प्रत्येक राज्याचा स्वत:चा सर्वमान्य नेता असतो. असा नेता हा आपल्या राज्यालाच आपले विश्व समजतो आणि त्याच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झपाटल्यासारखा काम करतो. महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीस यांना इतया तरूण वयात हा मान दिला, ही त्यांच्या कर्तृत्त्वाला दिलेली लोकमान्यताच! म्हणूनच आज महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त, देवेंद्र फडणवीस यांच्या रुपात महाराष्ट्राला लाभलेल्या विकासाच्या या आश्वासक चेहर्याची आणि दूरदर्शी नेतृत्वाची दखल घेणे क्रमप्राप्त!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. राज्याचा विकासरथ फडणवीस २०१४ साली मुख्यमंत्री झाले, तेव्हापासूनच गतिमान झाला होता. ‘जलयुक्त शिवार’सारख्या महत्त्वाकांक्षी योजनांनी विकासगंगा अगदी गावागावांतही पोहोचली. २०१९ मध्ये अडीच वर्षे ठाकरेंच्या स्थगिती सरकारच्या काळात त्यात निश्चितच खंड पडला असला, तरी त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि २०२४ पासून पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राची विकासाच्या पातळीवर अविरत घोडदौड सुरुच आहे. त्यामुळे जणू अख्खा महाराष्ट्रच सध्या ‘वर्क इन प्रोग्रेस’ अशा स्थितीत दिसतो.
महाराष्ट्रात होणार्या गुंतवणुकीवरून त्याची सहज कल्पना येते.
२०२५च्या पहिल्या नऊ महिन्यांतच महाराष्ट्राने दोन अब्ज डॉलरची गुंतवणूक उभी केली. ती गतवर्षीच्या तुलनेत ११ टक्क्यांनी अधिक. देशात सर्वाधिक परदेशी गुंतवणूक झालेली दोन राज्ये आहेत- महाराष्ट्र आणि कर्नाटक. महाराष्ट्रात एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान १९.६ अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक नोंदवण्यात आली. स्टार्टअपला चालना देण्याच्या आणि अन्य उद्योगस्नेही धोरणांमुळे देशातील सर्वाधिक स्टार्टअप्सदेखील आज महाराष्ट्रात आहेत. पण, हे सरकार केवळ उद्योगपतींसाठी कार्यरत नाही, तर राज्यातील शेतकर्यांचीही पुरेपूर काळजी घेते. यंदा अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीच्या नुकसानीपोटी सहा जिल्ह्यांतील शेतकर्यांना २४ कोटी ६३ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली.
ऊर्जाक्षेत्रातही फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सर्वस्वी उजळून निघाला. ‘प्रधानमंत्री सूर्यघर योजने’च्या अंमलबजावणीस दिलेली चालना, ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’, ‘सौर कृषीपंप योजना’ यांसारख्या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे फडणवीसांनी ‘सोलर मॅन’ म्हणून ओळख निर्माण केली. आज ऊर्जा क्षेत्रातील त्यांच्या दूरदृष्टीमुळेच राज्याची ‘ग्रीन महाराष्ट्र’च्या दिशेने वेगवान वाटचाल सुरु आहे. विकासाबरोबरच राज्याची कायदा-सुव्यवस्था, सुरक्षा राखण्याची जबाबदारी गृहमंत्री म्हणून फडणवीसांकडेच. त्या पातळीवरही त्यांनी घेतलेले कित्येक निर्णय हे सर्वस्वी पथदर्शी म्हणता येतील. पोलीस भरतीची प्रक्रिया गतिमान करण्यापासून ते पोलिसांसाठी घरे, देशातील पहिली ‘फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन’ असेल किंवा मुंबईत होऊ घातलेला भारतातील पहिला सायबर सियुरिटी प्रोजेट असेल, या त्यापैकी काही ठळक योजना.
