अर्थसाक्षर पिढी घडविण्यासाठी पालकांची भूमिका आणि पर्याय

05 Dec 2025 11:05:46
Financial Planning 
 
अल्पवयीन मुलांच्या नावाने बचतखाती आणि मुदतठेवींसाठी खाती उघडता येतात, हे आपण जाणतोच. पण, आजच्या युगात फक्त बँक खात्यांपुरते आर्थिक नियोजन मर्यादित नसून, म्युच्युअल फंड्स आणि शेअर्सकडेही आजची तरुणपिढी वळलेली दिसते. त्यासाठी लहानपणापासून मुलांना या पर्यायांचीही, त्यांच्या कार्यशैलीची हळूहळू ओळख करुन देणेही तितकेच क्रमप्राप्त. तेव्हा, यासंबंधी पालकांना नेमके काय करता येईल? यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत? यासंबंधी मार्गदर्शन करणारा हा लेख...
 
लहान मुला-मुलींचं बँकेत बचतखातं आईबरोबर किंवा वडिलांबरोबर उघडता येतं. ते लहान मूल सज्ञान होईपर्यंत अशा खात्यांची हाताळणी आईवडीलच करतात. दि. १ जुलै २०२५ पासून अल्पवयीन मुलांचे बँक खाते उघडण्यासाठी रिझर्व्ह बँकेत काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या तत्त्वांनुसार अल्पवयीन मुले जर दहा वर्षांपेक्षा जास्त वयाची असतील, तर बँकेत निश्चित केलेल्या मर्यादेमध्ये नियमांनुसार, ती मुले स्वतंत्रपणे बचत व मुदतखाती उघडू शकतात आणि चालवूही शकतात. याशिवाय, पूर्वीप्रमाणे अल्पवयीन मुले आईवडिलांसह खाती उघडू शकतात.
 
मार्गदर्शक तत्त्वे दहा वर्षे आणि त्यावरील अल्पवयीन मुले जर त्यांना हवे असेल, तर बँकेच्या अटी आणि मर्यादा निश्चित करून स्वतंत्रपणे खाती उघडू शकतात व चालवू शकतात. अल्पवयीन मुले अजूनही कायदेशीर किंवा नैसर्गिक पालकाद्वारे, आईसह खाती उघड शकतात. बँका दहा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अल्पवयीन मुलांची बँकेने निश्चित केलेल्या मर्यादेनुसार त्यांची खाती उघडू शकतात व ‘ऑपरेट’ही करू शकतात. बँका अल्पवयीन खातेदारांना त्यांच्या जोखीम मूल्यांकनावर आधारित इंटरनेट बँकिंग, डेबिटकार्ड व इतर सेवा देऊ शकतात. बँकांनी हे निश्चित केले पाहिजे की, अल्पवयीन खाती नेहमीच ‘के्रेडिट बॅलन्स’मध्ये असतील आणि स्वतंत्रपणे किंवा पालकाद्वारे चालविली जात असली, तरीही त्यांनी कोणत्याही परिस्थितीत पैसे काढता कामा नयेत.
 
अल्पवयीन मुलांसाठी ठेव खाती उघडण्यासाठी ग्राहकाचे ‘ड्यु डिलिजन्स’ (केवायसी आदी) अनिवार्य आहे. अल्पवयीन मूल प्रौढ झाल्यानंतर बँकांनी नव्याने ऑपरेटिंग सूचना व पुन्हा नव्याने सह्या घ्यायला हव्यात. अशा प्रकारे दि. १ जुलै २०२५ पासून अल्पवयीन मुलांना त्यांचे वैयक्तिक बचतखाते उघडण्याची व चालविण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मुले बचतीची संकल्पना शिकतील आणि व्याजाचे उत्पन्न मिळवतील, जे लहानपणापासूनच आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी एक मजबूत पाऊल असेल. अल्पवयीन मुले म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकतात का? होय. अल्पवयीन व्यक्ती त्यांच्या पालकांच्या किंवा कायदेशीर पालकांच्या मदतीने म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकतात. याव्यतिरिक्त सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांद्वारे अल्पवयीन मुलांच्यावतीने म्हणजेच १८ वर्षांखालील मुलांच्यावतीने कोणत्याही साधनांत गुंतवणूक केली जाऊ शकते. तथापि, मूल सज्ञान झाल्यानंतर या गुंतवणुकीतून मिळणारे कोणतेही उत्पन्न किंवा भांडवली लाभ हे मुलाचे उत्पन्न मानले जाईल.
 
