अवकाश वसाहत ते ‘एआय’: विज्ञानकथांची अद्भुत मुशाफिरी

07 Dec 2025 12:37:00
 
Kshitij Desai
 
क्षितिज देसाई या युवा विज्ञान कथाकाराच्या लेखणीतून साकारलेला दुसरा विज्ञान कथासंग्रह ‘शीतपेटीतून जेव्हा जाग येते...’ नुकताच प्रकाशित झाला. ‘सृजनसंवाद प्रकाशना’च्या माध्यमातून हे पुस्तक वाचकांच्या हाती सोपवण्यात आले असून, अनेक मान्यवरांनी या कथासंग्रहाचे स्वागत केले आहे. या आगळ्यावेगळ्या कथासंग्रहाच्या निमित्ताने लेखकाशी साधलेला संवाद...
 
सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस’ हा आपला पहिला कथासंग्रह काही वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता आणि आता आपला दुसरा कथासंग्रह ’शीतपेटीतून जेव्हा जाग येते...’ प्रकाशित होतो आहे. काय भावना आहेत आपल्या?
 
हो, माझा पहिला कथासंग्रह पाच वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता. त्यानंतरच्या वर्षापासून ते यावर्षीपर्यंत नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या विज्ञानकथा या नव्या ’शीतपेटीतून जेव्हा जाग येते...’ कथासंग्रहात आहेत. या कथा एकत्रितपणे पुस्तकरूपात आल्याने गाभा विज्ञानकथा असला तरी कालप्रवास, अवकाश वसाहती, ‘एआय’ अशा वेगवेगळ्या उपप्रकारांचा आस्वाद वाचकांना एकाच पुस्तकात मिळेल, याचा आनंद आहे.
 
आपण कथालेखन करताना विज्ञानकथा लिहिण्याचा निर्णय का घेतला?
 
माझ्या कथालेखनाची सुरुवात सामाजिक लघुकथांपासून झाली. त्यातल्या काही कथांना विविध कथास्पर्धांतून पारितोषिकेही मिळाली असली; तरी विज्ञानकथा हा प्रकार विशेष आवडीचा आहे. ‘व्हॉट-इफ’ या शयतेचा पुरेपूर उपयोग विज्ञानकथेत करता येतो. विचारवंत राल्फ वाल्डो इमर्सन यांचं वाय आहे- "कल्पित साहित्यातून ते सत्य उजेडात येतं, जे वास्तवतेनं झाकून ठेवलेलं असतं.” विज्ञानाचा पाय भक्कम ठेवून कल्पिताची उंच भरारी विज्ञानकथेत मारता येते.
 
भारतीय, तसेच जागतिक स्तरावर आपले आवडते विज्ञान कथाकार, विज्ञान लेखक कोणते? त्यांचा तुमच्या लिखाणावर प्रभाव आहे का?
 
डॉ. जयंत नारळीकर, लक्ष्मण लोंढे हे सर्व वाचकांप्रमाणे माझेही आवडते लेखक होते. नवं पुस्तक मी निरंजन घाटे, डॉ. बाळ फोंडके आणि सुबोध जावडेकर यांना अर्पण केलं आहे. मराठीतल्या समकालीन लेखकांमध्ये डॉ. संजय ढोले, डॉ. मेघश्री दळवी, आशिष महाबळ, नील आर्ते यांच्या कथा भन्नाट असतात. जागतिक लेखकांमध्ये अ‍ॅन्डी वियरच्या ‘मार्शियन’, ‘प्रोजेट हेल मेरी’ या कादंबर्‍या, तसेच स्टीव्हन मॉफेट आणि रसेल डेव्हिस यांनी लिहिलेले ‘डॉटर हू’ मालिकेचे एपिसोड आवडतात. माझ्या पहिल्या विज्ञानकथेवर (माझा पॅराडॉस) डॉ. जयंत नारळीकरांच्या शैलीचा प्रभाव होता, हे मला आता जाणवतं. मात्र, नंतर लिहिलेल्या कथा जाणीवपूर्वक नव्या सजगतेनं लिहिल्या.
 
आपल्या अभियांत्रिकीच्या कामाचा आपल्या लेखनामध्ये कसा उपयोग होतो?
 
लेखकाला त्याच्या आयुष्यातली पात्र, घटना यांतून ‘रॉ-मटेरिअल’ मिळत असतंच. शिवाय, अभियांत्रिकीतल्या ’प्रॉब्लेम-सॉल्व्हिंग’ गुणाचा उपयोग कथानकातला संघर्ष प्रभावी रेखाटण्यात होतो. संगणक अभियांत्रिकीच्या कामात सतत अद्ययावत राहणं गरजेचं असतं. रोजच्या कामासाठी नवं तंत्रज्ञान, संशोधन शिकताना आपोआपच एका बाजूला त्याचं कथारूप दिसू लागतं.
 
विज्ञानकथा लिहिताना आपल्यासमोर काय आव्हानं जाणवतात?
 
विज्ञानकथा लिहिताना त्यात येणारं तंत्रज्ञान, संशोधन याचं ’एस्पोझिशन’ कथेच्या प्रवाहात प्रभावीपणे मांडणं आव्हानात्मक वाटतं. कारण, ते अगदी अकादमिक पद्धतीचंही नसावं आणि बाळबोधही होऊ नये, असा मध्य गाठणं अवघड ठरतं. तसंच कथेचा आत्मा विज्ञानाच्या प्रभावापुढे झाकोळून जाणार नाही, याचीही काळजी घेणंही महत्त्वाचं असतं.
 
मराठी साहित्यविश्वामध्ये विज्ञानकथांची परंपरा आहे, या परंपरेचा वाचकवर्ग अजूनही टिकून आहे का? आपल्याला काय वाटतं?
 
‘धनंजय’, ‘नवल’ आणि अन्य काही दिवाळी अंकांत विज्ञानकथेचा विशेष विभाग असतो. ते वाचणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही आहे. ’भास’ या अनियतकालिकात विज्ञानकथेला आवर्जून स्थान आहे. यांत लिहिणार्‍या लेखकांना येणारे वाचकांचे अभिप्राय पाहिल्यास वाचक आजही विज्ञानकथा आवडीने वाचतात, हे लक्षात येतं. येणार्‍या नवनव्या विज्ञानसाहित्याची माहिती वाचकांपर्यंत पोहोचली, तर त्याचं सर्वच वयोगटात स्वागत होतं हा अनुभव आहे.
 
मराठीत विज्ञानकथा लेखन करू इच्छिणार्‍या नवीन लेखकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
 
कथेसाठी विज्ञान की विज्ञानासाठी कथा, हे मतप्रवाह विज्ञानकथेत आहेत. प्रत्येकाला ते कसं भावेल, हे ज्याचं त्याने ठरवावं. मात्र, कुठलीही कथा आपली स्वतःची अभिव्यक्ती मांडणारी असावी. लेखक, समीक्षक संजय भास्कर जोशी यांचं वाय आहे- "लेखकाने वाचकाला आपल्यापेक्षा दोन पायर्‍या वरचं समजून लिहावं.” हे मत मला विज्ञानकथेच्या संदर्भातही लक्षणीय वाटतं.
 
 
Powered By Sangraha 9.0