बरं झालं मला दिसत नाही ते!

08 Dec 2025 12:44:34

आयुष्यात दृष्टीइतकाच महत्त्वाचा असतो तो दृष्टिकोन! त्यावरुनच एखाद्या संकटाला तुम्ही संधी म्हणून बघता की अडचण म्हणून ते ठरते. नुकत्याच झालेल्या दृष्टिबाधित महिला क्रिकेटमधील विश्वविजेत्या संघाने या दृष्टिकोनाचे महत्त्व त्यांच्या विजयाने अधोरेखित केले. या संघाची उपकर्णधार असलेली गंगा हिचा जीवनप्रवास आणि दृष्टिबाधितांच्या क्रिकेटचा तपशीलवार घेतलेला आढावा...

अच्छा हुआ कि मुझे दिखता नहीं हैं| मुझे नहीं दिखता, इसलिए मैं वर्ल्ड कप खेल रही हूं| अगर दिखता, तो मैं उनकी तरह सातवीं आठवीं शिक्षा तक पढ़ती और मेरी शादी हो जाती,” हे मनोगत होते, राष्ट्रीय दृष्टिबाधित महिलांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट संघाची उपकर्णधार असलेल्या सोलापूरच्या गंगा संभाजी कदम हिचे!

पहिला विश्वचषक : दृष्टिबाधित महिलांच्या पहिल्या टी-ट्वेंटी विश्वचषक विजयाचा मान, भारतीय महिला संघानं मिळवला. रविवार दि. 23 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेच्या कोलंबोमधील पी सारा ओव्हल येथे झालेल्या पहिल्या दृष्टिबाधित टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2025च्या अंतिम सामन्यात, भारतानं नेपाळला पराभूत करून विजेतेपद पटकावलं. महाराष्ट्राची गंगा संभाजी कदम ही त्या संघाची उपकर्णधार, तर कर्नाटकची दीपिका टी. सी. ही कर्णधार होती. विश्वचषकाचे हे सामने दि. 11 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरदरम्यान दिल्ली, बंगळुरु व काठमांडू (नेपाळ) येथे खेळवण्यात आले. या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, अमेरिका, पाकिस्तान, श्रीलंका व नेपाळ या सात देशांचे संघ सहभागी झाले होते. या संघांनी ‌‘राऊंड-रॉबिन‌’ पद्धतीने सामने खेळले. ‌‘राऊंड-रॉबिन‌’ म्हणजे, गटातील प्रत्येक संघासोबत सामने खेळले जातात. या पद्धतीनुसार प्रत्येक सहभागी संघाला, प्रत्येकासोबत किमान कदातरी सामना खेळण्याची संधी मिळते. यामुळे अशा पद्धतीने खेळल्याजाणाऱ्या स्पर्धांमध्ये समान संधीही मिळते. अशाप्रकारे खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेतील सगळे सामने भारताने जिंकले, आणि उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघही भारत ठरला होता.

गंगाची खंत : उपकर्णधार गंगाचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील फुटाना गावातील, एका शेतमजूर कुटुंबात झाला. महाराष्ट्रातील ती एकमेव दृष्टीबाधित महिला क्रिकेट खेळाडू होती. महाराष्ट्रातील ही कन्या सांगत होती की, ‌’आम्ही आठ भावंडे. त्यात एक भाऊ. क्रीडाक्षेत्राकडे वळणारा असा एकही नाही. सातवी-आठवी इयत्ता उत्तीर्ण झाल्यावर, आमच्यापैकी बाकी सगळ्यांचीच लग्न उरकून टाकण्यात आली. आमच्या भावंडात मी एकटीच दृष्टीबाधित असल्याने, बाकी भावंडांत मी वगळता सगळ्यांना व्यवस्थित दिसे. मला त्याची कायमच खंत वाटायची.‌’

गंगाचा हट्ट : गंगाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. तिच्या पालकांनी तिला शिक्षणासाठी, सोलापूर येथील भैरुरतन दमाणी अंधशाळेत 2012 साली दाखल केले. शाळेचे सचिव आणि मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनामुळे, सुरुवातीस धावणे व गोळाफेक अशा खेळांमध्ये गंगाने भाग घेतला. शालेय शिक्षण घेत असतानाच, शाळेतील मुले क्रिकेट खेळत असलेली पाहून तिलाही क्रिकेटची आवड निर्माण झाली. भैरुरतन दमाणी अंधशाळेत दहावीपर्यंत, बारावीपर्यंत ह. दे. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात गंगाने शिक्षण घेतले. मुंबई येथील कीत महाविद्यालयात कला शाखेची पदवी मिळावल्यानंतर, कला शाखेतील ‌‘राज्यशास्त्र‌’ विषयात पदव्युत्तर शिक्षणही गंगाने पूर्ण केले. सध्या ती ‌‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा‌’च्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. इयत्ता सातवीत असल्यापासूनच गंगाला, क्रिकेटचे धडे राजू शेळके यांनी दिले. 2017 पासून तिच्या स्पर्धात्मक कामगिरीस सुरुवात झाली आणि त्यानंतर तिने कधीही मागे वळून पहिले नाही.

गंगाचे प्रशिक्षक : गंगाला घडवण्यात मोलाचा वाटा असलेले प्रशिक्षक राजू शेळके यांचे शिक्षण सोलापूरचेच. शालेय जीवनापासून त्यांना क्रिकेटची प्रचंड आवड. शालेय सामन्यापासूनच त्यांची क्रिकेट प्रवासाची सुरुवात झाली. त्यांनी सोलापूर संघ, महाराष्ट्र संघाकडून खेळताना राजस्थान, कर्नाटक अशा विविध ठिकाणी राष्ट्रीय सामनेही खेळले आहेत.

राजू शेळके यांनी सन 2021 नंतर, व्यावसायिक क्रिकेट खेळणे बंद केले. क्रिकेट खेळतांना त्यांना नेहमी वाटे की, त्यांनाही भारतीय संघाकडून क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी. परंतु, अनेक क्रिकेटपटूंप्रमाणे त्यांचेही हे स्वप्न अपूर्णच राहिले. दरम्यान, राजू शेळके भैरुरतन दमाणी अंधशाळेतील मुलांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी तसेच त्यांना क्रिकेट शिकविण्यासाठी, सुटीच्या दिवशी जात असत. तेव्हा त्यांना शाळेत सातवीत शिकणारी चुणचुणीत गंगा ही नेहमी म्हणत असे की, मलाही क्रिकेट शिकायचे आहे. लहान मुलगी आहे, तिला खेळताना दुखापत होईल, म्हणून प्रथमतः राजू यांनी तिला टाळले. परंतु, तिने सतत त्यांचा पाठपुरावा करत क्रिकेट शिकविण्याबाबतचा हट्ट लावून धरला. त्यानंतर मग राजू यांनीही तिला क्रिकेटचे धडे देण्यास सुरुवात केली. गंगासुद्धा क्रिकेटचे सर्व तंत्र अगदी मन लावून जिद्दीने शिकली. 2017 ते आजतागायत, ती महाराष्ट्र संघाची कर्णधार राहिली आहे. 2019 ते 2025 पर्यंतच्या राष्ट्रीय सामन्यात, तिच्या खेळाचा आलेख हा उत्तरोत्तर चढताच राहिलेला आहे. दृष्टिबाधित महिलांचा 2023 मध्ये जेव्हा राष्ट्रीय स्तरावरील पहिला संघ जाहीर झाला; तेव्हा त्या पहिल्या संघात गंगाची निवड राजू शेळकेंसाठी अभिमानाची गोष्ट होती. उपकर्णधारपदी गंगाची झालेली निवड, ही राजू शेळके यांना अतिशय गौरवाची, अभिमानाची आत्मिक समाधानाची गोष्ट ठरली.

संघाच्या खेळाडूंशी समाजमाध्यमांतून झालेल्या संवादात, या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी या मुलींना किती आव्हानांना तोंड द्यावे लागले, हे त्यांनी क्रीडाप्रेमींच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी छोट्या गावांपासून इथपर्यंत पोहोचण्यापर्यंतचा, त्यांचा कठीण प्रवासदेखील उलगडून सांगितला. भारताच्या 16 सदस्यीय संघात कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा, दिल्ली, आसाम आणि बिहार या नऊ राज्यांच्या खेळाडूंचा समावेश होता.

दृष्टिबाधितांचं क्रिकेटविश्व : दृष्टिबाधितांचं क्रिकेटविश्व हे नेहमीच्या क्रिकेटपेक्षा भिन्न असतं. खेळाडूंच्या दृश्य क्षमतेनुसार, त्याचे नियम आणि कायदे बदलले जातात. दृष्टिबाधितांच्या क्रिकेटमध्ये वापरला जाणारा चेंडू, नेहमीच्या क्रिकेटच्या चेंडूपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. या खेळात प्लॅस्टिकचा चेंडू वापरला जातो व त्यात बॉल बेअरिंगसदृश, लहान लहान धातूचे तुकडे ठेवले जातात. जेव्हा चेंडू हलतो, तेव्हा तो एक प्रकारचा खडखडाट करतो. खेळाडू चेंडूची दिशा आणि वेग मोजण्यासाठी खेळाडू या ध्वनीचा आधार घेतात.

