आता खाणींतून पाणी...

    05-Dec-2025
Total Views |
 
Coal Mines
 
आपल्या देशात काही भागांत अतिवृष्टी, तर काही भागांत कोरडाठाक दुष्काळ असे चित्र. त्यामुळे जलसंधारणाच्या उपायांबरोबरच पाण्याचा संतुलित, शाश्वत वापर हादेखील तितकाच महत्त्वाचा. त्यासाठी कोळशांच्या खाणींमध्ये आढळून येणार्‍या जलस्रोतांचा वापरही चाचणीअंती काही ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. त्याविषयी सविस्तर...
 
परंपरागत व्यवहारांपासून पर्यावरणशास्त्रापर्यंत सर्वत्र पाण्याला एक महत्त्वाचा स्रोत मानले जाते. पाण्याचा त्यादृष्टीचे उपयोग व त्याचे महत्त्व समजून घेतानाच, या क्षेत्रातील जाणकार व विषयतज्ज्ञांनी देशांतर्गत लहान-मोठ्या आकाराच्या व मोठ्या संख्येत असणार्‍या खाणींमध्ये उपलब्ध पाण्याचा उपयोग प्रसंगी पिण्याचे पाणी म्हणूनसुद्धा होऊ शकतो, असा अभ्यासपूर्ण पुढाकार घेतला असून, त्यादृष्टीने प्रयत्नांना सुरुवातदेखील झाली आहे.
 
यासंदर्भातील प्रमुख उल्लेखनीय मुद्दा म्हणजे रांची येथील सुप्रसिद्ध ‘सेंट्रल माईन प्लॅनिंग अ‍ॅण्ड डिझाईन इन्स्टिट्यूट’ म्हणजेच ‘सीएमपीडीआय’ या संस्थेतील कोळसा खाणींसह देशातील सर्व खाणींचा अभ्यास करून असे स्पष्ट करण्यात आले आहे की, सद्यस्थितीत सरासरी स्वरूपात देशातील ४३७ कोळसा खाणींमध्ये सुमारे दोन हजार ७०० किलोलीटर्स पाणी उपलब्ध असते व या पाण्याचा उपयोग देशातील विविध कामांसाठी होऊ शकतो.
 
‘सीएमपीडीआय’च्या याच अभ्यासात नमूद केलेल्या आकडेवारीनुसार, आपल्या कोळसा खाणींमध्ये दरवर्षी साठवण स्वरूपात जे पाणी शिल्लक उरते, त्या पाणीसाठ्याद्वारा ऑलिम्पिकच्या ११ हजार पोहण्याच्या टायांसाठी आवश्यक पाण्याची गरज भागवली जाऊ शकते. आपल्या याच खाण-पाण्याच्या अभ्यासाच्या पाठपुराव्याद्वारे ‘सीएमपीडीआय’ने प्रायोगिक स्तरावर झारखंड या कोळसाबहुल राज्यातील खाणींमधील पाणीसाठ्यांचा त्यातील पाण्याच्या दृष्टीने अभ्यास केला. या पाण्याचा उपयोग विविध कामांसाठी उत्पादक व उपयुक्त पद्धतीने होऊ शकतो, असे आढळून आल्याने प्रयोगाच्या पुढील टप्प्यात आणखी १४ खाणींमधील पाणसाठ्यांचा उपयोग केला गेला, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
 
खाणींमधील पाण्याच्या उपयोगाचा पहिला यशस्वी टप्पा गाठला गेला २०२१ मध्ये. या पाणी प्रयोगाचे पहिले लाभार्थी ठरले, ते झारखंडच्या रामगड जिल्ह्याच्या पांडी पंचायतीतील रहिवासी. त्यांना ‘कोल इंडिया’अंतर्गत ‘आरा-८’ खाणीतील उपलब्ध पाण्याचा उपयोग गावकर्‍यांच्या विविध उपयोगांसाठी होऊ शकला. याच पाणी उपक्रमाचा अवलंब नंतर ‘आरा’ खाणीच्या विविध ठिकाणी यशस्वीपणे केला गेला.
 
पाण्यासाठीच्या या प्रयत्नांची एकूण पार्श्वभूमी म्हणजे कोळसा खाणक्षेत्रात पावसाळ्यादरम्यान साचलेले पावसाचे पाणी व त्यानंतरपण वेगवेगळ्या जलस्रोतांद्वारे झिरपून खाणक्षेत्रांमधील पाणवठ्यांमध्ये साचणारे पाणी याची साठवण वर्षानुवर्षे व परंपरागत स्वरूपात होत होती. पण, या अशाप्रकारे नैसर्गिक स्वरूपात साचलेल्या पाण्याचा उपयोग कशाप्रकारे करता येईल, यावर फारसा विचार झाला नव्हता.
 
