इल्हानचे काय होणार?

    05-Dec-2025   
Total Views |
Donald Trump
 
नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "बुरख्यात लपेटलेल्या ‘त्या’ महिलेने अमेरिकेचे नागरिकत्व मिळावे म्हणून स्वतःच्या भावाशी लग्न केले. हे अमेरिकन कायद्याच्या विरोधात आहे. ती ‘कचरा’ आहे आणि तिला साथ देणारेही कचरा!” पण, ट्रम्प जिला ‘कचरा’ म्हणाले ती कोण आहे, तर अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील डेमोक्रेटिक पक्षाची खासदार इल्हान उमर. पुढे ट्रम्प म्हणाले, ”तिचे आपल्या देशावर प्रेम नाही. हे असे लोक नाहीत की, जे म्हणतील, चला या जागेला आपण महान बनवू, तर हे असे लोक आहेत, ते तक्रारीशिवाय काहीच करत नाहीत. यांचे आपल्या देशासाठी काहीच योगदान नाही. हे जिथून येतात, तो देशच कचरा आहे.” यावर इल्हन उमर हिने म्हटले की, "ते आम्हाला घाबरवतील, तर आम्ही घाबरणार नाही. आम्ही सोमालियन लोक इथेच राहणार!”
 
उमरला सोमालियाचा आणि सोमालियन लोकांचा खूप अभिमान. पण, ती तर मिनेसोटा राज्यातील एक खासदार आहे. बरं, सोमालियाशी तिच्या खूप चांगल्या स्मृती जुळलेल्या आहेत, असे आहे का? तर तसेही नाही. सोमालियाच्या गृहयुद्धात जीव वाचवण्यासाठी तिचे कुटुंब केनियामध्ये आले. तिथल्या निर्वासितांच्या छावणीतून तिचे कुटुंब पुढे अमेरिकेत आले. इल्हानला आयुष्यात ज्या काही चांगल्या संधी आणि माणसासारखे जगणे तिला मिळाले ते अमेरिकेमध्येच! पण, तरीही उमरला अमेरिकेत राहून स्ाुस्थापित झाल्यावर अभिमान अमेरिकेचा नव्हे, तर सोमालियाचा!
 
असो. मातृभूमी प्रत्येकासाठी प्रिय असते; पण तरीही कर्मभूमीचेही महत्त्व असतेच. उमर तिच्या कर्मभूमी अमेरिकेसाठी काय करते? तर ट्रम्प यांच्या मते, ”ती आणि तिच्या देशातले निर्वासित लोक अमेरिकेसाठी शून्य योगदान देतात आणि फक्त तक्रारींचा पाढा वाचतात.” अर्थात, अमेरिकेतले हे लोक मूळचे अमेरिकेचे नसून दुसर्‍या देशाचे सोमालियाचे आहेत. त्यामुळे त्यांना अमेरिकेविषयी मातृभूमीसारखे प्रेम नसेल कदाचित; पण या परिक्षेपातून आपल्या देशामध्ये काय आहे, हे पाहिले तर? आपल्या देशात असे काही लोक आहेत, ज्यांचे अख्खे खानदान, पूर्वज मूळचेच आपल्या देशातले आहेत. ‘भारत तेरे तुकडे होंगे हजार’ अशी त्यांची इच्छा. ट्रम्प यांचा निकष लावला, तर भारतात राहून भारताबद्दल शून्य आस्था असणारे हे लोकही कचर्‍यापेक्षा कचरा आहेत.
 
तर ट्रम्प याचे म्हणणे की, "२००९ साली इल्हानने अमेरिकेचे नागरिकत्व मिळवण्यासाठी स्वतःच्या भावासोबत अहमद नूर सईद एल्मी सोबत विवाह केला. अमेरिकन कायद्याप्रमाणे बहीण-भाऊ एकमेकांसोबत विवाह करू शकत नाहीत.” याबाबत अमेरिकेच्या लोकांनी मग मागणी केली की, भावासोबत विवाह करून इल्हानने अमेरिकेचा कायदा तोडला. तिने देशाला धोका दिला. त्यामुळे उमरचे नागरिकत्व रद्द करा.
 
अमेरिकेन नागरिकांना किंवा ट्रम्प यांना उमरचा, तसेच मूळच्या सोमालियन; पण आता अमेरिकेत राहणार्‍या लोकांचा राग का असावा? तर १९९० साली गृहयुद्धाला, दहशतवादी कारवायांनी त्रस्त होत, जीवाच्या भीतीने सोमालियामधील लोकांनी जगभरात पलायन केले. ५६ मुस्लीम देश आहेत; पण तिथे पलायन न करता, या लोकांनी पसंती दिली ती युरोप-अमेरिकेला.
 
अतिमानवतावादाच्या दिखाव्यातून युरोप-अमेरिकेने या लोकांचे स्वागत केले. काही वर्षे हे लोक या देशात निर्वासित बनून राहिले; पण काही वर्षेच. त्यानंतर त्यांनी त्यांची लोकसंख्या वाढवली, इथल्या परिसरावर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा निश्चित केली. काही वर्षांत त्यांचा हेतू साध्यही झाला. त्यातूनच इल्हान उमर सारखे लोक अमेरिकेच्या संसदेमध्ये सत्ताधारी झाले; पण आता अमेरिकेमध्ये इस्लामिक अजेंडा चालावा, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले. असो. सोमालिया देशाला ‘कचरा’ म्हणून हिणवणे, यातून ट्रम्प यांची नकारात्मक मानसिकता दिसून येतेच म्हणा.
 
असो. भारतद्वेषी अशीही इल्हानची ओळख आहे बरं. तिने मागे काश्मीरला भेट दिली होती. काश्मिरी लोक पीडित आहेत. भारतात अल्पसंख्याकांवर अत्याचार होतो, असा तिने कांगावाही केला होता. याच उमरसोबत यथावकाश राहुल गांधी यांचे फोटोही प्रसिद्ध झाले होते, तर अशा या इल्हान उमरचे पुढे काय होणार, हे काळच सांगेल.
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.