व्यावसायिकांचा ‘बिझनेस गुरु’

    05-Dec-2025
Total Views |
 
Nupur Bhendale
 
उद्योग-व्यवसायात सातत्य राखून त्याला टाळे लागणार नाही, यासाठी उद्योजकांना व्यावसायिक शिस्तीचे धडे देऊन मार्गदर्शन करणार्‍या पुण्यातील नूपुर भेंडाळे यांच्याविषयी...
 
व्यवसायवाढीसाठी शिस्त महत्त्वाची असते. विविध ‘स्टार्टअप’ सुरू होतात. पण, बरेचदा योग्य नियोजन आणि शिस्तीच्या अभावामुळे जोशात सुरू झालेले हे स्टार्टअप्स अल्पावधीत बंदही पडतात. त्यामागचे कारण म्हणजे व्यावसायिक शिस्तीचा अभाव. तेव्हा, नेमकी हीच बाब अचूक हेरुन व्यावसायिकांना शिस्तीचे धडे देण्यासाठी हातातील चांगली नोकरी सोडून आणि आपल्या भावाला सोबत घेऊन व्यावसायिक शिस्तीची चळवळ सुरू करणार्‍या नूपुर भेंडाळे यांच्याविषयी आजच्या लेखातून जाणून घेऊया...
 
नूपुर भेंडाळे हे नाव पुण्यातील स्टार्टअप वर्तुळात आदरयुक्त भीतीतून घेतले जाते. याचे कारण म्हणजे, नूपुर व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय बंद पडू नये, यासाठी त्यांच्या व्यवसायात शिस्त लावण्याचे असे काहीसे अवघड वाटणारे काम करतात. नूपुर यांचे शिक्षण पुण्यात झाले. त्यानंतर औषधनिर्माणशास्त्रात पदवी आणि नंतर ‘व्यवसाय व्यवस्थापन’ या विषयात ‘पदव्युत्तर’ पदवी संपादन केली. महाविद्यालय जीवनात विविध स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवत, महाविद्यालयाचे नाव राज्यात पोहोचवले. कॅम्पस मुलाखतीत औषधनिर्मिती कंपनीमध्ये चांगल्या पदावर त्यांना नोकरीदेखील मिळाली.
 
नोकरी करत असताना कंपनी व्यवस्थापनाला नूपुरच्या अंगी असणारे योग्यप्रकारे मनुष्यबळ हाताळण्याचे कौशल्य दिसले आणि कंपनी व्यवस्थापनाने नूपुरला बढती दिली. सर्व चांगले सुरू असतानाच, आजूबाजूला चांगले व्यवसाय बंद पडत होते. हे बघताना, ते व्यवसाय नेमके का बंद पडतात, याचे नूपुर यांनी सूक्ष्म निरीक्षण करायला सुरुवात केली. चांगला व्यवसाय अचानक बंद पडतो; अशावेळी अनेक कर्मचारी देशोधडीला लागतात. शिवाय, याचा परिणाम त्या व्यवसायांना कर्जपुरवठा करणार्‍या बँकांवरही होतो. अशाप्रकारे खूप कष्टाने उभा केलेला व्यवसाय काही चुकांमुळे बंद पडणे, हे केवळ त्या व्यावसायिकासाठीच नाही, तर एकूणच समाजासाठीही काहीसे निराशाजनकच. मग यावर नेमका काय उपाय करता येईल, हा विचार करून व्यवसायाच्या प्रारंभीच व्यावसायिक शिस्त लावता आली, तर उद्योग बंद पडणार नाही, हा निष्कर्ष काढून; यात काम करण्याचा निर्णय नूपुर यांनी घेतला आणि नोकरीचा राजीनामा देऊन याच कामात स्वत:ला वाहून घेतले.
 
बंद पडलेल्या स्टार्टअप संचालकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्यास नूपुर यांनी सुरुवात केली. या समस्यांचे काय निवारण करता येईल, यासाठी त्यांचे आटोकाट प्रयत्न सुरू झाले. बंद पडलेल्या व्यवसायात नेमकी चूक कुठे झाली आणि त्यावर उपाय काय, यावर काम करताना आपण काय योगदान देऊ शकतो, यासाठी नूपुर यांनी समस्येच्या मुळाचा शोध घेतला.असे करता करता हळूहळू त्यांचा जनसंपर्कही वाढत गेला. त्यातून समस्यांचे निराकरण होत गेले. योग्य गरजूंना जोडत गेलो की, समस्या सुटू शकते हे नूपुरला उमगले; पण आपण एकटे कुठे-कुठे पुरणार हे लक्षात आल्याने, आपल्या भावाला सोबत येण्याविषयी त्यांनी विचारणा केली. भाऊ दीप भेंडाळे यानेही होकार दर्शवताच, या भावंडांनी जोमाने काम करायला सुरुवात केली. दोघांनी मिळून ’बिझनेस गुरूज’ नावाने संस्था काढली आणि पूर्णवेळ याच कार्याला वाहून घेण्याचे ठरवले.
 
व्यवसायात टिकायचे असेल तर शिस्त ही अत्यंत महत्त्वाची. त्यामुळे आधी कंपनीच्या संचालकांसाठी कामाची एक आदर्श पद्धत तयार करायला नूपुर यांनी सुरुवात केली. यासाठी ३००हून अधिक पुस्तके वाचून, त्यातून महत्त्वाचे मुद्दे काढून एक कार्यपद्धती विकसित केली. त्यानंतर कर्मचार्‍यांसाठी, वितरण, व्यवसायवाढ यासाठी कार्यपद्धत तयार केली. अशा कार्यपद्धतीचे विविध नमुने तयार केले. त्यानंतर व्यवसायात मदतीचा हात द्यायला सुरुवात केली. कोणी व्यवसायात अडचणीत आहे हे समजले की, नूपुर तातडीने त्या व्यावसायिकाला हमखास भेटतात.
 
त्यांच्याशी बोलताना व्यवसायातील अडचण समजून घेतात आणि मग त्यावर काय उपाय केले पाहिजेत, हे सुचवतात. त्यावर कोणती कार्यपद्धती उपयुक्त ठरेल याचे मार्गदर्शन करतात. हेच त्यांच्या कामाचे स्वरूप. अशाप्रकारे गेल्या पाच वर्षांत २००हून अधिक व्यावसायिकांना नूपुर यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या कार्यासाठी नूपुर यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तसेच त्यांनी विविध स्तरावरील कामगारांना रोजगारही मिळवून दिला आहे. "कोणताही व्यवसाय टिकवायचा ठरवले की, कामात शिस्त ही हवीच; परंतु खूप परिश्रम घेऊनदेखील यश मिळत नाही, यासाठी व्यवसायाच्या सखोल अभ्यासाचीही तितकीच गरज असते. आम्ही हाच सखोल अभ्यास करतो आणि व्यावसायिकाला समजावून देतो. व्यावसायिक अडचणीतून तो उद्योजक सुटला की, त्याच्या चेहर्‍यावर उमटणारे हास्य हेच आमच्यासाठी महत्त्वाचे असते,” असे नूपुर सांगतात. अशा या व्यवसायाच्या माध्यमातून व्यावसायिकांना शिस्त लावणार्‍या नूपुर यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
 
 - शशांक तांबे