श्रीराम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण समारोह हा कोणत्याही प्राणप्रतिष्ठित मंदिराच्या शिखरावर साधा ध्वज आरोहित करण्याचा कार्यक्रम नव्हता, तर हिंदुत्वाच्या संकल्पनेच्या मंथनातून निर्माण झालेल्या नवनीताचे रूप म्हणून तो उभा राहिला. कार्यक्रमाच्या संपूर्ण संरचनेचे सूक्ष्मपणे विहंगावलोकन केले असता, हे तथ्य स्पष्टपणे जाणवते.
अयोध्येत संपन्न झालेला राम मंदिरावरील धर्मध्वज रोहणाचा सोहळा प्रभू श्रीरामांनी आपल्या पुरुषार्थात प्रदर्शित केलेल्या संपूर्ण समाजाला एकत्र आणून, सोबत घेण्याच्या आदर्शाचे प्रत्यक्ष दर्शनच म्हणता येईल. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंकित केलेला संदेश, ‘जाती-पाती पूछे नहीं कोई, हरि को भजे सो हरि को होई’ हा कार्यक्रमाच्या राममय भावनेचा संदेश देत होता.
भारत विश्वगुरू होण्याची संकल्पना तेव्हाच सार्थक ठरू शकते, जेव्हा संपूर्ण जगात हिंदुत्वाची सहज व्याख्या आणि ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा भाव स्वाभाविकपणे प्रसारित होईल. श्रीराम जन्मभूमी मंदिरातील ध्वजारोहण हेच अर्थ आणि हा भाव सामान्य लोकांपर्यंत अत्यंत सहजतेने पोहोचवत आहे. कार्यक्रमाच्या एकूण संरचनेतून असा संदेश स्पष्टपणे उमटला की, जाती, धर्म, भाषा, प्रांत यांच्या आधारे समाजात पसरवला गेलेला विद्वेष किंवा फुटीरतावाद यांना हिंदू समाज आणि सनातन परंपरेत वास्तविकपणे कोणतेही स्थान नाही. प्रयागराज महाकुंभातही हिंदू समाजाने याच भावनेचे प्रभावी प्रदर्शन करून दाखवले आहे.
ध्वजारोहण कार्यक्रमात प्रभू श्रीरामांच्या जीवनाशी निगडित सूक्ष्म; परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्द्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले. जसे श्रीरामांनी आपल्या पुरुषार्थात स्वतःच्या किंवा कोणत्याही मैत्रीपूर्ण राज्याच्या आधाराकडे न पाहता, स्वतःच्या प्रयत्नांनी सर्व कार्ये पूर्ण केली. तसेच, ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास’नेही समाजाच्या शेवटच्या घटकांमध्ये राहूनही समाजसुधारणेच्या कार्यात निष्ठेने, शांतपणे आणि रचनात्मकतेने कार्य करणार्या व्यक्तींना अग्रस्थान दिले. अयोध्येला केंद्रस्थानी ठेवून, पूर्व उत्तर प्रदेश व आसपासच्या साधारणपणे दोन ते अडीच डझन जिल्ह्यांतील नागरिकांना विशेष महत्त्व प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या संरचनेबाबत असे मानता येईल की, संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मांडलेल्या ‘पंच परिवर्तन’ या सिद्धांताचे संपूर्ण प्रतिबिंब या आयोजनात दिसून आले. स्वदेशीच्या तत्त्वांतर्गत ‘स्व’चा बोध घडवत, कार्यक्रम आयोजनाची जबाबदारी कोणत्याही व्यवस्थापन कंपनीकडे न देता, ट्रस्ट आणि ‘विश्व हिंदू परिषद’ यांनी स्वतः घेतली आणि कार्यकर्त्यांच्या बळावर संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या साकारला. अतिथींचे निवास असो किंवा पुष्पवृष्टीसह तिलक लावून केलेले स्वागत, प्रत्येक गोष्टीत भारतीय संस्कृतीचे भान जपले गेले. स्वतःच्या सामर्थ्यावर सर्व काही उत्तमरीत्या पूर्ण करण्यात आले. नागरी कर्तव्याचे साक्षात रूप त्यावेळी दिसून आले, जेव्हा आलेल्या अतिथी आणि स्वागतकर्त्यांनी सर्व सूचनांचे अक्षरशः पालन केले. कार्यक्रमाच्या आधी किंवा नंतर कुठेही कोणत्याही प्रकारची अव्यवस्था आढळल्याचा कोणताही संदेश प्राप्त झाला नाही. सर्वांनी पूर्ण साधेपणाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने निश्चित जागी आसन ग्रहण केले आणि कार्यक्रम संपल्यानंतर नियोजित क्रमाने रामलला आणि रामदरबाराचे दर्शन घेऊन त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.