मात्र, गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारच्या कोळसा मंत्रालयातर्फे कोळसा खाणींमधील पाणीसाठ्यांचा उपयोग केला जाऊ शकतो का, यावर विचार सुरू झाला. सुरुवातीचे प्रयत्न फलदायी ठरले नाहीत. मात्र, या प्रयत्नांमध्ये सातत्य असल्याने त्याची उपयुक्तता सर्वांना समजली. तशातच कोळसा खाणक्षेत्र व परिसरातील ग्रामीण व रहिवाशांसाठी पावसाळ्यानंतर सुमारे सहा महिने पाण्याचे दुर्भिक्ष कायमचे असायचेच. यातूनच खाण परिसरातच राहणारे ‘कोल इंडिया’चे अधिकारी व तज्ज्ञ यांनी खाणींमधील पाण्याचा उपयोग लोकांच्या वापरासह पिण्याचे पाणी म्हणून करता यावा, यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवले. याच प्रयत्नांची परिणती म्हणजे, गेल्या सुमारे पाच वर्षांपासून या पाण्याचा वापर करता येऊ लागला. केंद्रीय कोळसा खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांनी नव्यानेच जाहीर केलेल्या निर्णयानुसार, सद्यस्थितीत ‘कोल इंडिया’ व त्याअंतर्गत असणार्‍या विविध कोळसा खाणींमधील अशाप्रकारे उपलब्ध असणार्‍या पाण्याचा वापर खाण व परिसरातील रहिवासी नागरिकांसाठी करण्यावर केंद्रीय स्तरावर प्राधान्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
 
यासंदर्भात केंद्र सरकारच्या विशेष प्रयत्नांतून मर्यादित स्वरूपात अथवा दीर्घकालीनसंदर्भात खाणकाम-खोदकाम वा वापरासाठी नसणार्‍या खाणींमध्ये साचलेल्या व उपलब्ध असणार्‍या पाण्याच्या वापरावर विचार करून, त्याचा उपयोग करण्यासाठी विशेष भर दिला गेला. यातूनच खाणीतील जलवापराच्या प्रयत्नांना प्रयत्नपूर्वक यश येत गेले, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. याचेच पाणीदार परिणाम आता दिसून येत आहेत.
 
कोळसा खाणींमध्ये तर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असतात. पिढ्यान्पिढ्या या रोजगारसंधींचा लाभ मिळाला आहे. मात्र, आता या खाणींमध्ये उपलब्ध असणार्‍या या पाण्याचा उपयोग खाण परिसरातील गरजू ग्रामीणांसाठी होणार आहे, हे महत्त्वाचे. या पाण्यापैकी काही पाणी ग्रामीण व लघु-उद्योगांसाठीपण उपयुक्त ठरणार असून, त्यामुळे काहीप्रमाणात स्वयंरोजगारांसह रोजगारसंधी उपलब्ध होऊ घातल्या आहेत.
 
‘आयएपीडीआय’सह जलतज्ज्ञांतर्फे करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, या तज्ज्ञांच्या मते हे पाणी सर्वप्रकारच्या वापरासाठी योग्य असून, पिण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग करायचा झाल्यास पाण्यावर प्रक्रियेसह शुद्धीकरण करूनच त्याचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञमंडळींनी दिला आहे. यासंदर्भात आपल्या कोळसा खाणींमध्ये उपलब्ध असणार्‍या पाण्याचा पाश्चिमात्य देशांमधील खाणींमधील पाण्याच्या संदर्भात तुलनात्मक अभ्यास करून ‘सीएमपीडीआय’ने असे स्पष्ट केले आहे की, पाश्चिमात्य देशांमधील खाणींमध्ये करण्यात आलेल्या प्रक्रियांमुळे तेथील पाणी रसायनयुक्त असल्याने, विशेषतः मानवीय उपयोगांसाठी घातक ठरू शकते. भारतात मात्र येथील खाणींमध्ये अशी प्रक्रिया होत नसल्याने ‘कोल इंडिया’च्या खाणींमध्ये साठणार्‍या व उपलब्ध असणार्‍या पाण्याची उपयुक्तता निश्चितपणे उजवी व दर्जेदार ठरते.
 
याचेच प्रत्यंतर विविध अभ्यास आणि अहवालांमधून येत असते. ‘सीएमपीडीआय’चे जनसंपर्क अधिकारी ‘कोल इंडिया’अंतर्गत खाणींमध्ये उपलब्ध पाण्याचा ग्रामस्थांसाठी व विशेषतः त्याचा घरगुती व पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने वापर करण्याआधी ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’तर्फे पाण्याची संपूर्ण चाचणी केली जाते व मंडळाच्या अभ्यास आणि चाचणी प्रमाणपत्रानंतरच हे पाणी पिण्यायोग्य समजले जाते. त्यानुसार, संबंधित गरजू-ग्रामीण क्षेत्रातील रहिवाशांसाठी वापर केला जातो. ‘खाणीतून पाणी’ या नव्या पाणीदार प्रयत्नांमुळे खाणक्षेत्रातील रहिवाशांची पाण्याची गरज व प्रसंगी तहान भागविण्याचे हे ‘भगीरथ प्रयत्न’ म्हणूनच अभिनंदनीय ठरतात.
 
 
- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापक आणि सल्लागार आहेत.)