मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भारतातील सर्वाधिक लांबीच्या दुर्मीळ ‘बीक्ड ब्लाइंड स्नेक’ची गगनबावड्यामधून नोंद करण्यात आली आहे (longest beaked blind snake). बालरोगतज्ज्ञ डाॅ. अमित पाटील यांना हा साप आढळला आहे (longest beaked blind snake). सध्या अस्तित्वात असलेल्या नोंदींनुसार या सापाच्या आत्तापर्यंत सर्वाधिक लांबीची नोंद पाटील यांनी केली आहे. (longest beaked blind snake)
बुधवार दि. ३ डिसेंबर, २०२५ रोजी रात्री उशिरा कोल्हापूर-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर डाॅ. पाटील यांना गगनबावड्यानजीक भुईबावडा घाटात ‘बीक्ड ब्लाइंड स्नेक’ प्रजातीतील एक साप मृतावस्थेत आढळला. पाटील यांनी प्रथमतः त्या सापाची ओळख पटवली. यासाठी त्यांनी काही संदर्भ आणि अधिकृत संकेतस्थळांचा वापर केला. अभ्यासाअंती हा साप ‘बीक्ड ब्लाइंड स्नेक’ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विविध स्त्रोतांमार्फत संदर्भ माहिती घेतली असता भारतात आत्तापर्यंत आढळलेल्या या सापाची जास्तीत जास्त लांबी ६२३ ते ६३० मिलीमीटर नोंदवली गेल्याचे समजले. त्यामुळे सापडलेल्या सापाची शास्त्रीय पद्धतीने लांबी मोजण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अनेकवेळा लांबी मोजून व खात्री करून अखेरीस त्यांना सापडलेल्या सापाची लांबी ६७० मिमी (सुमारे ६७ सेंटीमीटर) असल्याचे निदर्शनास आले. सध्या अस्तित्वात असलेल्या नोंदींनुसार ही आत्तापर्यंत या प्रजातीच्या सापाच्या सर्वाधिक लांबीची नोंद आहे. शिवाय, कोल्हापूर जिल्हा व गगनबावडा परिसरानजीक या सापाची नोंद यापूर्वी झाल्याचे ऐकिवात नाही.
संख्येच्या दृष्टीने हा साप दुर्मीळ नसला, तरी तो कायम जमिनीखालीच राहतो. असल्याने आणि जमिनीखालील अधिवासासाठी अनुकुलित झाल्यामुळे सहजासहजी तो दृष्टीस पडत नाही. त्यामुळे दिसण्याच्या दृष्टीने हा साप दुर्मीळ आहे. ‘बीक्ड ब्लाइंड स्नेक’चे मराठी नाव ‘चंचू वाळा साप’ असून तो सापांच्या वाळा प्रजातींपैकी एक साप आहे. मात्र, घरी आढळणाऱ्या वाळा सापापेक्षा हा लांबीला अधिक (सरासरी ४० ते ४५ सेंमी.) असतो. हा बिनविषारी आणि निरुपद्रवी साप आहे. याचे शरीर गुळगुळीत, सिलिंड्रिकल असून त्याच्या तोंडाच्या टोकाचा भाग पक्ष्याच्या चोचीसारखा असतो. हा साप ओळखण्याचे हे वैशिष्ट्य आहे. याच्या शेपटीचे टोक छोट्या काट्यासारखे टोकदार असून त्याने हलका टोचा देऊन हा साप बचाव करण्याचा प्रयत्न करतो. गांडुळाशी असणाऱ्या शारीरसाधर्म्यामुळे बऱ्याचदा लहान आकाराचा असताना या सापाला गांडूळ समजले जाते. हे साप कीटकभक्षी असून वाळवी-मुंग्या, त्यांची अंडी आणि गांडुळासारखे अपृष्ठवंशीय प्राणी यांवर ते उपजीविका करतात.
लांबीचे निष्कर्ष काय ?
६७० मिमीचा साप ही प्राथमिकदृष्ट्या या प्रजातीसाठीची आत्तापर्यंतची सर्वात मोठी नोंद ठरते. या नोंदीमुळे या प्रजातीची वाढीची नैसर्गिक मर्यादा, वय-रचना, खाद्याची सुयोग्य उपलब्धता आणि अधिवासाची सशक्त गुणवत्ता यांबद्दल नवीन माहिती मिळते. शिवाय, आधीच्या साहित्यातील आकार-परिमाणांचे दुरुस्तीकरण करणे आवश्यक ठरू शकते. अशा नोंदी प्रजातींची ओळख, पर्यावरणीय मूल्यांकन आणि जतनकार्य यांसाठी मदत करतात. योग्य छायाचित्रे व मोजमापांसह ही नोंद वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. पश्चिम घाटांपैकी राधानगरी-दाजीपूर-गगनबावडा परिसरातील संपन्न जैवविविधतेचा दाखलाही या सापाच्या आढळाने परत एकदा मिळाल्याने ही निसर्गप्रेमींसाठी आनंदाची बाब आहे.