पुढील महापरिनिर्वाण दिनापूर्वी इंदू मिल स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

06 Dec 2025 15:16:48
 
Devendra Fadnavis
 
मुंबई : ( Devendra Fadnavis ) भारतनरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजामध्ये समतेचे रोपण करून समाज जागरूक केला आणि स्वतंत्र भारतामध्ये समतेचे राज्य तयार करणारे संविधान आपल्याला दिले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दादरच्या चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
 
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, माजी मंत्री संजय बनसोडे, आ. कालिदास कोळंबकर, आ. चित्रा वाघ, आ. अमित साटम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आपल्या देशामध्ये एक प्रचंड मोठी विषमता तयार झाली होती आणि या विषमतेने आपल्याच समाजातील अनेक लोकांचा मानव म्हणून जगण्याचा अधिकार हिरावून घेतला होता. अशा परिस्थितीत समाजात मोठी जागृती आणून एक समतायुक्त असा समाज तयार व्हावा या भावनेतून या विषमतेलाच आपली शक्ती बनवून महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञान संपादित केले. त्या आधारे समाजामध्ये समतेचे रोपण करून समाज जागरूक केला आणि स्वतंत्र भारतामध्ये समतेचे राज्य तयार करणारे संविधान आपल्याला दिले. या संविधानाने समाजामध्ये बंधुता निर्माण केली आणि सर्वांना संधीची समानता दिली."
 
बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था
 
"या संविधानामुळेच आज आपला देश इतकी प्रगती करू शकला. भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. पण याची मुहूर्तमेढ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रोवली. याव्यतिरिक्त राज्याच्या प्रगतीत आणि राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षेतही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या योगदानामुळे आज देश ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होत आहे. राष्ट्रीय विद्युत ग्रीडची संकल्पना भारताने बाबासाहेबांमुळे वेळेत स्वीकारली," असेही ते म्हणाले.
 
इंदू मिल स्मारकाचे काम कधीपर्यंत होणार?
 
"संविधानाने उभी केलेली लोकशाहीची व्यवस्था भारताच्या प्रगतीचा भक्कम पाया आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान असून त्यात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सापडते. पुढील महापरिनिर्वाण दिनापूर्वी इंदू मिल स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
 
बाबासाहेब अमर आहेत - राज्यपाल आचार्य देवव्रत
 
राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले की, "भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इतक्या मोठ्या राष्ट्रात एकता, न्याय व समतेची संघटित भावना दृढ करण्यासाठी संविधान निर्माण करणे हे अत्यंत मोठे आणि ऐतिहासिक कार्य होते. देशाच्या सामाजिक विविधतेत सर्वांना एकत्र आणणारे आणि समान अधिकार प्रदान करणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राला दिले. कोणत्याही राष्ट्रात युगपुरुष जन्माला येतात तेव्हा सामाजिक न्यायाची चळवळ बळकट होते. असे युगपुरुष व्यक्तिमत्त्व जगातून गेले तरी त्यांचे विचार व कार्य जनतेच्या अंत:करणात सदैव जिवंत राहतात, त्यातूनच बाबासाहेब अमर आहेत."
 
संविधान निर्मितीतून लोकशाहीला दृढ पाया दिला - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करून देशाच्या लोकशाहीला दृढ पाया दिला. त्यांनी उभारलेला संघर्ष हा मानवमुक्तीचा, समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता प्रस्थापित करण्याचा होता. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही बाबासाहेबांनी जगाला दिलेली त्रिसूत्री आजही समाज परिवर्तनासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चार मूल्यांवर आधारित संविधान तयार करून तळागाळातील वंचित आणि दुर्बल घटकांना सशक्त करण्याचे ऐतिहासिक कार्य डॉ. आंबेडकरांनी केले."
 
Powered By Sangraha 9.0