
मुंबई : सिनेविश्वात प्रत्येकाचा एक काळ असतो असं म्हटलं जातं. पण काही कलाकार त्याला अपवाद ठरत आहेत. काहींनी पन्नाशी ओलांडली आहे, तर काहींनी वयाच्या साठीचा टप्पासुद्धा ओलांडला आहे. पण तरीही त्यांच्या अभिनयाचा बोलबाला कायम आहे. आणि यातच सध्या गाजत असलेलं नाव म्हणजे अभिनेता अक्षय खन्ना. हे संपूर्ण वर्ष अक्षय खन्नानेच गाजवलं असं म्हणता येईल. त्यातच नुकताच आलेला 'धुरंधर' हा सिनेमा. या सिनेमानंतर पुन्हा एकदा अक्षय खन्ना ट्रेंड होताना दिसत आहे. त्याच्या रहमान डकैत या भूमिकेची विशेष चर्चासुद्धा होत आहे.
दरम्यान यावर्षाच्या सुरुवातीच्या काळात 'छावा' या सिनेमा आला होता. त्यातील खतरनाक विलन औरंगजेबाची भूमिका त्याने साकारली होती. आणि त्यातील त्याचा अभिनय अक्षरशः प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा होता. असंच काहीसं आता 'धुरंधर' या सिनेमाच्या बाबतीतसुद्धा घडताना दिसत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत रणवीर सिंग झळकला असला तरीही ३ दिवसात १०० कोटींचा गल्ला जमवणाऱ्या या चित्रपटाचा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे ते रहमान डकैत म्हणजेच अक्षय खन्ना यानेच.
धुरंधर हा सिनेमा आदित्य धार याने दिग्दर्शित केला आहे. तर या चित्रपटात रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, आर. माधवन, राकेश बेदी, सारा अर्जुन आणि अक्षय खन्ना अशी मोठी स्टारकास्ट आहे. तरीही अक्षयचा जलवा सगळीकडे पाहायला मिळत आहे. दरम्यान, धुरंधर चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासूनच त्याची प्रचंड चर्चा सुरु होती. आणि पात्रांविषयीसुद्धा प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता होती. ५ डिसेंबर रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. आणि तेव्हापासून सोशल मीडियावरसुद्धा सिनेमातल्या डायलॉग्सपासून ते गाण्यांपर्यंत सगळंकाही ट्रेंड होत आहे.
या चित्रपटाला ’सेन्सॉर बोर्डा’ने ‘ए’ प्रमाणपत्र दिले आहे. कारण, चित्रपटात बरेच हिंसक आणि हादरवणारी दृश्ये आहेत. तसेच हा चित्रपट शहीद मेजर मोहित शर्मा यांच्या जीवनावर आधारित असल्याच्या चर्चांना देखील आता पूर्णविराम मिळाला आहे. दिग्दर्शक आदित्य धार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत, याविषयी स्पष्टपणे नकार दिला आहे. मेजर शर्मा यांच्या पालकांनी चित्रपटातील कथानकावर आक्षेप घेतल्याने ‘केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळा’(‘सीबीएफसी’)कडून चित्रपटाचे पुनर्परीक्षण करण्यात आले. त्यानंतर निर्माते आणि दिग्दर्शक यांनी चित्रपट कोणाचेही आत्मचरित्र नसल्याचे जाहीर केले. दिल्ली उच्च न्यायालयानेही ‘सीबीएफसी’ला कुटुंब आणि त्यांचे मत विचारात घेण्याचे निर्देश दिले होते. पुनर्परीक्षणानंतर मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी मंडळाने आपला निर्णय जाहीर करत, ‘धुरंधर’ हा पूर्णपणे काल्पनिक चित्रपट असून, त्याचा मेजर शर्मा यांच्या जीवनाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आणि चित्रपटाला प्रदर्शनाची परवानगी दिली.