अल्पवयीन मुलाच्या नावाने गुंतवणूक करणे, म्हणजे तुमच्या इतर गुंतवणुकीचा काही भाग विशिष्ट उद्देशासाठी बाजूला ठेवणे. जसे की, मुलाच्या उच्च शिक्षणासाठी निधी उभारणे. अशी गुंतवणूक तुमच्या मुलाच्या आर्थिक उद्दिष्टांना प्राधान्य देण्यासाठी अधिक प्रेरणा विकसित करण्यात मदत करू शकते. तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी निधी उभारण्यात तुम्ही भावनिकरित्या गुंतवणूक करण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे तुम्ही पैसे काढण्याची इच्छा बाळगणार नाही.
 
गुंतवणूक योजनांसह लवकर मालकी अनुभव मुलांना पैसे बचतीची प्रवृत्ती विकसित करण्यास मदत करतात. विशेषतः दीर्घकालीन म्युच्युअल फंड गुंतवणूक करदात्याची कर-कार्यक्षमता सुधारेल. कारण, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून मिळालेल्या कोणत्याही भांडवली लाभावर पालक किंवा कायदेशीर पालकांच्या कर-वर्गवारीनुसार कर आकारला जाईल, जोपर्यंत मूल अल्पवयीन असेल. १८ हून अधिक वर्षांनंतर मुलाला भांडवली लाभ कर भरावा लागेल. जेव्हा मूल १८ वर्षांचे होते आणि त्याच्याकडे उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्रोत नसतो, तेव्हा कर कमीत कमी भरावा लागतो किंवा भरावाही लागत नाही. मुलांच्या परिपक्वतेपर्यंत पोहोचल्यानंंतर या गुंतवणुकीचा ताबा त्यांच्याकडे हस्तांतरित केला जातो, जो लक्षात ठेवण्याचा आणखी एक महत्त्वाचा मद्दा आहे.
 
मुलांनी परिपक्वता वय गाठल्यानंतर मालकी हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार होईपर्यंत खाते गोठविले जाते, ज्यात मुलाला गुंतवणूक करण्याचा किंवा त्यातून पैसे काढण्याचा अधिकार समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त मूल फक्त १८ वर्षांचे असताना त्याला मोठी रक्कम देणे, ही चांगली कल्पना असू शकत नाही. काही मुलांमध्ये पैसे योग्यरित्या हाताळण्याची आणि ते योग्यरित्या वापरण्याची परिपक्वता नसते. अनेक लोक हे अल्पवयीन मुलाच्यावतीने म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे तोट्याचे मानतात. जर संयुक्त गुंतवणूक सुविधा अस्तित्त्वात असती, तर परिस्थिती अधिक चांगली असती. तथापि, अल्पवयीन व्यक्तीच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये सामान्य मालकीची परवानगी नाही. त्याऐवजी, अल्पवयीन व्यक्तीचे पालक किंवा कायदेशीर पालक यांनी खात्याचा एकमेव प्रतिनिधी म्हणून काम केले पाहिजे. अल्पवयीन मुलाच्या/मुलीच्या नावाने म्युच्युअल फंड गुंतवणूक सुरू करण्यासाठीची कागदपत्रे - मुलाच्या/मुलीच्या वयाचा पुरावा. पालकाशी मुलाच्या नात्याचा पुरावा. मुलाच्या/मुलीच्या वयाचा किंवा पालकाशी असलेल्या नात्याचा पुरावा म्हणून मुलाच्या जन्मप्रमाणपत्राची किंवा पासपोर्टची प्रत स्वीकारार्ह आहे. सुरुवातीस गुंतवणूक केली जाते, तेव्हा ही कागदपत्रे सादर करावी लागतात.
 
अल्पवयीन व्यक्ती डी-मॅट खाते उघडू शकते का? तर १८७२च्या भारतीय करार कायद्यानुसार अल्पवयीन मुलांना आर्थिक करार करण्यास मनार्ई आहे. तथापि, २०१३च्या कंपनी कायद्यानुसार कोणत्याही भारतीय नागरिकाला वयाची पर्वा न करता, सार्वजनिकरित्या सूचिबद्ध कंपन्यांमध्ये शेअर्स खरेदी करण्याची परवानगी आहे. अशा प्रकारे अल्पवयीन डी-मॅट खाते तांत्रिकदृष्ट्या अल्पवयीन व्यक्तीच्या मालकीचे असले, तरी ते शेअरखरेदी किंवा विक्रीमध्ये सक्रियपणे सहभागी होऊ शकत नाहीत. त्याऐवजी पालक किंवा कायदेशीर पालकाने अल्पवयीन व्यक्तीच्या डी-मॅट खात्यात भेट म्हणून शेअर हस्तांतरित करण्याचे निरीक्षण केले पाहिजे. परिणामी, मूल १८ वर्षांचे होईपर्यंत अल्पवयीन व्यक्तीचे डी-मॅट खाते उघडण्याची, बंद करण्याची किंवा व्यवस्थापित करण्याची जबाबदारी पालक किंवा कायदेशीर पालकाची असते. अल्पवयीन मुलाचे डी-मॅट खाते उघडण्यासाठी अनेक संरचित पायर्‍यांचा समावेश असतो. त्यासाठी किमान वयाची अट नाही.
 
ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुम्हाला प्रथम ‘सीडीएसएल’ (सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड) किंवा ‘एनएसडीएल’ (नॅशनल सिक्युरिटिज डिपॉझिटरी लिमिटेड) संबंधित स्टॉक ब्रोकरच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. पुढे जाण्यापूर्वी ब्रोकर तुम्हाला नाव, ई-मेल आयडी किंवा फोन यांसारखी माहिती देण्यास सांगेल. यासाठीची कागदपत्रे पालक आणि अल्पवयीन दोघांसाठी ओळखीचा पुरावा (पॅनकार्ड) पत्त्याचा पुरावा (आधारकार्ड), अल्पवयीन मुलाचे जन्मप्रमाणपत्र, पालकाचा बँक खाते तपशील. अल्पवयीन मुलांचे डी-मॅट खाते संयुक्त खाते म्हणून उघडता येत नाही. अल्पवयीन मुलाचे डी-मॅट खाते उघडताना अनेक फायदे मिळतात. आर्थिक फायदा अधिक मिळतो. कारण, म्युच्युअल फंड आणि शेअर बहुतेकदा इतर गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत जास्त परताना देतात.
 
पालकांना यामुळे त्यांच्या मुलांच्या आर्थिक बाबींचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन करता येते. महाविद्यालयाचा खर्च, लग्न किंवा करिअरशी संबंधित स्थलांतर अशा भविष्यातील गरजांसाठी यातून मिळणारा निधी वापरता येऊ शकतो. मुलांमध्ये आर्थिक साक्षरता वाढते. अल्पवयीन मुलांच्या नावाने नोंदणीकृत डी-मॅट खात्यांवर काही निर्बंध लागू होतात. त्यांना फक्त ‘इक्विटी ट्रेडिंग’ला परवानगी आहे. पालक अल्पवयीन मुलाच्या डी-मॅट खात्याचा वापर करून ‘इंट्रा-डे ट्रेडिंग’मध्ये सहभागी होऊ शकत नाहीत किंवा फ्युचर्स आणि ऑप्शन्स यांसारख्या आर्थिक डेरिव्हेटिव्हजचा व्यवहार करू शकत नाहीत. बाजारातील उच्च अस्थिरता पातळी अल्पवयीन मुलांसाठी जोखीम निर्माण करते, ज्यामुळे व्यवहार केवळ इक्विटींपुरते मर्यादित राहतात. दुसरे म्हणजे, अल्पवयीन मुलांच्या नावाने ट्रेडिंग खाते उघडणे आर्थिक नियमांद्वारे प्रतिबंधित आहे.
 
ब्रोकरेज कंपन्या सामान्यतः ट्रेडिंग आणि डी-मॅट खाती एकत्रित करतात. तरी अल्पवयीनांना त्यांच्या नावाने ट्रेडिंग खाती ठेवण्यास मनाई आहे. अल्पवयीन मुले डी-मॅट खात्याचे संयुक्त खातेधारक असू शकत नाहीत. वेगवेगळ्या नोंदणीप्रक्रिया आणि नियामक चौकटी प्रौढ आणि अल्पवयीन मुलांसाठी डी-मॅट खात्यांमध्ये फरक करतात. सुजाण पालकांनी जागृत होऊन अल्पवयीन मुलांची खाती उघडून त्यांना लवकर आर्थिक साक्षर होण्यास हातभार लावावा. अल्पवयीन मुलांना बँक खाती, म्युच्युअल फंड खाते आणि डी-मॅट खाते उघडून ते ऑपरेट करण्यास दिल्याने ते आर्थिक व्यवहार चांगल्या प्रकारे समजू शकतील. तसेच चक्रवाढ व्याजाचा लाभही चांगला मिळतो. लहान वयात आर्थिक साक्षर होणे आवश्यक आहे. देशाच्या सशक्त अर्थव्यवस्थेसाठी हे तितकेच गरजेचे देखील आहे.
 
Powered By Sangraha 9.0