"जिनांच्या दबावापुढे नेहरुंनी गुडघे टेकले अन् तुष्टीकरणाच्या राजकारणात काँग्रेस गुरफटलं", पंतप्रधान मोदींचा घणाघात!

08 Dec 2025 16:31:59

pm modi

मुंबई : : (PM Narendra Modi on Vande Mataram) 
वंदे मातरम या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यावर विशेष चर्चा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत भाषणातून या चर्चेला सुरुवात केली. "१५० वर्ष त्या महान अध्याय आणि गौरवाची पुनर्स्थापना करण्याची संधी आहे. देशाने आणि सभागृहाने ही संधी सोडली नाही पाहिजे. हे तेच वंदे मातरम् आहे, ज्याने १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी वंदे मातरम या गीतावर मागच्या पिढीने अन्याय केल्याचे म्हणत पंडीत नेहरूंवर टीका केली आहे.

नेहरुंना आपलं सिंहासन डळमळताना दिसलं...

मोहम्मद अली जिन्ना यांनी १५ ऑक्टोबर १९३६ रोजी लखनौमधून वंदे मातरमविरोधात घोषणा दिली. १९३७ मध्ये मुस्लिम लीगने वंदे मातरमला विरोध दर्शवला होता. वंदे मातरम या गीतातील काही शब्दांवर मुस्लिम लीगला आक्षेप होता. काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष जवाहरलाल नेहरू यांना आपले सिंहासन डळमळताना दिसले. नेहरूंनी मुस्लिम लीगच्या निराधार विधानांना सडेतोड उत्तर देण्याऐवजी, त्यांचा निषेध करण्याऐवजी, उलट त्यांनी वंदे मातरम गीताची चौकशी सुरू केली. नेहरूंनी पाच दिवसांनंतर नेताजींना पत्र लिहिले. त्यात जिनांच्या भावनांशी सहमती दर्शवत लिहिले की, वंदे मातरम्च्या आनंदमठमधील पार्श्वभूमीमुळे मुस्लिमांना दुखापत होऊ शकते.

तुष्टीकरणाच्या राजकारणात काँग्रेस गुरफटलं...

या प्रस्तावाच्या विरोधात लोकांनी देशभरात प्रभातफेऱ्या काढल्या, पण काँग्रेसने वंदे मातरमचे तुकडे केले. काँग्रेसने मुस्लिम लीगसमोर गुडघे टेकले, याचा इतिहास साक्षी आहे. काँग्रेसचे नेते आजही वंदे मातरमवर वाद निर्माण करतात. मागच्या पिढीत वंदे मातरमवर इतका अन्याय का झाला? वंदे मातरमचा विश्वासघात झाला. तुष्टीकरणाच्या राजकारणात काँग्रेस गुरफटलं, त्यामुळे भारत फाळणीसारख्या दुर्देवी निर्णयाला सामोरा गेला, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

महात्मा गांधी यांनी वंदे मातरमबाबत काय म्हटलं होतं?

महात्मा गांधी १९०४ किवा १९०५ च्या आसपास म्हणाले होते की, वंदे मातरम हे इतकं लोकप्रिय गीत झाले आहे की, ते आपले राष्ट्रगीत झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले देशभरातल्या स्वातंत्र्य संग्रामातील सेनानींसाठी महत्त्वाचे गीत झाले होते. राष्ट्रीय गीताप्रमाणे वंदे मातरम हे गीत प्रचंड लोकप्रिय झाले होते. देशभरातील लोकांनाही हे गाणं म्हणजे प्रचंड उर्जा आणि शक्ती देणारं गाणं वाटले होते.
 
     
Powered By Sangraha 9.0