हिवाळ्यातील आरोग्य सजगता!

09 Dec 2025 11:33:09
Winter
 
हिवाळा हा साधारणतः अनेक उत्सव, पर्यटन या सर्वांसाठी अनुकूल काळ. साधारणपणे दिवाळी झाली की भारतात कडाक्याची थंडी पडण्यास सुरुवात होते. याच काळात अनेक सणवार, पर्यटनालाही उधाण येते. याचबरोबर आरोग्याच्या समस्या घेऊन, अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल होतात. हिवाळ्याचा आनंद घ्यायचा असेल, तर महत्त्चाचे आहे ते आरोग्य. यासाठी हिवाळ्यातील आरोग्यासमोरचे धोके आणि ते टाळण्यासाठीच्या उपाययोजनांचा थोडक्यात आढावा घेऊया.
 
सध्या देशात सर्वत्र थंडीची चाहूल लागली असून, सकाळी वातावरणात एक सुखद गारवा जाणवतो. धुक्यामधून डोकवणारी सूर्यकिरणे या आनंदात भर घालणारी ठरतात. अशा वेळी हातातला गरम चहा किंवा कॉफी शरीरात उबदारपणा निर्माण करते. रात्रीची उबदार अंथरुणात मिळणारी झोप मनाला आणि शरीराला ताजेतवाने करते. याच थंडीच्या दिवसात शहरांतून ‘विंटर वॉक’ किंवा गावांत शेकोटीभोवतीच्या गप्पा सुरू होण्याचा काळ! थंडीचा अनुभव हा प्रत्येकासाठी वेगळा आणि आनंददायी असतो. पण, या आनंदामागे दडलेला आरोग्याचा धोका मात्र अनेकदा दुर्लक्षित राहतो. वैद्यकीय क्षेत्रातील निरीक्षणे सांगतात की, हिवाळ्यात मेंदूचा स्ट्रोक, हृदयविकार, दमा आणि न्यूमोनियासारख्या आजारांच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ होते. रुग्णालयांमध्ये आपत्कालीन विभाग या काळात विशेषतः गजबजलेले असतात. या वाढीमागे केवळ तापमानातील घट हे एकमेव कारण नसून, शरीरात घडणारी जटिल जैविक प्रक्रिया आणि त्याचे परिणाम हीदेखील यामागील कारणे आहेत.
 
थंड हवेत शरीरात उष्णता टिकवण्यासाठी रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, या प्रक्रियेला ‘वॅसो-कन्स्ट्रिशन’ म्हणतात. रक्तवाहिन्या अरुंद झाल्याने रक्तदाब वाढतो आणि हृदयावर त्याचा ताण येण्याचा धोका असतो. उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयरोग असलेल्या व्यक्तींमध्ये हा ताण अधिकच तीव्र होतो. थंडीमुळे रक्त अधिक घट्ट होते आणि प्लेटलेट्सची सक्रियता वाढते. परिणामी रक्ताच्या गाठी तयार होण्याचा धोकाही वाढतो, ज्यामुळे मेंदू किंवा हृदयाला जाणारा रक्तपुरवठा अचानक थांबू शकतो. याचा परिणाम स्ट्रोक किंवा हार्ट अ‍ॅटॅकच्या स्वरूपात दिसतो. फुप्फुसांचे कार्यही हिवाळ्यात प्रभावित होते. थंड हवा कोरडी असल्याने, शरीरातील वायू मार्ग संवेदनशील होतात. दमा असलेल्या रुग्णांमध्ये, वायुमार्ग आकुंचन पावतात आणि श्वास घेण्यास त्रास, घरघर, खोकला आणि छातीत दडपण जाणवते. हिवाळ्यात प्रदूषणाची पातळी सामान्यपणे वाढलेली दिसते. हवेतील सूक्ष्मकण फुप्फुसात खोलवर जाऊन फुप्फुसाला सूज येते. परिणामी, त्यांचे कार्य बाधित होऊन श्वसनक्षमतेवरही त्याचा परिणाम होतो.
 
हिवाळ्यात नैसर्गिकपणे आपली रोगप्रतिकारशक्तीही मंदावलेली असते, कारण शरीरातील ‘ड’ जीवनसत्त्वाची पातळी खालावते. यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोकाही हिवाळ्यात वाढतो. न्यूमोनिया, फ्लू आणि सर्दी यासारखे संसर्गजन्य आजार या काळात सहज पसरतात. दीर्घकाळ असलेली थंडी, शरीरात दाहजन्य प्रतिक्रियाही वाढवते, ज्यामुळे हृदय आणि फुप्फुसांचे कार्य अधिक प्रभावित होते. या सगळ्यांसाठी वृद्ध, लहान मुले, हृदयरोगी, मधुमेही आणि धूम्रपान करणारे हे सर्वांत संवेदनशील ठरतात. यांच्या शरीराची तापमान नियंत्रित ठेवण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे हायपोथर्मिया, थकवा, चक्कर येणे, थंडी वाजणे किंवा अचानक बेशुद्ध पडणे ही लक्षणं या व्यक्तींमध्ये वारंवार दिसतात. हृदयाचे रुग्ण, विशेषतः एंजायना किंवा स्ट्रोकची पार्श्वभूमी असलेल्या रुग्णांची या ऋतूमध्ये अधिक काळजी घ्यावी लागते. त्यामुळे थंडीच्या दिवसात आनंद घेण्याबरोबरच सजग राहणेही अत्यंत आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांत आपले शरीर उबदार ठेवणे फार महत्त्वाचे असते. त्याचबरोबर वातावरणात अचानक होणार्‍या तापमानबदलाचाही सामना करणे आवश्यक ठरते. बाहेरून थंड वातावरणातून गरम वातावरणात लगेच जाण्याने, रक्तदाबात तातडीने बदल होतो. व्यायाम हा आरोग्यासाठी उपयोगी असला, तरी अत्यंत थंड हवेत धावणे किंवा जोरदार व्यायाम करणे टाळावे. तुलनेने सौम्य तापमानात चालणे, घरात हलका व्यायाम किंवा योगासने करणे अधिक सुरक्षित ठरते.
 
हृदयरोग, उच्च रक्तदाब, दमा किंवा श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांनी औषधे नियमित घ्यावीत. इन्हेलर्स, स्टीम, मास्क किंवा ‘ह्युमिडिफायर’चा योग्य वापर फायदेशीर ठरतो. छातीत दुखणे, बोलण्यात अडखळणे, एका बाजूला कमजोरी, श्वास घेण्यास त्रास किंवा थंडी जाणवणे ही धोक्याची चिन्हे आहेत. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास, गंभीर परिणाम होऊ शकतात. याबरोबरच हिवाळ्यात आहारात उष्णता देणारे पदार्थ, भरपूर पाणी पिणे फायदेशीर ठरते. गरम कपडे कानटोपी, मफलर आणि हातमोजे ही थंडीपासून बचावाची सोपी, पण प्रभावी साधने आहेत. घरातील आर्द्रता नियंत्रित ठेवणे, धूर व प्रदूषण टाळणे, तसेच सतत हात धुणे आणि संसर्ग टाळण्याची काळजी घेणेही आवश्यक आहे. हिवाळा हा ऋतू सुंदर आहेच, पण त्याचा आनंद जबाबदारीसोबतच खरा अनुभवता येतो. आरोग्याची जाणीव, शिस्तबद्ध सवयी आणि दक्षता हेच या ऋतूतील खरे सुरक्षाकवच आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0