बी-वन, टू आणि थ्री : दृष्टिबाधितांच्या क्रिकेटमध्ये, खेळाडूंना, त्यांच्या दृश्य क्षमतेनुसार तीन श्रेणींमध्ये विभागले जाते. या श्रेणींना ‌‘बी-वन‌’, ‌‘बी-टू‌’ आणि ‌‘बी-थ्री‌’ असे संबोधतात. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, एका संघात सामान्यतः ‌‘बी-वन‌’ श्रेणीतील चार, ‌‘बी-टू‌’ श्रेणीतील तीन आणि ‌‘बी-थ्री‌’ श्रेणीतील चार खेळाडू असतात. या श्रेणींव्यतिरिक्तही यांचं क्रिकेट बरेच वेगळे असतं. हा खेळ पूर्णपणे संवादावर/आवाजांवर आधारित असतो. ‌‘बी-वन‌’ श्रेणीतील खेळाडू हे संपूर्णपणे अंध असतात, अर्थात त्यांना काहीच दिसत नसते. ‌‘बी-टू‌’ श्रेणीतील खेळाडूंना दोन ते तीन मीटर अंतरावरचे दिसत असते, तर ‌‘बी-थ्री‌’ श्रेणीतील खेळाडू जवळपास सहा मीटर अंतरावरचे बघू शकतात.

कसे खेळतात हे क्रिकेट : या दृष्टिबाधितांच्या क्रिकेट स्पर्धेत, गोलंदाज प्रथम यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षकांना विचारतो की, ते तयार आहेत का? नंतर फलंदाजाला विचारले जाते की, तुम्ही तयार आहात का? फलंदाजाने हो म्हटल्यानंतरच गोलंदाज खेळा (प्ले) असे म्हणत चेंडूफेक करतो. यष्टीरक्षक गोलंदाजाला कोणत्या रेषेवर चेंडू टाकायचा, याचे मार्गदर्शन करतो. दृष्टिबाधितांच्या क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या यष्टी धातूच्या बनलेल्या असतात. जेव्हा चेंडू यष्टीवर आदळतो तेव्हा एक मोठा आवाज येतो, जो खेळाडूंना यष्टी उडल्याची सूचना देतो. जेव्हा ‌‘बी-वन‌’ श्रेणीतील खेळाडू धावा काढतात, तेव्हा त्यांची प्रत्येक धाव ही दुप्पट मोजली जाते.

दृष्टिबाधितांची क्रिकेट संघटना : जागतिक अंध क्रिकेट परिषद (वर्ल्ड ब्लाईंड क्रिकेट काऊन्सिल) ही, अंध आणि अंशतः दृष्टिबाधित खेळाडूंसाठीच्या क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवस्थापन करणारी प्रमुख प्रशासकीय संस्था आहे. या संस्थेची स्थापना सप्टेंबर 1996 मध्ये दिल्ली येथे करण्यात आली. याचे संस्थापक अध्यक्ष जॉर्ज अब्राहम आहेत आणि सध्या या संस्थेचे मुख्यालय बंगळुरु येथे असून, ही संस्था जागतिक स्तरावर या खेळाचे नियंत्रण करते. विश्वचषक स्पर्धाही त्यांनी आयोजित केल्या होत्या. ‌‘वर्ल्ड ब्लाईंड क्रिकेट काऊन्सिल‌’च्या संस्थापक मंडळात, जॉर्ज अब्राहम (भारत)-अध्यक्ष, पीटर डोनोव्हन (ऑस्ट्रेलिया)-उपाध्यक्ष, टोनी हेगाट (इंग्लंड)-सरचिटणीस, मायकेल लिंके (ऑस्ट्रेलिया)-कोषाध्यक्ष, नील विजेरत्ने (श्रीलंका)-जनसंपर्क अधिकारी, डेनिस वेल्स (न्यूझीलंड)-सदस्य, जॉन लू (दक्षिण आफ्रिका)-सदस्य, डी. रंगनाथन (भारत)-सदस्य आणि आगा शौकत अली (पाकिस्तान)-सदस्य असे पदाधिकारी आहेत.

मुलींची नवी ओळख :
क्रिकेट खेळायला वेशीबाहेर पडणाऱ्या या मुलींना पाहून, आधी जे नाक मुरडायचे, त्याच लोकांचा आज या मुलींकडे, तसेच त्यांच्या पालकांकडे बघण्याच्या दृष्टिकोन आमूलाग्र बदलला आहे. अगदी खेळायला वेशीबाहेर पाऊल टाकणाऱ्या या मुली विदेशवारीही करत आहेत. या मुली आता छान छान कपडे घालत आहेत. आताच्या भारत भेटीदरम्यान रशियाच्या अध्यक्षांना मोदी भेटतात आणि राष्ट्रपतिभवनात द्रौपदी मुर्मू बोलावतात, तशाच भेटी घेण्याचे सौभाग्य आज या मुलींनाही या क्रीडाविश्वामुळे शक्य होत आहे.

प्रकाशात एकटे चालण्यापेक्षा अंधारात मित्रांसोबत चालणे चांगले असे ज्यांचे विचार होते, त्या अमेरिकेच्या हेलेन केलरचे सुविचार या 16 जणींनी प्रत्यक्षात उतरवलेले दिसतात. यांच्यांकडून सगळ्यांनीच प्रेरणा घेतली पाहिजे, त्यासाठी जिद्द, मेहनत व आत्मविश्वास मात्र अंगी बाणवला पाहिजे!

- श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत)
9422031704


Powered By Sangraha 9.0