Rajesh Khawale : 'मी माझ्या पगारावर समाधानी आहे!' महसूल अपर आयुक्तांची नेमप्लेट, सोशल मीडियावर व्हायरल

09 Dec 2025 15:48:25
Rajesh Khawale
 
मुंबई : (Rajesh Khawale) “सरकारी काम अन् सहा महिने थांब” ही म्हण सर्वश्रूत. सरकारी कार्यालयात काम वेळेत न होणे आणि त्यातही चिरिमिरीची अपेक्षा केली जाणे, अशा तक्रारी जनमानसात नेहमीच घुमत असतात. मात्र, या ठोकताळ्यांना छेद देत नागपूरच्या महसूल अपर आयुक्तांच्या टेबलावरील एक साधीशी नेमप्लेट आता संपूर्ण प्रशासनात चर्चेचा विषय ठरली आहे.
 
या नेमप्लेटवर एक वाक्य लिहिलेले आहे, “मी माझ्या पगारावर समाधानी आहे.” सरकारी व्यवस्थेतील प्रामाणिकपणा आणि स्वच्छता यावर थेट प्रकाश टाकणारे हे विधान सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. कार्यालयात येणाऱ्या लोकांकडून काम लवकर करून घेण्यासाठी किंवा एखादे बेकायदेशीर काम कायदेशीर करण्यासाठी अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला जातो. काहीजण गोड बोलणे किंवा ओळखीचा आधार लावूनही दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अशा लोकांना आधीच स्पष्ट संदेश देणारी ही नेमप्लेट अनेकांसाठी धडा ठरतेय. (Rajesh Khawale)
 
हेही वाचा :  Devendra Fadnavis : माजी PA ला मुख्यमंत्र्यांनी भर सभागृहात सुनावलं! म्हणाले, लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, नाहीतर...
 
ही नेमप्लेट ज्यांच्या टेबलावर आहे ते अधिकारी म्हणजे नागपूरचे महसूल अपर आयुक्त राजेश खवले (Rajesh Khawale). खवले यांनी आपला कारकिर्द प्रवास मंत्रालयीन सहायक म्हणून सुरू केला. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन २००० साली ते उपजिल्हाधिकारी झाले आणि त्यानंतर विविध जिल्ह्यांमध्ये कार्यरत राहत आज ते नागपूरमध्ये अपर आयुक्त पदावर आहेत. (Rajesh Khawale)
 
सरकारी कार्यालयांबद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन बदलण्यासाठी एका अधिकाऱ्याची ही छोटीशी पण प्रभावी कल्पना लोकांच्या मनात आदर निर्माण करतेय. या उदाहरणामुळे ‘सर्वच सरकारी कर्मचारी तसे नसतात’ याची पुष्टी पुन्हा एकदा होत आहे. (Rajesh Khawale)
 
  
Powered By Sangraha 9.0