मुंबईच्या विकासात मुंबईकरांना पार्टनर बनविणार, भाजप मुंंबईचे अध्यक्ष अमित साटम यांचा निर्धार

05 Dec 2025 13:32:36
 
Amit Satam
 
मुंबई : ( Amit Satam ) ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ या मोहिमेअंतर्गत मुंबई भाजपला एकूण दोन लाख ६५ हजार ७३८ लोकांनी सूचना दिल्या. त्यातील एक लाख ४५ हजार ६१६ लोकांनी भविष्यातील मुंबई घडवण्यासाठी स्वयंसेवक (व्हॉलेंटियर) म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली. या एक लाख ४५ हजार ६१६ लोकांना मुंबई भाजपच्या वतीने संपर्क करून त्यांना मुंबई शहराच्या उन्नती, विकास, प्रगती आणि सुरक्षेच्या या संपूर्ण आराखड्यात पार्टनर करण्याचा निर्णय आम्ही केला आहे, अशी माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम यांनी दिली.
 
‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे प्राप्त झालेल्या मुंबईकरांच्या सूचनांचे सादरीकरण करताना साटम म्हणाले की, १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ ही ऑनलाईन लिंक प्रसिद्ध केली होती. याद्वारे भाजपच्या जाहीरनाम्याकरिता मुंबईकरांच्या सूचना संकलित केल्या. १७ सप्टेंबर पासून कालपर्यंत दोन लाख ६५ हजार ७३८ सूचना प्राप्त झाल्या. अडीच महिन्यात समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. याशिवाय स्वच्छता, महिला व बाल सुरक्षा, वाहतूक, पार्किंग, मोकळ्या जागा, पर्यावरण, अतिक्रमण, सुरक्षितता आणि संरक्षण, सांस्कृतिक व ऐतिहासिक जतन या समस्या मुंबईकरांनी मांडल्या. यातील रस्ते, खड्डे, कचरा संकलन, स्वच्छता, नाले व्यवस्थापन आणि पुनर्वसन या समस्यांवर महापालिकेकडून तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकताही मुंबईकरांनी व्यक्त केली, असेही आ. अमीत साटम यांनी सांगितले.
 
नगरसेवकांकडून अपेक्षा कोणत्या?
 
मुंबईतील नगरसेवक आणि नगरसेवकांकडून मुंबईकरांच्या अपेक्षा काय आहेत? असा प्रश्न विचारल्यावर भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणे, प्रामाणिकपणा आणि दांडगा जनसंपर्क असणे या अपेक्षा मुंबईकरांनी व्यक्त केल्या. तसेच, मतदान करताना पक्ष आणि व्यक्ती यापैकी कोणाला प्राधान्य देणार, यावर ५१ टक्के लोकांनी पक्षाला प्राधान्य, तर ४९ टक्के लोकांनी व्यक्तीला प्राधान्य देण्याचा कल दिला. तसेच मुंबईकरांना महायुती सरकारने केलेली मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू आणि गृहनिर्माण आणि विकास ही चार कामे सर्वाधिक आवडल्याचेही दिसले.
 
सूचनांच्या आधारे जाहीरनामा
 
‘आवाज मुंबईकरांचा, संपर्क भाजपचा’ या मोहिमेअंतर्गत प्राप्त झालेल्या सर्व सूचनांच्या आधारे मुंबई भाजप आपला जाहीरनामा तयार करणार आहे. उद्या किंवा परवा जाहीरनामा समितीची बैठक होणार आहे. हा मुंबईकरांचा संकल्पनामा असेल. ही मोहीम इथपर्यंतच थांबणार नसून भविष्यातही मुंबई महापालिकेच्या कामासंदर्भात मुंबईकरांच्या सूचना घेऊनच पालिकेच्या व्यवस्थेला पुढे नेण्याचा निर्णय केला आहे, असेही आ. अमीत साटम यांनी स्पष्ट केले.
 
२५ टक्के सूचना १८ ते ३० वयोगटाकडून
 
यात मुंबईतील डबेवाले, सफाई कामगार, ऑटो रिक्षाचालक, विविध क्षेत्रांतील मान्यवर, चित्रपट, साहित्य अशा सर्व स्तरांतील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असून यात मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला, असे त्यांनी सांगितले. या मोहिमेत एकूण संकलित झालेल्या सूचनांपैकी १८ वर्षांच्या खालील दोन टक्के लोकांनी सूचना दिल्या. १८ ते ३० वयोगटातील २५ टक्के, ३० ते ६० टक्के वयोगटातील २५ टक्के लोकांनी, तर ६० पेक्षा अधिक वयोगटातील आठ टक्के लोकांच्या सूचना प्राप्त झाल्या, असेही त्यांनी सांगितले.
 
लोकांनी कोणत्या सूचना दिल्या?
 
१. मुंबईच्या विविध परिसरांमध्ये स्वच्छतेच्या स्पर्धा घेऊन ‘स्वच्छता अवॉर्ड नाईट’चे आयोजन करा
२. मुंबईत फेरीवालाक्षेत्र तयार करण्याची मागणी
३. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी रुग्णालयात स्वतंत्र कक्ष हवा
४. मुंबईत ‘इनोव्हेशन हब‘ची स्थापना करा
५. मुंबई वातावरणीय कृती आराखडा तयार करा
६. नागरीसेवांचे १०० टक्के ऑनलाईन पोर्टल तयार करा
७. ‘ऑगमेंटेड रियालिटी बुथ‘चा वापर करून राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचा अनुभव आणि महाराष्ट्राचे वैभव पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम तातडीने सुरू करावा. 
 
 
Powered By Sangraha 9.0