मुंबई : (Sayaji Shinde Meet Raj Thackeray) नाशिकमध्ये २०२७ ला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात उभारण्यात येणाऱ्या साधुग्राममधील वृक्षतोडीचा मुद्द्यावरुन सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तापले आहे. या वादात अभिनेते अभिनेते आणि सह्याद्री देवराई संघटनेचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे यांनी उडी घेतली होती. त्याच दरम्यान मनसेकडून तपोवनमध्ये वृक्षतोडीविरोधात आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी ८ डिसेंबर रोजी सयाजी शिंदे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
सयाजी शिंदे यांनी सोमवारी सकाळी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "तपोवनातील आंदोलनासाठी ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला, त्यापैकी राज ठाकरे एक आहेत. राज ठाकरेंची मी आज भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले. झाडं कशी वाचली पाहिजेत, याबाबत चर्चा केली. वेगळी झाडं वगैरे लावता येत नाही. १५ फुटांची झाडं वगैरे काही अर्थ नाही. ज्या ठिकाणी झाडं आलीच नाहीत तिथे १५ फुटांची झाडं कशी लागणार? मुद्दा असलेल्या झाडांचा आहे ती झाडं का तोडायची आहेत? ती झाडं तोडायची नाहीत हाच मुद्दा आहे.
कुंभमेळा झाला पाहिजे त्याबाबत आदर आहेच. पण नवीन झाडांची फसवणूक नको, आहे ती झाडं तोडली जाऊ नयेत. वनराई आहे, देवराई आहे ती तुटायला नको ही आमची भूमिका आहे. मला झाडांशिवाय बाकी कुणी काय बोलतं ते काही कळत नाही. तपोवनाच्या आंदोलनाला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला त्याच संदर्भात माझी त्यांची चर्चा झाली.