या हुमायूनचे करायचे काय?

08 Dec 2025 11:57:47

पश्चिम बंगाल ही एकतेची भूमी आहे, टागोर, नजरुल, रामकृष्ण आणि विवेकानंदांची भूमी आहे, याचे स्मरण आज ममता बॅनर्जी यांना झाले आहे. तसेच बंगालच्या शतकानुशतके जुन्या सहअस्तित्वाच्या परंपरेची आठवण करत त्यांनी एकता आणि सुसंवादाची गरज व्यक्त केली आहे. हुमायूनच्या बाबरी उभारणीनंतरची ही उपरती आहे.

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचा आमदार हुमायून कबीर याने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधाला न जुमानता, दि. 6 डिसेंबर रोजी मुर्शिदाबाद येथे बाबरी मशीदीची वीट रचली. न्यायालयाच्या दणक्यामुळे ममता बॅनर्जी यांना ‌‘वक्फ विधेयका‌’चा स्वीकार करावा लागल्यानंतर, तेथील मुस्लीम समाज अस्वस्थ झालेला असतानाच, हुमायून कबीर याने बाबरी मशिदीच्या उभारणीची घोषणा केली, हे लक्षात घ्यावे लागेल. ममता यांनी लगेचच, त्याला निलंबित केले. तथापि, त्याने शनिवारी बाबरी पतनाच्या दिवशीच बंगालमध्ये नव्या बाबरीची पायाभरणीही केली. मुर्शिदाबाद येथे बाबरी मशिदीची पायाभरणी झाल्यानंतर, ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशिदीचे स्मारक बांधण्याची घोषणा करण्यात आली. अयोध्येत मशिदी पाडल्याच्या 33व्या वर्धापन दिनानिमित्त, ‌‘तहरीक मुस्लीम शब्बान‌’ संघटनेने ही घोषणा केली. एकीकडे, देशातील मुस्लीम समाज म्हणतो की, त्यांचा औरंगजेबाशी काहीही संबंध नाही. दुसरीकडे या औरंग्याची हुमायूनसारखी अनौरस पिलावळ, बाबरी उभी करण्यावरच अडून राहते. आमचा विरोध मशीद उभारणीला नसून, ती बाबराच्या नावाने उभारण्याला आहे हे सुरुवातीलाच स्पष्ट करावे लागेल. जर औरंग्या तुमचा कोणीही लागत नाही, तर मग बाबराच्या नावासाठी हुमायून इतका आग्रही का? याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल.

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाने ‌‘एसआयआर मोहीम‌’ हाती घेतल्यानंतर, ममतादीदी या कमालीच्या अस्वस्थ झाल्या आहेत. मतदारयादीतील त्यांची हक्काची घुसखोरांची मतपेढी, या मोहिमेमुळे कायमची उद्ध्वस्त होणार आहे. दुबार नोंदणी, मृत मतदार, घुसखोर अशी सगळी नावे यादीतून कमी होणार आहेत. सुमारे सव्वा कोटी घुसखोर बंगालमध्ये असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूवच ‌‘एसआयआर मोहिमे‌’त कोणताही अडथळा येऊ नये, याची काळजी संबंधित राज्य सरकारांनी घ्यावी, असे निर्देश दिले आहेत. ‌‘बीएलओं‌’ना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची जबाबदारीही राज्य सरकारने घ्यायची आहे. म्हणजे, ही मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारीच न्यायालयाने सुनिश्चित केली आहे. मतदारयाद्या निर्दोष झाल्यानंतर, आपण विजयी होऊ का? या चिंतेत ममता दीदी असतानाच, त्यांच्याच पक्षाच्या हुमायून कबीर याने बाबरीची पायाभरणी करत, त्यांच्या काळजीत भर घातली आहे.

बंगालमधील एकगठ्ठा मुस्लीम हे ममता बॅनर्जी यांच्या पारड्यात भरभरून मते टाकतात. म्हणूनच, डाव्यांचा बालेकिल्ला अशी ज्या बंगालची ओळख होती, त्याच बंगालमधून डाव्यांचे राजकीय अस्तित्व मिटविण्यात त्या यशस्वी ठरल्या. काँग्रेसच्या हातातून हे राज्य केव्हाच गेले आहे. मात्र, आता हुमायून याने नवीन पक्षाची स्थापना करणार असल्याचे सांगत, ममता यांच्यासमोरील अडचणी वाढवल्या आहेत. आपला पक्ष बंगालमध्ये ओवेसींच्या ‌‘एमआयएम‌’सोबत 135 जागा लढवेल, अशी घोषणाच हुमायून याने केली आहे. म्हणजेच, हा हुमायून बंगालमधील निवडणुकीची सारी समीकरणे बदलणार, अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. हुमायून याला ममतांनी पक्षातून बडतर्फ केले असले, तरी त्याच्या या कृतीला ममतांचाच पाठिंबा आहे अशी भावना तेथील हिंदूंमध्ये आहे. त्याचवेळी, ममता यांच्याविरोधात मुस्लीम समाज कमालीचा नाराज झाला आहे.

