदेशात मोठ्या प्रमाणात औषधे उपलब्ध झाली आहेत. पण त्यावर ड्यूटी खूप असल्याने ती आपल्याला महाग पडतात. अशा ३६ औषधांवरील मूलभूत सीमाशुल्क पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. त्यामुळे कॅन्सर पेशंटकरिता हा खूप महत्वाचा निर्णय झाला आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.