॥सौंदर्यलहरी भाष्य भाग ६॥

    04-Dec-2025
Total Views |

 
Saundarya Lahari

 
हरिस्त्वामारध्य प्रणत-जन-सौभाग्य-जननीं

पुरा नारी भूत्वा पुररिपुमपि क्षोभ मनयत्|

स्मरोपि त्वां नत्वा रतिनयन-लेह्येन वपुषा

मुनीनामप्यन्तः प्रभवति हि मोहाय महताम्॥५॥

हरी अर्थात विष्णूने श्री ललितादेवीची आराधना केली आणि त्याचे फळ म्हणजे त्याला, त्रैलोयरक्षणाचे आणि विविधरूपे धारण करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाल्याचा उल्लेख, वामकेश्वर महातंत्रात आला आहे. समुद्रमंथन केल्यावर त्यातून अमृत प्राप्त झाले. हा अमृतकुंभ आपल्याला मिळावा, म्हणून देव आणि दानव यांचा संघर्ष पेटला. अमृतप्राशन करणारा दीर्घायु आणि निरामय होणार होता, त्यामुळे देव आणि दानव दोघांनासुद्धा अमृत हवे होते. या संघर्षमय स्थितीत तिथे, विष्णूने मोहिनी अवतार धारण करून प्रवेश केला. या मोहिनीने समस्त दानवांना आपल्या सौंदर्याने विमोहित केले आणि तिने युक्ति-प्रयुक्तीने या दानवांना गुंतवून ठेवत रिझवत, संपूर्ण अमृत हे देवांमध्ये वाटून टाकले. विष्णूचा हा मोहिनी अवतार श्री ललिता देवीने प्रदान केलेल्या सामर्थ्यामुळेच शय झाला होता.

एकदा शंकर आणि पार्वती हे विष्णु आणि लक्ष्मीच्या भेटीस गेले असताना, शंकराने मोहिनी स्वरूप धारण करण्याचा विष्णूला आग्रह केला. विष्णूने ते स्वरूप धारण केल्यावर आपल्यासह पार्वती आहे याचा विसर पडून शंकर मोहिनीवर अनुरक्त झाले, त्यांचे मन क्षोभित झाले. सतीने अग्निकाष्ठ भक्षण केल्यावर तपस्यारत शंकराने, आपली तपस्या भस्म करणार्‍या कामदेवाला तृतीय नेत्राने भस्मिभूत केले होते. अर्थात, ‘कामदेवाचे रिपु’ ही पदवी शंकराला शोभून दिसते परंतु, मोहिनीला पाहिल्यानंतर मात्र साक्षात शंकरसुद्धा विचलित झाले, क्षोभित झाले, इतके सुंदर रूप मोहिनीचे होते. आणि मोहिनी रूपातील विष्णुला इतके परम सुंदर रूप धारण करण्याचे सामर्थ्य देणारी शक्ति श्री ललितादेवीच आहे.

कामदेव हा संपूर्ण जगावर राज्य करतो. त्याचे निव्वळ स्मरण केले तरी त्याने मोठमोठे ऋषी कामवश होतात, उत्तेजित होतात. वास्तवात समस्त ऋषिजन हे इंद्रियसंयम साध्य व्हावा, वासनेचा क्षय साधावा, म्हणून सातत्याने आणि दीर्घकाल प्रतीक्षारत असतात. ऋषींच्या सिद्धी आणि सामर्थ्याचे कारण त्यांची दीर्घ तपस्या हेच असते. ही तपस्या करण्यासाठी लागणारी नैष्ठिक ब्रह्मचर्याची बैठक साधल्याशिवाय, ऋषी ही पदवीच प्राप्त होत नाही. परंतु, हे ऋषी कामदेवाचे केवळ क्षणमात्रासाठी जरी स्मरण करतील, तर ते विकारी होतील असे सामर्थ्य कामदेवाला प्राप्त आहे. कामदेवाला शंकराने भस्मिभूत केले खरे परंतु, ललिता देवीने त्याला पुनरुज्जीवित करून त्याला असे अनुपम सौंदर्य बहाल केले की, त्याची पत्नी असणारी रति ही स्वतः अनुपम सौंदर्याची स्वामिनी असूनही ती कामदेवाच्या प्रेमात आकंठ बुडालेली असते. श्री ललितादेवीने त्याला असे सामर्थ्य प्रदान केले की, थोर थोर तपस्वी असणारे ऋषी त्याच्या निव्वळ स्मरणानेसुद्धा कामवश होतात. कामदेवाला भस्मिभूत करणारा शंकरसुद्धा, मोहिनी रूपाला बघून विचलित होतो. हे सगळे सामर्थ्य श्री ललितादेवीचेच आहे. थोडयात श्री ललितादेवीची उपासना तुम्हाला कामभावनेच्या तृप्तीसाठी लागणारे सामर्थ्य, स्वरूप आणि तेज प्रदान करते. आदि शंकराचार्य विरचित सौंदर्यलहरी या स्तोत्रावलीतील प्रत्येक श्लोकाच्या पठणाचे वेगवेगळे फळ आहे. या श्लोकाचे आवर्तन पतीपत्नींचे नाते दृढ करते, परस्पर प्रेम वृद्धिंगत होते.

भावार्थ - दक्षप्रजापती यांना दोन पत्नी होत्या, एक दिती आणि दुसरी आदिती. दितीची संताने दानव आणि असुर म्हणून ओळखली जातात आणि आदितीची संताने देव म्हणून ओळखली जातात. समुद्रमंथनाची कथा ही एक रूपक कथा असून, तिचा गर्भितार्थ समजून घेणे आवश्यक आहे. समस्त जगत अर्थात संसार हा महासागर आणि अनेक रत्नांची खाण आहे. प्राकृतिक विज्ञानाची रहस्ये हीच ती रत्ने आहेत, ज्यांच्या प्राप्तीसाठी ध्यानरूपी मंथन केले जाते. या मंथनासाठी वापरली जाणारा दोर अर्थात वासुकी नाग म्हणजे, आपले मन आहे. या नागाचे मुख हे बहिर्मुख आहे आणि शेपटी ही अंतर्मुख आहे. असुर अर्थात दानवांकडे मुख आले आणि देवांच्या बाजूला शेपटी आली. त्यामुळे दानव/असुर यांचे मन त्यांना बहिर्मुख अर्थात भौतिक स्वरुपाच्या गोष्टींकडे आकृष्ट करते. तर शेपटी देवांकडे आल्यामुळे ते आध्यात्मिकदृष्ट्या चिंतन करतात.

आसुरी प्रवृत्ती भौतिक विज्ञानात अनेक शोध लावतात आणि दैवी प्रवृत्ती, अंतरात्म्याचा शोध घेत आध्यात्मिक शोधांकडे प्रवृत्त होतात. आत्मज्ञान हे अमृत आहे आणि भौतिक विज्ञान हे विष आहे. आधुनिक वैज्ञानिक शोध हे सगळेच अधिकाधिक भौतिक सुख प्रदान करणारे आहेत आणि त्याचे फळ नश्वर आहे. यातून भौतिक सुख निश्चित प्राप्त होते; परंतु त्याच्या जोडीला अनेक दुःख आणि वेदनांचा उदयसुद्धा याच भौतिक शोधांच्या माध्यमातून होतो आहे; हे सुद्धा सत्य आहे. सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आण्विक शक्तीचा शोध आपल्याला असीमित ऊर्जा प्रदान करू शकतो; परंतु त्याच आण्विक ऊर्जेचा गैरवापर लक्षावधी मानवांचा क्षणात संहारसुद्धा करू शकतो. आधुनिक शोध असेच दुधारी शस्त्र आहेत. भगवतीची मोहमाया बहिर्मुखी व्यक्तींना, आत्मिक समाधान रूपी अमृतापासून कायमच वंचित ठेवते. भौतिक स्वरूपाचा मोह शंकराच्या समान तपस्वी रूपालासुद्धा, काही क्षणांसाठी विचलित करू शकतो. मोह-माया इतकी प्रबळ आहे.