देवेंद्र फडणवीस हे तुलनेने तरूण नेते असले, तरी त्यांची राजकीय समज ही एखाद्या मुरब्बी, अनुभवी राजकीय नेत्याइतकीच प्रगल्भ. आजवर राज्यातील चाणाक्ष आणि सर्वमान्य नेता म्हणून शरद पवारांच्या गोतावळ्यातील माध्यमे त्यांच्या नावाने झांजा वाजवित होती. पण, या संकुचित नेत्याचा बेरकीपणा फडणवीस यांनी वेळीच ओळखला आणि त्यांच्या राजकीय शहांना आपल्या डावपेचांचे तितकेच ताकदीचे काटशह दिले. म्हणूनच आज शरद पवार हे राज्याच्या राजकारणात खूप पार्श्वभूमीला गेलेले दिसतात. केवळ दोन-अडीच वर्षांत फडणवीस यांनी केलेली ही कामगिरी थक्क करणारी अशीच. ज्या पवारांनी आजवर अनेक पक्ष फोडून आपले सोयीचे राजकारण केले, त्या पवारांचाच पक्ष फोडून त्यांच्याच पुतण्याला आपल्या बरोबर घेण्याचे फडणवीस यांचे कसब खरं तर विलक्षणच म्हणावे लागेल. यात राज्यात तयार झालेल्या राजकीय परिस्थितीचा वाटा मोठा असला, तरी ही परिस्थिती फडणवीस यांनीच निर्माण केली, हे नाकारुनही चालणार नाहीच.
गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित पीछेहाटीमुळे फडणवीस वेळीच सावध झाले आणि त्यांनी विधानसभा निवडणुकीत जीव तोडून काम केले. पक्षसंघटना अधिक बळकट केली आणि कार्यकर्त्यांच्या मनात पराकोटीचा आत्मविश्वासही फडणवीसांनी जागृत केला. परिणामी, त्या निवडणुकीत भाजपला राज्याच्या इतिहासातील आजवरच्या सर्वाधिक जागा जिंकता आल्या. या निवडणुकीचे परिणाम पाहता, पुढील पाच वर्षे निव्वळ विरोधात बसण्यापेक्षा अजितदादा पवार यांनी फडणवीसांना साथ देणे पसंत केले. अजितदादांना आपल्या बरोबर घेण्याचा त्यांचा निर्णय वादग्रस्त ठरला, तरी त्यामागे फडणवीस आणि वरिष्ठ भाजप नेतृत्वाची दूरगामी कूटनीती होती. राष्ट्रवादीची राजकीय शक्ती खच्ची करणे, राज्य सरकारच्या विरोधातील एक पक्ष कमी करणे आणि आपल्या सरकारचा पाया विस्तृत करणे, हे त्यामागील प्रमुख उद्दिष्ट होते.
फडणवीस यांच्या दृष्टीने भाजप किंवा स्वत:पेक्षा राज्याचे हित अधिक महत्त्वाचे होते. शिवसेनेसंदर्भातही हेच तत्त्व होते. शिवसेनेला फडणवीसांनी दिलेली ती एकप्रकारे संजीवनी असली, तरी त्या पक्षावरील घराणेशाहीचे झाकोळ दूर करणारी आणि भाजपला साहाय्यभूत ठरणारी होती. शिंदे यांचे नेतृत्व त्यामुळे प्रस्थापित झाले, पण त्याचा लाभ राज्यातील महायुती सरकारला मिळाला. एवढेच नाही तर ठाकरेंच्या मराठी माणसाच्या नावावरुन सुरु असलेल्या राजकारणालाही फडणवीसांनी प्रत्यक्ष कृतीतून कायमस्वरुपी सुरुंग लावला. मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासातून सामान्य मराठी माणसाला टोलेजंग इमारतीत आणि तेही वरळीतच ५०० चौ. फुटांचे घर मिळाले, ते केवळ आणि केवळ फडणवीसांच्या कार्यक्षमतेमुळेच! एकेकाळी केवळ अशक्यप्राय वाटणारा धारावी पुनर्विकास प्रकल्प असेल किंवा एकूणच मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्याचे व्हिजन, ते फडणवीसांच्या नेतृत्वात आता स्वप्न न राहता, पुढील काही वर्षांत सत्यात उतरणार आहे, हा त्यांच्या धोरणीपणाचाच आणखीन एक आदर्श!
