बारामुल्लामध्ये सापडले प्रमुख बौद्ध संकुल

09 Dec 2025 19:58:49

मुंबई : जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला येथे एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पुरातत्वीय शोध लागला आहे. बारामुल्लातल्या जेहानपोरा येथे पुरातत्वशास्त्रज्ञांना कुशाण काळातील एका महत्त्वाच्या बौद्ध संकुलाचे मोठे वास्तुशिल्पीय अवशेष आढळून आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीर अभिलेखागार पुरातत्व आणि संग्रहालये विभाग, मध्य आशियाई अभ्यास केंद्र आणि काश्मीर विद्यापीठ यांच्या संयुक्त प्रयत्नातून पुरातत्व शोध सुरू होता. त्यानुसार जेहानपोरा येथे नोव्हेंबरच्या सुरुवातीला उत्खनन सुरू झाले. यामध्ये त्यांना कुशाण काळातील बौद्ध संकुलाचे मोठे वास्तुशिल्पीय आढळले. हे काम आता इथून पुढे वर्षानुवर्षे सुरू राहणार आहे.

या प्रकल्पाचे संचालक डॉ. मोहम्मद अजमल शाह यांच्या मते, या अवशेषांमुळे या प्रदेशाच्या पुरातत्व नकाशात महत्त्वाची माहिती उपलब्ध झाली आहे. तसे पाहता केंद्रशासित प्रदेशात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मानकांनुसार औपचारिक मंजुरी मिळालेला हा पहिलाच मोठा सहयोगी प्रकल्प आहे.

आतापर्यंत उत्खननात स्तूप, संरचनात्मक भिंती, मातीची भांडी आणि तांब्याच्या वस्तू आढळून आल्या आहेत. याशिवाय दगडी पायांचे थर, कोरीव काम केलेले तुकडे, मातीचे तुकडे आढळले आहेत.शास्त्रज्ञांना वाटते की, याठिकाणी एकेकाळी सक्रिय असलेले आणि काश्मीरला मध्य आशियाशी जोडणारे एक महत्त्वाचे ठिकाण असावे.




Powered By Sangraha 9.0