शेतकऱ्यांचा डिजिटल साथी

08 Dec 2025 12:49:43

प्रत्येक गावात वेगवेगळे कृषिव्यवसाय उभे करत, ग्रामीण भारताचे सशक्तीकरण करण्याचा वसा घेतलेले ‌‘फार्म स्कूल‌’चे निर्माते सुधीर पवार यांच्याविषयी...

शेतीचे भविष्य तंत्रज्ञानात दडलेले आहे, हे वाक्य फक्त सांगून, थांबणाऱ्यांपैकी सुधीर पवार नाहीत तर ते त्यावर कृती करणाऱ्यांपैकी आहेत. ग्रामीण भारतातील तरुणांना उद्योजक बनवण्याचा ध्यास आणि शेतीतील नवकल्पनांना डिजिटल जगाशी जोडण्याची कल्पना, या दोन्हींची परिणीती म्हणजे ‌’फार्म स्कूल.‌’ सोलापूरमधील एका छोट्याशा गावातून सुरू झालेला हा तरुणाचा प्रवास, आज हजारो शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

सोलापुरातील वैराळ हे गाव असलेल्या सुधीर यांनी बाश येथे शिक्षण घेत असतानाच, समाजमाध्यमांचे महत्त्व ओळखले होते. प्रामुख्याने ग्रामीण भागात माहितीचा स्रोत म्हणून, समाजमाध्यमांचा आधार मोठ्याप्रमाणात होत असल्याचे जाणले. त्यामुळे सुधीर यांनी पुण्यातील गरवारे महाविद्यालयात माध्यमविद्या आणि जनसंपर्क विषयाचा अभ्यास करण्यासाठी, पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला. शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून, सुधीर यांनी काही डॉक्युमेंट्री आणि फिल्म्सचे एडिटिंग करणे सुरूच ठेवले होते. या सर्व प्रक्रियेत 2024 हे साल उजाडले.

आपल्या मित्रांशी आणि सहकाऱ्यांशी चर्च करत असतानाच, सुनील आणि त्यांच्या मित्रांना ‌’फार्म स्कूल‌’ ही एक नवीन संकल्पना सुचली. शेती संदर्भातील सर्व व्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणणे, हाच या संकल्पनेचा मूळ पाया होता. शेतीमध्ये नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्म देण्याचा उद्देश घेऊनच, ‌’फार्म स्कूल‌’चा जन्म झाला. ज्या शेतकऱ्यांना नवीन प्रयोग करायचे असून, जागा कमी आहे किंवा मार्गदर्शन हवे आहे, अशा शेतकऱ्यांना ‌’फार्म स्कूल‌’ मार्गदर्शन करते. कमीत कमी गुंतवणूक करत अधिकाधिक नफा कसा घ्यावा, यासाठी सुधीर आणि त्यांची टीम आज काम करते. ‌’फार्म स्कूल‌’ उभारण्याचे ठरल्यानंतर, उद्दिष्टाला साजेशा कृषी व्यवसायांचा शोध घेण्याचे आव्हान सुधीर यांच्यासमेोर होते. त्यामुळे कमी खर्चात बाराही महिने घेता येतील, अशा व्यवसायांचा शोध त्यांनी सुरू केला.

सुधीर यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. सुधीर यांनी त्यांच्या केसर शेतीविषयीचा पहिला कोर्स शूट केला. त्यांच्या या विषयाला युट्यूब आणि समाजमाध्यमांत खूपच प्रसिद्धी मिळाली. ‌’फार्म स्कूल‌’चा हा पहिलाच प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. दुसरा कोर्स हा मशरूम शेतीचा होता. आळेफाटा येथील अमर बडूळे यांनी, आपल्या छोट्या जागेत मशरूम शेतीचे एक आदर्श प्रारुप उभारले आहे; त्यांचीच यशोगाथा सुनील यांनी सगळ्यांसमोर आणली. केवळ एखादा व्यवसाय शूट करणे इतक्यावरच सुधीर पवार आणि त्यांची टीम मर्यादित नव्हती, तर शहरातील लहान जागांमध्ये कमी गुंतवणूकीसह हा व्यवसाय कसा सुरू करता येईल, हेदेखील त्यांनी समजावून घेतले. यासाठी विविध घटाकांचा सर्वसमावेशक विचार त्यांनी केला.

यातूनच ‌’फार्म स्कूल‌’ हे शेतीविषयक ट्रेनिंग स्कूल म्हणून प्रसिद्ध झाले. सुधीर आणि त्यांची टीम शेतकरी किंवा व्यावसायिकांना मार्गदर्शन तर करतेच, मात्र त्यांना व्यवसाय उभा करण्यासाठी आणि उत्पादनाची बाजारात थेट विक्री करण्यासाठीची संपूर्ण साखळीही उभी करून देते. सुधीर सांगतात की, “आमच्याकडे मार्गदर्शन घेणारी प्रत्येक व्यक्ती कृषिक्षेत्रात आपले पाय रोवून उभी राहिली पाहिजे, हेच आमचे मुख्य ध्येय आहे. कृषी व्यवसाय टिकला पाहिजे, यासाठी आम्ही काम करतो. आम्ही प्रॅक्टिकल ॲडव्हान्स ट्रेनिंग, बिझनेस मेंटोरिंग आणि मार्केट लिंकेज सपोर्ट करतो. म्हणजेच बिझनेस सस्टेन होईपर्यंत, एंड-टू-एंड सपोर्ट करतो. यासाठी आम्हाला मार्केट कम्युनिटी तयार करायची आहे, जेणेकरून आम्ही कृषिव्यवसायाला बायबॅक किंवा लिंकेज सपोर्ट सिस्टमचा वापर करून सस्टेन करू शकू,”

“फार्म स्कूलच्या माध्यमातून सध्या नऊ अभ्यासक्रम सुरू आहेत. यात काही ऑफलाईन ट्रेनिंग आहेत. यात मशरूम शेती, मोतीपालन आणि केसर शेती यांचा समावेश आहे. राहुरी आणि छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशील शेतकऱ्यांनी केसर शेतीचे मार्गदर्शन घेत, स्वतःचे प्रकल्प सुरू केले असून, त्यातून चांगले उत्पन्नही निघते आहे. मशरूम शेतीतूनही अनेक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी ट्रेनिंग घेतले, स्वतःचे प्रकल्प उभारले आणि उत्पादन घेऊन आता ते बाजारात विक्री करत आहेत. हे अत्यंत आनंददायी आहे,” असे सुधीर सांगतात.

“फार्म स्कूलच्या माध्यमातून आम्हाला ग्रामीण भारतात नवे उद्योजक तयार करायचे आहेत. स्थानिक रोजगारनिर्मिती करायच्या आहेत. प्रत्येक गावात प्रत्येक वेगवेगळे व्यवसाय तयार झाल्यासच, ग्रामीण भारत स्वयंपूर्ण होईल,” असेही फार्म सुधीर म्हणतात. सुधीर यांची वाटचाल सांगते की, कल्पना मोठी असण्याबरोबरच, ती जिद्दीने राबवणेही आवश्यक आहे. हे शक्य झाल्यासच, तिचा प्रभाव मोठा असतो. ‌’फार्म स्कूल‌’ही केवळ एक संस्था नाही, ती ग्रामीण भागातील तरुणांच्या भविष्याची पायाभरणी आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीला नवी ओळख देणारा हा प्रवास आता सुरू झाला आहे. ‌’फार्म स्कूल‌’ आणि सुधीर पवार यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी, दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’च्या अनेकानेक शुभेच्छा!

9096284606

Powered By Sangraha 9.0