मुंबई : ( SC Caste Certificate ) आता वडीलांच्या नव्हे तर आईच्या जातीवरुन मुलीला SCचे जात प्रमाणपत्र मिळू शकेल असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय. अल्पवयीन विद्यार्थिनीच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. वडील अनुसूचित जातीचे नसतानाही, मुलीला तिच्या आईच्या जातीनुसार अनुसूचित जात (एससी) प्रमाणपत्र देण्यास न्यायालयाने तात्पुरती मान्यता दिलीय.
हा खटला नेमका काय आहे?
हा खटला पुद्दुचेरीमध्ये राहणाऱ्या एका महिलेने सुप्रीम कोर्टात दाखल केला होता. या महिलेने अर्जात म्हटले होते की, माझे आई वडील, आजी आजोबा सगळे हिंदू द्रविड समुदायाशी संबंधित आहेत. लग्नानंतर माझे पतीही माझ्या माहेरी राहतात असं तिने म्हटलं होते. सुप्रीम कोर्टाने मद्रास हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे.
जर मुलीला वेळेवर जात प्रमाणपत्र मिळाले नसते तर तिचे शैक्षणिक नुकसान होऊ शकले असते असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. ‘आईची जात प्रमाणपत्राचा आधार का होऊ नये?’ अशी विचारणाही न्यायाधीशांनी केली आहे. “काळ बदलत असताना, जात प्रमाणपत्र आईच्या जातीवर आधारित का देऊ नये?” असा सवालही त्यांनी केलाय.
हेही वाचा : Rajesh Khawale : 'मी माझ्या पगारावर समाधानी आहे!' महसूल अपर आयुक्तांची नेमप्लेट, सोशल मीडियावर व्हायरल
सुप्रीम कोर्टाने विद्यार्थिनीच्या शिक्षणाचा विचार करून घेतलेला हा निर्णय तात्पुरता दिलासा देणारा आहे. मात्र, “मुलांची जात आईच्या जातीनुसारही ठरू शकते का?” हा मूलभूत प्रश्न मोठा सामाजिक वाद निर्माण करू शकतो. जर भविष्यात कोर्टाने आईच्या जातीलाही निर्णायक आधार मानला तर देशातील सामाजिक न्याय व्यवस्थेत मोठे बदल घडू शकतात असं कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे.