मुंबईकरांची साथ भाजपलाच!

    05-Dec-2025   
Total Views |
 
BJP
 
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची घोषणा अद्याप व्हायची असली, तरी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी फार आधीपासूनच सुरू केली आहे. यात भाजपच्या वतीने मुंबईकेंद्रित एक विशेष मोहीम राबविण्यात आली. ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ असे या मोहिमेचे नाव. मुंबईतील समस्या आणि त्यावर अपेक्षित सुधारणांबद्दल मुंबईकरांची मते जाणून घेत, त्याआधारे महापालिका निवडणुकीसाठीचा जाहीरनामा तयार करणे, हा या मोहिमेमागचा उद्देश. वास्तविक, निवडणुका आल्या की, सगळेच राजकीय पक्ष आपापला जाहीरनामा किंवा संकल्पनामा प्रसिद्ध करतात. मग, त्यात कुठे घोषणांचा पाऊस असतो, तर कुठे मोठमोठी आश्वासने. मात्र, लोकांच्या समस्या काय आहेत ते समजून घेऊन त्यावर आधारित आपला जाहीरनामा काढणे, ही मुंबई भाजपने राबविलेली स्तुत्य आणि अनोखी मोहीम म्हणावी लागेल. याचे कारण असे की, या मोहिमेतून त्यांच्यापर्यंत केवळ मुंबईकरांच्या सूचनाच पोहोचल्या नाहीत, तर मुंबईकर त्यांच्याशी जोडली गेली.
 
मुंबईतील डबेवाले, सफाई कामगार, ऑटो रिक्षाचालक, विविध क्षेत्रांतील मान्यवर, चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी या सर्वांपर्यंत स्वत: पोहोचून मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम यांनी त्यांच्या समस्या जवळून समजून घेतल्या. त्यामुळेच मुंबईकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुंबई भाजपचा ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ हा अभिनव उपक्रम निश्चितच आपुलकीचा धागा निर्माण करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. यातून भाजपने काय साध्य केले? पहिली गोष्ट अशी की, या मोहिमेमुळे भाजप मुंबईकरांच्या घराघरांत पोहोचली. दुसरे म्हणजे, मुंबईत सुरू केलेल्या विकास प्रकल्पांविषयी मुंबईकरांचे मत काय आहे, हे त्यांना समजून घेता आले. याशिवाय, आपल्या नगरसेवकाविषयी मुंबईकर जनतेच्या भावना काय आहेत, हेही त्यांना कळले. अवघ्या अडीच महिन्यांत मुंबई भाजपने दोन लाख ६५ हजार ७३८ मुंबईकरांच्या सूचना प्राप्त केल्या. त्यामुळे या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद पाहता, मुंबईकर जनता यंदा भाजपला नक्की साथ देईल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 
काँग्रेसच्या ‘हाता’ला ठेंगाच!
 
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच मुंबई काँग्रेसतर्फे प्रदूषणमुक्त मुंबईचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. "आपण दिल्लीकडे जात आहोत का?” असा सवाल यावेळी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला. शिवाय, आमची सत्ता आल्यास आम्ही मुंबई प्रदुषणमुक्त करणार असल्याचा दावाही यावेळी काँग्रेस नेत्यांनी केला. मुंबईत वायुप्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे, ही गोष्ट खरी. त्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनातर्फे विविध उपाययोजनाही राबविण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. वायुप्रदूषणाला कारणीभूत ठरणार्‍या विविध बांधकामांना ‘कामे थांबवा’ नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. ‘रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम’, बेकरी, तसेच स्मशानभूमीचे स्वच्छ इंधनावर परिवर्तन, धूळ आटोयात आणण्यासाठी मिस्टिंग मशीनच्या साहाय्याने फवारणी, पाण्याने रस्ते धुवून काढणे आणि विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन, नागरिकांमध्ये जनजागृती यांसह विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
 
परंतु दुसरीकडे, आता निवडणुका असल्यामुळे अचानक काँग्रेसला मुंबईतील वायुप्रदूषणाची चिंता सतावू लागली. गरज पडली की, देव आठवतो असे म्हणतात; तसेच काहीसे काँग्रेसचे झाले. बरे, काँग्रेसला फक्त मुंबई प्रदूषणमुक्त करायची आहे. मग, मुंबईतील इतर समस्यांचे काय? मुंबईकरांची आपल्या दैनंदिन समस्यांपासून कशी सुटका होणार? की, त्यांनी वारंवार त्या समस्यांचा सामना करत राहावा? याचे उत्तर काँग्रेसने द्यायला हवे. वायुप्रदूषणाबरोबरच मुंबईत इतर अनेक प्रश्नही आहेत. परंतु, अद्याप काँग्रेसने यावर आवाज उठवलेला दिसत नाही. दुसरी गोष्ट अशी की, सध्या काँग्रेस ज्या प्रश्नावर आक्रमक झाली आहे, त्या मुंबईतील वायुप्रदूषणासाठी काँग्रेस पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघात किंवा विभागात काही तरी प्राथमिक उपाययोजना राबविल्या का? तर नाही! तसेच मुंबई प्रदूषणमुक्त करु म्हणणार्‍या काँग्रेसने पालिकेत नाही, तर राज्यात दहा वर्षे सत्तेत असताना किती वर्षांत पहिली मेट्रो आणि वांद्रे-वरळी सेतूचे काम उभे केले, हे मुंबईकर विसरलेले नाही. एकूणच काय सतत बदलती भूमिका, ठोस आश्वासनांचा अभाव यांसारख्या कारणांमुळे मुंबईकर काँग्रेसच्या ‘हाता’ला यंदाही ठेंगाच दाखविणार, हे निश्चित!
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....