राजकारण हा नेत्याच्या जीवनातील अटळ भाग असला, तरी सत्ता हाती असल्यावर राज्य आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावणे यांना प्राथमिकता द्यावी लागते, तेव्हाच ही सत्ता टिकून राहते. फडणवीस यांनी हे अचूक ओळखले. भविष्याचा विचार करून राज्यात विकासाच्या नव्या संधी उपलब्ध करणे, हाही नेत्याच्या दूरदर्शी नेतृत्वाचा निकष. यासंदर्भात पालघर येथे प्रस्तावित वाढवण बंदराचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या बंदराची कल्पना आणि ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी फडणवीस यांनी केलेले अथक परिश्रम पाहिल्यास फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची खात्री पटते. वाढवण या खोल समुद्रातील बंदराची उभारणी पूर्ण झाल्यावर ते देशातील सर्वांत मोठे बंदर ठरेल. समुद्रमार्गे होणार्या देशातील मालवाहतुकीचा ६५ टक्के हिस्सा ते पटकावील. सध्याच्या जेएनपीटीपेक्षाही अनेक पटीने ते मोठे बंदर ठरेल. पण, केवळ एक नवे बंदर उभे करून फडणवीस थांबलेले नाहीत, तर त्यांनी या बंदरापर्यंत येण्या-जाण्यासाठी महामार्ग उभारण्याचीही योजना हाती घेतली आहे.
इतकेच काय, मुंबईतील सागरी महामार्गाप्रमाणेच वाढवणलाही अशाच एका सागरी महामार्गाने जोडण्याचा प्रकल्प विचाराधीन आहे. या बंदराजवळून बुलेट ट्रेनचाही मार्ग नेण्यात येणार आहे. तसेच राज्यातील नवा विमानतळही तेथे उभारण्याचा फडणवीस यांचा मानस आहे. अशी ही फडणवीसांच्या नियोजनातून भविष्यात चौथी मुंबई आकाराला येणार आहे. यावरून एका बंदरामुळे या सार्या परिसराचाच कसा संपूर्ण कायापालट होईल, याची कल्पना येते. नवी मुंबईत दुसरा विमानतळ उभारतानाच, त्या परिसरात तिसरी मुंबई वसविण्याची योजनाही फडणवीसांनी कार्यान्वित केली. तेथे औद्योगिक हब विकसित होईल. मुंबईत सुरू असलेले मेट्रो रेल्वे आणि अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे जाळे हे देखील तितकेच विलक्षण. यामागील प्रेरणाशक्ती ही फडणवीसच आहेत.
नगरसेवक पातळीपासून पक्षाचे काम करीत फडणवीस मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचले. महापौर, आमदार, विरोधी पक्षनेता आणि मुख्यमंत्री या नात्याने त्यांना सरकारी यंत्रणेची बारकाईने माहिती आहे. नोकरशाही कशी काम करते आणि त्यांच्याकडून कसे काम करवून घ्यावे लागते, हे फडणवीस अचूक जाणतात. नोकरशाहीवर पकड असल्यानेच राज्यातील अनेक प्रकल्प हे बहुतांशी वेळेवर पूर्ण होताना दिसतात. नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे फडणवीस यांचे जीवनही राष्ट्रकार्याला वाहिलेले. ‘कोरोना’ काळात तर राज्याचे विरोधी पक्षनेते असूनही फडणवीसांनी राज्य पिंजून काढत,
आपण ‘महाराष्ट्र सेवक’ असल्याचे दाखवून दिले. विरोधकांनी शरीरयष्टीवरुन, जातीवरुन, कुटुंबावरुन त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीची वैयक्तिक टीका केली. पण, तरीही फडणवीसांनी आपला संयम कधीही ढळू दिला नाही. उलट आपल्या कृतीतूनच त्यांनी विरोधकांना निरुत्तर केले. म्हणूनच फक्त लाडक्या बहिणींचेच नाही, तर समस्त महाराष्ट्राचे ते लाडके ‘देवाभाऊ’ ठरले. त्यामुळे आपला प्रत्येक क्षण ते राज्याच्या, पर्यायाने देशाला मजबूत आणि विकसित करण्यासाठी खर्च करतात. म्हणूनच ‘केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ यासारख्या घोषणा तयार झाल्या. त्या केवळ राजकीय नव्हत्या, तर ती जनतेसाठी काम करणार्या नेत्याच्या कार्यकर्तृत्वाला दिलेली दाद होती. येत्या पाच वर्षांत विकासकामांमुळे मुंबईसह महाराष्ट्राचा चेहरामोहरा सर्वस्वी बदलणार आहे, पण राज्याच्या नेतृत्वाचा चेहरा मात्र एकच राहील- तो म्हणजे देवेंद्र फडणवीस!