संपूर्ण ७० एकर मंदिर परिसरात प्रवेश करताच पर्यावरणसंरक्षणाची जाणीवपूर्वक केलेली उपक्रम योजना दिसून येते. परिसरातील सुमारे ७० टक्के क्षेत्रफळ मोकळ्या आकाशासाठी राखून ठेवण्यात आले असून, त्यात पक्षी, माकडे आणि इतर प्राण्यांसाठी पंचवटीची व्यवस्था आहे. उर्वरित क्षेत्र हरितीकरण आणि वृक्षलागवडीसाठी आरक्षित करण्यात आले आहे. जलव्यवस्थापनासाठी बांधकामाला सुरुवात होताच, ‘जलसंचयन प्रकल्प’ (वॉटर हार्वेस्टिंग प्लान्ट) उभारून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश दिला गेला आहे.
आमंत्रित अतिथींचा उत्साह स्वतःमध्ये सामाजिक समरसतेची एक अप्रकट; पण प्रभावी कथा सांगत होता. हिंदू समाजातील सुमारे ५६ जातींना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न या सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात आला. विशेष काळजी घेण्यात आली की, घुमंतू, दलित, वंचित, अघोरी, गिरिवासी, आदिवासी, वनवासी अशा सर्व समाजघटकांचे प्रतिनिधित्व या सोहळ्यात असावे आणि ते होतेही. विविध समाजांचे अनेक अग्रगण्य संत भावविव्हल होऊन कार्यक्रमात सहभागी झाले. समाजात आढळणार्या गोडिया, कहार, बारी, नाई, कुम्हार, गडरिया, लोधी, यादव, लोहपिटवा, पाथरकटा, माळी, धोबी, लोहार, सुतार, तमोली, मौर्य, कसौधन, बहेलिया, पासी, वाल्मीकी, रैदास, कंजर, नट, कुर्मी, तसेच जैन, बौद्ध, शीख इत्यादी समाजांचेही प्रतिनिधित्व राहावे याकडे विशेष लक्ष देण्यात आले. कोणाच्याही चेहर्यावर श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्वाचा कणभरही भाव दिसत नव्हता. सर्वांच्या परस्परांतील सद्भाव, सौहार्द आणि एकता दुरूनच जाणवत होती.
न्यासातर्फे सुमारे सहा हजार लोकांना कार्यक्रमासाठी निमंत्रण पाठवण्यात आले होते. अतिथींमध्ये जवळपास ५० टक्के लोक अयोध्या जिल्ह्यातील होते. येथील सर्व आरक्षित-अनारक्षित अशा ८३५ गावांच्या सरपंचांना निमंत्रित करण्यात आले. यावरून हे स्पष्ट होते की, प्राणप्रतिष्ठेच्या उलट हा कार्यक्रम जागतिक नसून पूर्णपणे स्थानिक स्वरूपाचा आहे. तसेच, अयोध्येच्या पारंपरिक ८४ कोसी, १४ कोसी आणि पंचकोसी परिक्रमामार्गात येणार्या प्रमुख व्यक्ती वंचित राहू नयेत, याची विशेष काळजी घेण्यात आली.
कार्यक्रमात तांत्रिकप्रक्रियेतील गुंतागुंत कमी करण्यासाठी ‘यूआर कोड’च्या ऐवजी रंग योजनेची (कलर स्कीम) अंमलबजावणी करण्यात आली. अतिथी ज्या प्रांतातून आले होते, त्या प्रांतांसाठी ठरावीक रंग निश्चित करण्यात आला. त्यानुसार, त्यांना त्या रंगाचे ध्वज असलेली वाहने, आमंत्रणपत्रे व प्रवेशिका देण्यात आल्या. तसेच, त्याच रंगाच्या ध्वजाने सजलेले आसनव्यवस्थेचे ब्लॉक तयार करण्यात आले. ज्याप्रकारे प्रयागराजच्या ‘महाकुंभा’त जात-पंथाच्या सीमा मिटवून सर्वांनी एकाच घाटावर स्नान केले होते, त्याचप्रमाणे ध्वजारोहण कार्यक्रमातही सर्व समाजघटकांनी एकजुटीने सहभाग नोंदवून ‘पीडीए’ आणि जातीनिहाय गणना यांसारख्या विषयांना स्वतःच धुळीस मिळवले. म्हणूनच हा सोहळा सर्वस्वी अविस्मरणीय ठरला, यात शंका नाही.
- सुबोध मिश्र