बाबरी मशिदीची पायाभरणी केल्यानंतर आम्हीही केवळ बघ्याच्या भूमिकेत नसू!

05 Dec 2025 15:05:29
West Bengal
 
मुंबई : ( West Bengal ) पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायूँ कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशिदीच्या धर्तीवर मशिदीची पायाभरणी करण्याबाबत केलेल्या घोषणेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या कृत्याबाबत पक्षाने कबीर यांना निलंबित केले आहे.
 
आता पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी कबीर यांनी केलेल्या घोषणेबाबत सरकारला कठोर निर्देश दिले आहेत. राज्यपालांनी स्पष्ट केले की, हे सर्व सांप्रदायिक भावना भडकवण्याचे षडयंत्र आहे. याला परवानगी दिली जाणार नाही. हुमायूँ कबीर यांनी मात्र धमकीवजा इशारा देत म्हटले की, जर प्रशासनाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात येईल.
 
राज्यपाल बोस म्हणाले की, "सांप्रदायिक भावना भडकवल्या तर संविधान आणि राज्य फक्त बघ्यांची भूमिका निभावणार नाही. कायदा मोडणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल. राज्यातील लोकसंख्यात्मक असंतुलन त्याचबरोबर ‘बाबरी’सारखी रचना उभारणे हे षडयंत्र असल्याचे संकेत आहेत. बंगालमध्ये हिंसा आणि भ्रष्टाचार हे दोन कर्करोगाची लक्षणे असून, ते मुळापासून संपवण्याची खरी गरज आहे.”
 
मुर्शिदाबाद जिल्ह्यात मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी उशिरा रात्री अचानक बाबरी मशीद शिलान्यास संबंधित एका वादग्रस्त पोस्टरची चर्चा सुरू झाली. अनेक भागात लावलेल्या पोस्टरमध्ये ६ डिसेंबरला बेलडांगामध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी करणार अशी घोषणा केली आहे. पोस्टरवर या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायूँ कबीर यांचे नाव लिहिण्यात आले होते. ६ डिसेंबर हा दिवस राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. कारण १९९२ मध्ये याच दिवशी बाबरी मशीद पाडण्यात आली होती. ‘टीएमसी’ हा दिवस ‘संघर्ष दिवस’ म्हणून पाळते. यावर्षी राज्य सरकारने ६ डिसेंबरला सार्वजनिक सुटीही जाहीर केल्याची माहिती आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0