मुंबई : (PM Narendra Modi Speech on 150th Vande Mataram Anniversary) वंदे मातरम या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विशेष चर्चा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत भाषणातून या चर्चेला सुरुवात केली. "वंदे मातरम हा असा मंत्र होता, ज्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली होती. त्याग आणि तपश्चर्या यांचा मार्ग दाखवला होता. अशा वंदे मातरमचे स्मरण करणे, हे आपल्या सगळ्यांचे भाग्य आहे", असं पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी आणीबाणीचा उल्लेख करत काँग्रेसवर टीका केली.
वंदे मातरमने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं
"१५० वर्ष त्या महान अध्याय आणि गौरवाची पुनर्स्थापना करण्याची संधी आहे. देशाने आणि सभागृहाने ही संधी सोडली नाही पाहिजे. हे तेच वंदे मातरम् आहे, ज्याने १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. वंदे मातरमचा १५० वर्षांचा प्रवास अनेक टप्प्यांमधून गेला आहे. वंदे मातरमला ५० वर्ष झाली, तेव्हा देश गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये अडकलेला होता. ज्यावेळी वंदे मातरमला १०० वर्ष पूर्ण झाली, तेव्हा देश आणीबाणीच्या अंधारात होता. वंदे मातरमसाठी अत्यंत उत्तम पर्व पाहिजे, तेव्हा संविधानाचा गळा घोटला गेला. त्यावेळी देशभक्तीसाठी जगणाऱ्या-मरणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकले होते. ज्या वंदे मातरम् गीताने देशाच्या स्वातंत्र्याला ऊर्जा दिली. त्याला १०० वर्ष पूर्ण होताना इतिहासाचा एक काळा कालखंड दुर्भाग्याने समोर येतो” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
लोकशाहीच्या पाठीत आणीबाणी नावाचा खंजीर खुपसला...
"१९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा देशाची प्राथमिकता बदलली. पण भारताची प्रेरणा बदलली नाही. प्रत्येक संकटात वंदे मातरमच्या भावनेसह देश प्रगती करत राहिला. आजही १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला तो भाव दिसतो. मात्र, देशाच्या लोकशाहीच्या पाठीत जेव्हा आणीबाणी नावाचा खंजीर खुपसला गेला तेव्हा वंदे मातरमनेच त्या प्रसंगातून बाहेर काढले", असेही नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.