Mangal Prabhat Lodha : जनआंदोलन उभारल्याशिवाय अवैध घुसखोरी थांबणार नाही

08 Dec 2025 13:31:30

Mangal Prabhat Lodha
 

मुंबई : (Mangal Prabhat Lodha) गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईला अवैध बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न सतावत आहे. मुंबईत राहणाऱ्या अवैध लोकांमुळेच अनेक दहशतवादी हल्ले झाले, याच प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणाऱ्यांवर हल्ले होतात किंवा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. नुकतेच, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यतामंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांना अशीच धमकी देण्यात आली. त्यानिमित्त दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’चे प्रतिनिधी चारूदत्त टिळेकर यांनी मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्याशी साधलेला संवाद...
 

काँग्रेसचे मालाड पश्चिमचे आ. अस्लम शेख यांनी तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली, ते प्रकरण नक्की काय होते?
 

पाच वर्षांपूव माझी मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर राजकीय जबाबदारी समजून अनेक प्रश्नांकडे लक्ष देत होतो. त्यादरम्यान मुंबईतील मालाड-मालवणी येथील एक प्रकरण माझ्याकडे आले होते की, तिथल्या हिंदूंना त्रास दिला जात आहे. मी तिथे गेल्यानंतर एक दलित कुटुंब मला भेटले, त्यांना तिथून हाकलवण्याचे प्रकार एका विशिष्ट धर्माचे लोक करत होते. त्यावेळी त्या कुटुंबाला प्रशासनाकडून संरक्षण मिळवून दिले. नंतर राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर पालकमंत्री म्हणून माझे त्याभागात हिंदूंच्या संरक्षणासाठी जाणे वाढले. त्यामुळे तिथले आ. अस्लम शेख यांना त्रास व्हायला लागला की, हा कोण लोढा, जो वारंवार माझ्या मतदारसंघात येतो आणि हिंदूंच्या संरक्षणाची काळजी करतो. माझ्या तिथे जाण्याने अवैध प्रकार थांबायला लागल्यानेच अस्लम शेख यांनी मला धमकी दिली.(Mangal Prabhat Lodha)
 

तुमच्या आणि त्यांच्या वादासंबंधी असे पहिल्यांदाच घडले आहे का, की आधीपासून हा वाद आहे?
 
माझा आणि त्यांचा वाद काय वैयक्तिक वाद नाही. मी मालाड-मालवणीतल्या हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी उभा राहिलो ही माझी चूक आहे, असे अस्लम शेख यांना वाटते आणि त्यातून त्यांनी माझ्यासोबत वैर घेतले. त्यामुळेच त्यांनी मला धमकी दिली. परंतु, त्यांनी दिलेली धमकी हे माझ्यासाठी नवीन नाही; कारण तो त्यांचा स्वभाव आहे. त्यांचा स्वभाव हा काही नवीन नाही, तो जुनाच आहे. कारण, त्याभागात ते दाऊद इब्राहिमसारखे वावरतात. मी मध्यंतरी तिथे एका शाळेच्या उद्घाटनाला गेलो असता त्यांनी आंदोलन केले की, तुम्ही इथे येऊन उद्घाटन कसे करू शकता? मालाड-मालवणी काय त्यांची वैयक्तिक मिळकत आहे का? त्यामुळे धमकावणे, गुंडागद करणे हा त्यांचा स्वभावच आहे आणि त्याच स्वभावातून त्यांनी मला धमकी दिली.(Mangal Prabhat Lodha)
  

मुंबईतील सरकारी जमिनींवरील अतिक्रमणाचा प्रश्न किती गंभीर आहे आणि त्यामागील मुख्य कारणे कोणती?
 

सरकारी जमिनींवरील अवैध घुसखोरांचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे. मुंबईत सरकारी जमिनींवरील अतिक्रमणाला ‌’मालवणी पॅटर्न‌’ हा प्रचलित शब्द आहे. या पॅटर्नच्या माध्यमातून बाहेरच्या देशातील लोक इथे आणले जातात, त्यांना सरकारी जमिनींवर स्थायिक केले जाते, आर्थिक मदत केली जाते, नंतर त्यांची कागदपत्रे काढून मतपेटी वाढवली जाते. माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 100 एकर सरकारी जमीन मागच्या 15 ते 20 वर्षांमध्ये नुसत्या मालवणीत बळकावली गेली आहे. त्यामध्ये 70 ते 80 टक्के एकाच धर्माच्या लोकांना बसवण्यात आले आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे मतपेटीचे राजकारण हेच एक आहे.(Mangal Prabhat Lodha)
 

हेही वाचा : शेतकऱ्यांचा डिजिटल साथी  
 


मुंबईतील कोणत्या भागांमध्ये सर्वाधिक अतिक्रमण आढळते? घुसखोरी कशा पद्धतीने केली जाते म्हणजे घुसखोरांचे काही टप्पे ठरलेले असतात का?
 