मुमुक्षू साधकाने म्हणूनच संसार सागरातील लुभावणार्‍या, बहिर्मुख प्रतिभा जागृत करणार्‍या आणि भौतिक विज्ञानाच्या माध्यमातून अंतिमतः दुःख प्रदान करणार्‍या रत्नांपासून, स्वतःला निग्रहाने मुक्त ठेवणे आवश्यक आहे. आत्मा हा अमर असल्याने त्याला कोणतेही विष नष्ट करू शकत नाही. शंकर हे आपले आत्मतत्व आहे, जे भौतिक सुखाचे हलाहल प्राशन करूनही अमर राहिले.

स्त्री स्वरूपाचा, स्त्रीच्या सौंदर्याचा मोह सर्वांनाच पडतो. परंतु, तिच्या स्वरुपात विलीन होणे आणि तिला शरण जाणे, हे मोक्षमार्ग प्रशस्त करणारे सिद्ध होते. आदि शंकराचार्य इथे ब्रह्मचर्याचे श्रेष्ठत्व अबाधित ठेवत, प्रपंचात राहूनही आत्मोन्नती साधणे किती सहज आणि सुलभ आहे, हे समजावून सांगत आहेत. पत्नीच्या सौंदर्यावर, गुणांवर लुब्ध होऊन तिच्याशी तादात्म्य पावणे, हेसुद्धा मोक्षानुगामी बनवू शकते, असेच आचार्य सांगत आहेत.

मदनाच्या अर्थात कामदेवाच्या सौंदर्याचे वर्णन करताना आचार्य, त्याची पत्नी रति त्याच्या सौंदर्याचे रसपान आपल्या अनिमिष नेत्रांनी करत आहे, असे सांगत आहेत. अर्थात, पत्नीच्या सौंदर्यावर लुब्ध होणे हा जितका पुरुषाचा अधिकार आहे, तितकाच आपल्या पतीच्या रूपावर आणि गुणांवर लुब्ध होण्याचा अधिकार पत्नीला आहे, हेसुद्धा आचार्य ठामपणाने प्रतिपादन करत आहेत आणि दोघांच्या या परस्पर आसक्ती, प्रेम आणि सामरस्याचा आनंदसुद्धा त्यांना मोक्षानुगामी करू शकतो. शिवशक्ती ऐय रुपाचे, सामरस्याचे हे अनुपम उदाहरण असून, पतिपत्नीसुद्धा त्याच सुखाची, तृप्तीची, परमानंदाची अनुभूती एकमेकांच्या सहवासात घेऊन, आत्मोन्नती साधू शकतात असा या श्लोकाचा अर्थ आहे.

पतिपत्नींचे पारस्पारिक प्रेम आणि सामंजस्य त्यांना, परम सुखाची अनुभूती प्रदान करू शकते. या मिलनातून त्यांना सर्व भौतिक सुखे प्राप्त होऊन, त्यांच्या वासनांचे शमन होऊन, त्यांना तृप्ती अनुभवता येईल. इतकेच नाही, तर या मिलनातून आणि सहवासातून त्यांचे दोघांचेही आत्मतत्त्व जागृत होऊन, त्यांचा मोक्षप्राप्तीचा मार्ग प्रशस्त होईल. आज विवाह संस्थेचे अस्तित्व आणि आवश्यकतेबद्दल प्रश्न उपस्थित होत असताना, आचार्यांनी मांडलेला विचार संपूर्ण हिंदू समाजाला एखाद्या मशालीप्रमाणे मार्गदर्शन करणारा सिद्ध व्हावा, हीच श्री ललिता त्रिपुरसुंदरीमातेच्या चरणी भावपूर्ण आळवणी आहे.

- सुजीत भोगले