ममता यांना आज बंगाल ही रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांची भूमी असल्याची उपरती झाली आहे. बंगाल ही एकतेची भूमी आहे, टागोर, नजरुल, रामकृष्ण आणि विवेकानंदांची भूमी आहे. ती कधीही फुटीरतावादी शक्तींसमोर झुकली नाही आणि कधीही झुकणार नाही. राज्यात हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, जैन आणि बौद्ध नेहमीच शेजारी शेजारी राहात आले आहेत याचे त्यांनी स्मरण केले असून, बंगालच्या शतकानुशतके जुन्या सहअस्तित्वाच्या परंपरेवर प्रकाश टाकत, एकता आणि सुसंवादाची गरज व्यक्त केली आहे. जेव्हा संदेशखलित महिलांवर अत्याचार होत होते, त्यांचे शोषण होत होते, तेव्हा ही भूमी एकतेची आहे याचे त्यांना स्मरण का झाले नाही? निवडणुकीतील रक्तरंजित हिंसाचारात बंगालमधील निरपराध सामान्य कार्यकर्त्यांचा बळी घेतला गेला, त्यावेळी एकता आणि सुसंवादाची आवश्यकता त्यांना का वाटली नाही? हा प्रश्न आज उपस्थित होतो.

भाजपला बंगालमध्ये रोखण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणाऱ्या ममतांनी, हुमायून याला बाबरीची पायाभरणी करण्यापासून का रोखले नाही? ‌‘बंगालची वाघीण‌’ अशी त्यांची तेथील जनमानसांत ओळख प्रचलित आहे. ही वाघीण त्यावेळी का गप्प बसली? आज ती अचानक एकतेची, समतेची भाषा बोलू लागली आहे. हिंदू संघटित झाल्याने येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला पराभवाचा सामना करावा लागू शकतो, या वास्तवाची त्यांना जाणीव झाल्यामुळेच त्यांच्या भूमिकेत 180 अंशाचा फरक झाला का? असे अनेक प्रश्न म्हणूनच उपस्थित होतात. हुमायून याच्या कृतीचा तृणमूल काँग्रेसला लक्षणीय फटका बसणार आहे. या घटनेने तृणमूलच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ममता यांच्या दीर्घकालीन राजकीय ओळखीचा तो प्रमुख आधार राहिला आहे. या घटनेमुळे बंगालमधील सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, ती खरीही आहे. या सर्व घडामोडींमुळे तृणमूलमध्येही अंतर्गत अस्थिरता निर्माण झाली असून, ममता यांच्या नेतृत्वावर अप्रत्यक्ष दबाव वाढतो आहे. ममता यांनी सांप्रदायिकतेविरुद्ध कठोर भूमिका घेत असल्याचे त्या भासवत असल्या, तरी या घटनेने जे नुकसान व्हायचे आहे, ते झालेच आहे.

बाबरी मशीदच का? याचे उत्तर मात्र, केवळ हुमायूनच देऊ शकतो. धार्मिक तेढ निर्माण करत, त्याचा राजकीय फायदा घ्यायचा, हा त्याचा स्वार्थ झाला. मात्र, अशा धर्मांधांना जवळ करायचे का? याचा निर्णय तेथील मुस्लीम समाजाने घ्यायचा आहे. अशा धर्मांधांमुळेच संपूर्ण मुस्लीम समाज बदनाम होतो, त्याच्यावर अतिरेकी शिक्का बसतो. अशा बाबराच्या अनौरस अवलादींचे उच्चाटन करण्याची गरज म्हणूनच तीव्र झाली असून, पश्चिम बंगालमधून त्याची सुरुवात झाली तर ते देशाच्या हिताचेच ठरणार आहे. ममता यांनी म्हटल्याप्रमाणेच, बंगाल ही एकतेची भूमी आहे, टागोर, नजरुल, रामकृष्ण आणि विवेकानंदांची भूमी आहे. या भूमीतील रक्तरंजित हिंसाचार संपुष्टात आणणे, ही काळाजी गरज आहे. येत्या निवडणुकीत तेथील जनता या हुमायूनला त्याची योग्य ती जागा दाखवून देईल, असे म्हणूनच म्हणता येते.


Powered By Sangraha 9.0