मुंबईतील ज्या भागात एका विशिष्ट धर्माचे लोक दहा ते 15 टक्के होते. त्याच भागात सरकारी जमिनींवर सर्वाधिक अतिक्रमणे पाहायला मिळतात. तिथला समुदाय जास्तीत जास्त कसा वाढवायचा, यासाठी एक नियोजित पद्धती पाहायला मिळते. मोहम्मद अली रोड, नागपाडा, कुर्ला, मानखुर्द, वर्सोवा आणि मालवणी याठिकाणी अशी अतिक्रमणे आहेत. जमिनींवर अतिक्रमण करणे हा त्यांचा मुख्य उद्देश नसून इथले सामाजिक परिवर्तन बदलणे, कायदे आणि नियम बदलणे, राजकीय पार्श्वभूमी बदलणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल, तर त्यासाठी आपल्याला आसाम आणि पश्चिम बंगालकडे पाहायला हवे. त्यातून वेळीच जागृत व्हायला हवे.(Mangal Prabhat Lodha)
 

घुसखोरीला स्थानिक राजकीय नेत्यांचे बळ आहे, असे तुम्हाला वाटते का?
 

स्थानिक नेत्यांचे पाठबळ असल्याशिवाय घुसखोर अशी हिंमत करूच शकत नाहीत. यामध्ये घुसखोर त्यांना मत देतात आणि स्थानिक नेते त्यांना सुरक्षा देतात, अशी ती एक साखळी आहे. जोपर्यंत यावर एखादे जनआंदोलन उभे राहात नाही, तोपर्यंत स्थानिक नेते असेच वागणार. हे पुढे जाऊन मुंबईसाठी खूप धोकादायक ठरणार आहे.(Mangal Prabhat Lodha)
 

अनेकदा दिसते की, अतिक्रमणमुक्त झालेल्या जमिनींवर काही दिवसांनंतर परत अतिक्रमणे होतात; हे टाळण्यासाठी प्रशासन कोणती ठोस योजना वापरू शकते?
 

प्रामाणिकपणे सांगायचे तर, आजचे प्रशासन फार काही चांगले नाही. मी सहपालकमंत्री म्हणून आदेश दिला की, प्रत्येक वष 100 एकर जमीन रिकामी करून त्याजागी उद्यान, मुलांच्या खेळाचे मैदान, शाळा, दवाखाने, सरकारी पार्किंग यासाठी त्याचा वापर करावा. ते काम करायला आता सुरुवात झाली आहे.(Mangal Prabhat Lodha)
 

जर मुंबईची सत्ता तुमच्या पक्षाच्या हातात आली तर दीर्घकालीन सुरक्षितता राखण्यासाठी आणि शासनाच्या मोकळ्या जमिनींचे संरक्षण करण्यासाठी कोणती पावले उचलणार?
 

केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आहे. आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईत सत्ता येणार आहे. परंतु, हा सत्तेचा मुद्दा नाही. अशा प्रश्नांवर आवाज उठवणे हा आमचा संस्कार आहे. हा संस्कार आम्हाला आणि विशेषतः मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेला आहे. त्यामुळेच आमची सत्ता असो किंवा नसो; आम्ही या प्रश्नावर कायमच लढणार आहोत. कारण हा आमचा राजकीय मुद्दा नसून देशाच्या सुरक्षिततेचा आणि संप्रभुतेचा मुद्दा आहे. कारण याकुब मेननच्या जनाज्यामध्ये सुरुवातीला दीडशे लोक होते, शेवटी 15 हजार झाले. हे सर्व लोक कुठून आले? नंतर लक्षात आले की, दुबईतून त्यांच्या गुप्त कारवाया करणाऱ्यांना फोन आले आणि त्यांनी सर्व लोकांना गोळा केले. त्यामुळे यामागे विदेशी षड्‌‍यंत्र आहे आणि जोपर्यंत मुंबईला आपली मानणाऱ्यांना अवैध घुसखोर देशाबाहेर काढले जावेत, असे वाटणार नाही, तोपर्यंत ही समस्या संपुष्टात येऊ शकत नाही. यासाठी जनआंदोलन उभारायलाच हवे.(Mangal Prabhat Lodha)
 
 

Powered By Sangraha 9.0