जगातील सर्वांत शक्तिशाली देश’ अशी ओळख असलेले राष्ट्र म्हणजे अमेरिका. या शक्तिशाली राष्ट्राचं अध्यक्षपदही तितकंच महत्त्वाचं. आता क्रमाने या पदावर असलेल्या माणसाच्या इच्छा-आकांक्षा, त्यांच्या अनुयायांच्या इच्छा यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना यावषचे शांततेचे नोबेल पारितोषिक दिले जाणार का? याविषयी समाजमाध्यमांवर बराच खल सुरू होता. ट्रम्प यांनी जगामध्ये शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर त्यांना हा मानाचा किताब देण्यात यावा, अशी मागणीसुद्धा त्यांच्या समर्थकांनी केली होती. अर्थात, नोबेल समितीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच सुरु होते. त्यामुळे नोबेलचा हार यावर्षी त्यांच्या गळ्यात काही पडला नाही. मात्र, आता ट्रम्प यांच्या समर्थकांची ही इच्छा ‘फेडरेशन इंटरनॅशनल दे फूटबॉल असोसिएशन’ अर्थात ‘फिफा’च्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. यंदाच्या वष पहिल्यांदाच दिला गेलेला ‘फिफा पीस प्राईज’ पुरस्कार ट्रम्प यांना प्रदान करण्यात आला. अमेरिकेतील वॉशिंगटन डी सी येथे दि. 5 डिसेंबर रोजी झालेल्या एका सामन्यादरम्यान, ट्रम्प यांना हा पुरस्कार ‘फिफा’चे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी दिला. ट्रम्प यांनी हा बहुमान स्वीकारल्यानंतर बऱ्याच उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे इस्रायल आणि हमास, काँगो आणि रवांडा आदी देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्ष काही प्रमाणात कमी झाला असून, ही राष्ट्र शांततेच्या मार्गावर वाटचाल करीत असल्याचेे मत अनेकांनी मांडले. गाझातील युद्धबंदी ट्रम्पच करु शकतात, असा विचारही अनेक राजकीय तज्ज्ञांनी मांडला. अर्थात, हा युद्धविरामाचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाला आहे का? तर, नाही असेच म्हणावे लागते. परंतु, ट्रम्प यांनी सत्तेची सूत्रं हाती घेतल्यापासून, ते विश्वशांतीसाठी कसे कटिबद्ध आहेत, असे वारंवार त्यांच्या प्रशासनाच्या माध्यमातून सूचित केले जात आहे. ‘फिफा’ या संस्थेचे अध्यक्षपद भूषवणारे जियानी इन्फँटिनो ट्रम्प यांचे निकटवतय. ट्रम्प यांच्या कार्याचा गौरव व्हावा, असे त्यांना वाटले नाही तरच नवल. मध्यंतरी माध्यमांशी संवाद साधताना जियानी इन्फँटिनो म्हणाले होते की, ’ट्रम्प यांनी गाझामध्ये घडवून आणलेल्या युद्धविरामासाठी, त्यांना शांततेचं नोबेल पारितोषिक मिळायला हवं.’ त्यांच्या या मताची, नोबेल समितीने दखल घेतली नसली, तरी त्यांच्या सत्ताचौकटीमध्ये ते आवश्यक तो निर्णय घेऊच शकतात. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ‘फिफा पीस प्राईज - फूटबॉल युनाईट्स द वर्ल्ड’ या पारितोषिकाची घोषणा नोव्हेंबर महिन्यामध्ये झाली. या पुरस्काराची माहिती देताना जियानी म्हणाले की, ’आजच्या विभाजित जगामध्ये संघर्ष संपवण्यासाठी आणि शांततेच्या भावनेने लोकांना एकत्र आणण्यासाठी, परिश्रम करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार दरवष दिला जाणार आहे.’ या अनुषंगाने ट्रम्प यांना पुरस्कार देत, त्यांच्या समर्थकांची दुधाची तहान ताकावर भागवण्याचे काम झाल्याचे दिसून येते.
आता जियानी यांनी ट्रम्प यांचा गौरव करण्याचा निर्णय घेतल्यावर, अमेरिकेमध्ये वादाला तोंड फूटले नसते तरच नवल. सर्वप्रथम ट्रम्प यांना हा पुरस्कार जाहीर करण्याच्या काही तासांपूवच, अमेरिकेच्या लष्कराने कॅरिबियन जवळ एका बोटीवर एअर स्ट्राईक केला. यूएस सदर्न कमांडने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या एअर स्ट्राईकमध्ये ज्या बोटीचा खात्मा करण्यात आला, ती एका दहशतवादी संघटनेशी जोडलेली असून, या बोटीमध्ये अमली पदार्थांचा साठा होता. ट्रम्प यांच्या अशा धडक कारवायांवर, अनेकांनी यापूवही तोंडसुख घेतले होते. जियानी यांनाही या पुरस्कारामुळे टीकेचा धनी व्हावे लागले, कारण ‘फिफा’ या संस्थेने वारंवार राजकीय तटस्थतेची भूमिका घेतली होती.
जगाच्या पाठीवर फूटबॉलचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. यापूव फुटबॉलच्या खेळादरम्यान, अनेक खेळाडूंनी राजकीय वक्तव्य करून लोकांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवलं होतं. त्यावेळी ‘फिफा’ने अशा खेळांडूवर कडक कारवाई केली होती. ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जरी असले, तरी ते एका विशिष्ट राजकीय विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात. अशा नेत्याचा गौरव केल्यावर, त्या संस्थेच्या विश्वसार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे नैसर्गिकच किंबहुना, खऱ्या अर्थाने स्वायत्त संस्थांच्या खऱ्या स्वायत्तेबद्दलचे वास्तवच यातून दिसून येते.