दिल्लीतून आदेश आल्यास उद्धव ठाकरेंना रॅलीमध्ये जावेच लागेल; नवनाथ बन यांची टीका

06 Dec 2025 17:35:19
Nawanath Ban

मुंबई : ( Nawanath Ban ) 
दिल्लीहून आदेश आला तर उद्धव ठाकरेंना दिल्लीच्या रॅलीमध्ये जावेच लागेल, अशी टीका भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे. मतचोरीच्या विरोधात दिल्लीत काँग्रेसची एक महारॅली होणार असून उद्धव ठाकरे यांना या रॅलीत सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आल्याचे समजते.
 
यावर बोलताना नवनाथ बन म्हणाले की, "दिल्लीहून आदेश आला तर उद्धव ठाकरेंना दिल्लीच्या रॅलीमध्ये जावेच लागेल. नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणूकांमध्ये उद्धव ठाकरे घरात बसून होते. त्यांनी कार्यकर्त्यांसाठी एकही सभा घेतली नाही. परंतू, आता दिल्लीच्या बॉसचा आदेश आल्यानंतर दिल्लीला गेल्याशिवाय त्यांना पर्याय राहणार नाही. विधानसभेत तुम्हाला जनतेने नाकारले आहे. बिहारमध्ये राहुल गांधी यांनाही नाकारले. त्यामुळे मतचोरीच्या मुद्दावर कितीही रॅली काढली तरी त्याचा उपयोग होणार नाही. त्यापेक्षा उद्धव ठाकरे नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणूकीच्या प्रचारात गेले असते तर त्यांना त्याचा जास्त फायदा झाला असता. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना सोबत घेतल्याने काँग्रेसने तुम्हाला बाजूला केले."
 
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळ्यांना सोबत घेऊन जातात. विरोधकांनाही ते सोबत घेऊन चालतात. तोच संदर्भ देत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ते वक्तव्य केले. इतर पक्ष चालवतात याचा अर्थ आम्ही इतर पक्षांना सहकार्य करतो. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक पक्षाला अधिकार असतो. या सगळ्या पक्षाला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून मदत करण्याचे काम करतात. विरोधी आमदारांना निधी मिळावा, त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात," असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
काँग्रेस मुंबईत सर्वात शेवटचा पक्ष असेल

"मुंबई महापालिकेत काँग्रेसला एक अंकी जागा मिळणार आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत काँग्रेसची काय अवस्था आहे ते बघावे. आका आणि बोका ही भूमिका तुमची आहे. तुम्ही अडीच वर्षात बोक्याप्रमाणे मुंबईला लुटण्याचे काम केले. त्यामुळे मुंबईकर महाविकास आघाडीला नाकारतील आणि काँग्रेसची धुळधाण होईल. काँग्रेस मुंबईत सर्वात शेवटचा पक्ष असेल. बोटावर मोजता येतील इतकेही नगरसेवक त्यांचे निवडून येणार नाहीत," असेही ते म्हणाले.
 
मुंबईत महायुतीचाच महापौर बसणार
 
"मुंबई महापालिकेत भाजपच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार येणार हे जवळपास निश्चित आहे. मुंबईचा महापौर महायुतीचाच होईल. महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही. मुंबईमध्ये आपला महापौर बसावा, असे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटत असते. पण भाजप आणि महायुतीत समन्वय असून येणाऱ्या महापालिका निवडणूकीत मुंबईत महायुतीचा महापौर बसेल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
जाणीवपूर्वक हिंदूंच्या सणांना विरोध
 
"आजपर्यंत हिंदूंच्या उत्सवांना विरोध करण्याची परंपरा डाव्यांमध्ये होती. जाणीवपूर्वक हिंदूंच्या मेळाव्याला विरोध करण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. कुंभमेळा हा हिंदूंचा सगळ्यात मोठा उत्सव आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात साधू, महंत, भाविक भक्त गोदावरीच्या पवित्र नदीत स्नान करण्यासाठी येत असून त्यांची व्यवस्था करावी लागते. त्यामुळे आपण तिथली झाडे तोडत नसून हटवत आहोत. त्याबदल्यात १० झाडे लावण्याचे काम सरकारच्या माध्यमातून होत आहे. तरीही जाणीवपूर्वक हिंदूंच्या सणांना विरोध करण्याचे काम सुरु आहे," असेही ते म्हणाले.
 
हापूस आंबा कोकणचाच

"हापूस आंबा महाराष्ट्राचा आणि कोकणचाच आहे यावर जीआय मानांकनाने शिक्कामोर्तब झाले आहे. कोकणातील हापूस आंब्याची चव देशभरातील इतर कुठल्याही आंब्याला नाही. गुजरात किंवा इतर राज्यांनी कितीही दावे केले तरी हापूस कोकणातलाच आहे. महाराष्ट्राचा हापूस हा जागतिक ब्रँड आहे," असेही नवनाथ बन म्हणाले.

Powered By Sangraha 9.0