डोंबिवलीच्या जंगलात मृत राखी तित्तिरांचा खच; १०० हून अधिक पक्ष्यांची शिकार ?

05 Dec 2025 21:00:32
grey francolin


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
डोंबिवलीच्या सातपूल परिसरातील गवताळ परिसरात पक्षीनिरीक्षकांना शुक्रवार दि. ५ डिसेंबर रोजी मृत राखी तित्तिर पक्ष्यांचा खच आढळून आला (grey francolin). याठिकाणी १०० हून अधिक मृत पक्षी फेकण्यात आले होते (grey francolin). वन विभागाने हे सर्व मृत पक्षी ताब्यात घेतले असून या प्रदेशात न सापडणारे हे पक्षी या परिसरात आले कुठून असा प्रश्न पक्षीनिरीक्षकांना पडला आहे. (grey francolin)
 
 
डोंबिवलीच्या पश्चिमेस सातपूल परिसर आहे. याठिकाणी असलेल्या गवताळ प्रदेशात अनेक पक्षीनिरीक्षक पक्षीनिरीक्षणाकरिता जात असतात. शुक्रवारी अशाच भेटीवेळी पक्षीनिरीतज्ज्ञ डाॅ. राजू कसंबे यांना मोठ्या संख्येने राखी तित्तिर पक्षी याठिकाणी फेकून दिल्याच लक्षात आले. त्यांनी लागलीच याची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर कल्याणचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन साधारण १०० हून अधिक मृत पक्षी ताब्यात घेतले. त्याठिकाणी पंचनामा करण्यात आला. मात्र, हे मुंबई महानगर परिक्षेत्रात न दिसणारे हे पक्षी नेमके आले कुठून असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.
 
 
राखी तित्तिर हा गवताळ अधिवासात राहणारा पक्षी आहे. त्याची मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते. त्याच्या मांसाला मागणी असल्याकारणाने या पक्ष्याची शिकार होते. हे मांस ढाब्यांवर किंवा छोट्या हाॅटेलमध्ये चोरट्या पद्धतीने शिजवले जाते आणि विकलेही जाते. मात्र, हा पक्षी भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित असल्याने त्याची शिकार करता येत नाही. अशा परिस्थितीत कल्याण किंवा डोंबिवली परिसरात असणाऱ्या ढाब्यांमध्ये हे पक्षी आणले गेले असल्याची शक्यता आहे. यावेळी संसर्गाने किंवा विषबाधेमुळे हे पक्षी एकत्रितरित्या मृत्यू पावल्याने या पक्ष्यांना पाळणाऱ्या कोण्या व्यक्तीने त्यांना सातपूल परिसरात फेकून दिल्याचा कयास देखील लावण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0