मृत्यूचे रहस्य ( भाग-५६ )

04 Dec 2025 11:05:31
 
The mystery of death
 
सातव्या महिन्यानंतर जीवात्मा मातृउदरात प्रवेश करतो, याचे सत्य उदाहरण आपण पाहू.
 
पुरीचे बाबाजी
 
लेखकाच्या वाचनात गुजरातचे योगी कृष्णानंद यांचे एक पुस्तक आले. त्यात त्यांनी पुरीच्या बाबाजींची कथा विस्तृतपणे लिहिली आहे. कथा अशी की, योगी कृष्णानंद एकदा जगन्नाथपुरीला गेले होते. खोलीच्या खिडकीत उभे असता, त्यांना समोरील कचराघरात एक वेडा माणूस त्या कचर्‍यात काहीतरी खाण्यास मिळेल, या आशेने शोधताना दिसला. योगी कृष्णानंद त्या वेड्याकडे केळी व मोसंब्या त्याला खाण्याकरिता देण्यास घेऊन गेले आणि त्या वेड्याला म्हणाले, "पगले, यह खा ले|” आदेशानुसार न वागता, तो वेडा म्हणतो "बैस बाबा, मी तुझीच वाट पाहात होतो.” योगी झाला म्हणून काय झाले? एका वेड्यासह कचराघरातील घाणेरड्या जागेत बसेल काय? कपडे खराब होतील आणि लोक काय म्हणतील? योग्याच्या मनातील चलबिचल पाहून तो वेडा म्हणतो, "खरे आहे. घाण शरीरावर स्वच्छ घातलेले परीटघडीचे कपडे घालून कसे घाणीत बसायचे? कपडे मळतील ना?’
 
वेड्याचे बोलणे ऐकून योगी अवाक् झाला. योग्याने त्या वेड्याचे नव्हे, ज्ञानी पुरुषाचे पाय धरले आणि कचर्‍यात बसला. त्यांचा संवाद असा. ’बरे झाले तू आलास. मला तुझ्याकडून काही काम करवून घ्यायचे होते. "काय काम आहे बाबाजी?” योगी. "बाबा रे, मी उद्या सकाळी ठीक १०.१५ वाजता मरणार आहे. तू १०.१० वाजता येथेच ये. मी मेल्यावर मग तू माझे उत्तरक्रियाकर्म कर,” असे म्हणून, बाबाजींनी आपल्या फाटया कोटातून २५ रुपये काढून त्यांच्याजवळ दिले. योगी हो-नाही करत होता, पण बाबाजींचा आग्रह पडल्यामुळे योगी कृष्णानंदाला ते २५ रुपये घ्यावे लागले.
 
चांगला धडधाकट माणूस! काही रोग नाही. मग हा गृहस्थ उद्या मरणार कसा, असा प्रश्न योग्याच्या मनात आला. पण, "मी उद्या मरणार! शंका धरु नकोस,” असे सांगून, ती केळी वा मोसंब्या न खाताच बाबाजी जायला निघाले. इतयात त्यांना आठवण आली. त्या बोळाच्या वाकड्या वळणावर, एक बाई आपल्या रोगाने जर्जर अशा मुलाला घेऊन दीनपणे बसली आहे. तिला त्या मोसंब्यांची आवश्यकता असल्यामुळे, त्या मोसंब्या त्या गरीब बाईला देण्यास त्या योग्याला बाबाजींनी सांगितले. सांगितल्याप्रमाणे योगी गेले, तर खरेच एक बाई आपल्या रुग्ण मुलाला घेऊन चिंताक्रांत बसलेली त्यांना दिसली.
 
"त्या मोसंब्या बाबाजींनी पाठविल्या आहेत,” असे सांगताच, पाच सहा दिवसांच्या भुकेल्या अशा तिच्या मुलाला मोसंब्या मिळाल्यामुळे तिने ईश्वरास धन्यवाद दिले. पण हे बाबाजी कोण, हे तिला कळेना. त्या बाईचे प्रकरण पाहून योग्याच्या मनात बाबाजींबद्दल अधिक आदर उत्पन्न झाला. योग्याने परत येऊन पुन्हा बाबाजींचे पाय धरले. पुढील संवाद महत्त्वाचा आहे. "बाबाजी, एक विचारू का?” योगी. "विचार.” बाबाजी. "आपण सकाळी म्हणालात की, तुम्ही उद्या सकाळी मरणार. पण तुम्हाला रोग नाही, काही नाही. मग तुम्ही मरणार कसे?” योगी. "बाबा रे, मरायला रोगग्रस्त शरीर वा तत्सम काही कारणे लागतात, अशी का तुझी कल्पना आहे? मरायची वेळ आली की मरायचे. त्यात काय? मी उद्या सकाळी १०.१५ वाजता नक्की मरणार. तू तेथे अवश्य ये बरे!” बाबाजी. "मी येईन बाबाजी. पण एक विचारतो. तुम्ही मेल्यावर तुम्हाला मुक्ती आहे की, आणखी पुन्हा तुम्ही जन्म घेणार?” योगी. "मी बंगाल देशातील कोलकात्याच्या बेहाला मोहल्यात राहणार्‍या, हरिमोहन नावाच्या एका लोहाराच्या पोटी जन्म घेणार आहे. त्यानंतर मला मुक्ती मिळेल, अजून एक जन्म घ्यावा लागेल.” बाबाजी. "मग जन्म केव्हा घेणार?” योगी. "आजपासून दोन महिन्यांनी.” बाबाजी. "पण बाबाजी, आपण तर कमीत कमी नऊ महिने नऊ दिवसांनी मातृउदरातून जन्म घेऊ शकतो.”
 
"बाबा रे आपल्या जन्माच्या कल्पना बरोबर नाहीत. प्रथम दिवसापासून गर्भधारणा झाल्यानंतर, सात महिन्यांपर्यंत माता त्या गर्भाचे स्वतःच्या प्राणशक्तीने पोषण करते. सातव्या महिन्यात गर्भाची पूर्ण वाढ झाली की, बाहेरील योग्य धारणेचा जीवात्मा त्या योग्य धारणेच्या अशा त्या गर्भात प्रवेश करतो. त्यानंतर तो जीवात्मा मातृउदरात आणखी दोन महिने राहून, दहाव्या मासाच्या सुरुवातीला मातृउदराबाहेर येतो. म्हणजे मला जन्म घ्यायला आता दोन महिने पुरे,” बाबाजी महान जन्मविज्ञान सांगते झाले.
बाबाजींचा निरोप घेऊन ते योगी आपल्या खोलीवर परत आले. दुसर्‍या दिवशी ठीक १० वाजता ते खोलीसमोरील उकिरड्यावर उपस्थित झाले. बाबाजी तेथे अगोदरपासून वाट बघत होतेच. आता थोड्याच वेळात बाबाजी मरणार, या कल्पनेने योगी सुन्न-विषण्ण झाले होते. त्यांनी बाबाजींकरिता एक कलिंगड खाण्यास नेले होते. बाबाजींनी आता मात्र ते कलिंगड आवडीने खाल्ले, ढेकर दिला, आपल्या फाटया कोटाला हात पुसून बाबाजी योग्याच्या पाठीवर एक चापटी मारून म्हणतात, "आता मी चाललो बरे, माझा देह पडल्यावर मग तू ये आणि मरणोत्तर सर्व क्रियाकर्म निपटून घे. शोक करू नकोस, मी चाललो.” बाबाजींच्या रुपाने तो योगी एक जिवंत मरण पाहात होता. अमर मरण! प्रत्येक पावलागणिक जवळ येणारे मरण! किती विलक्षण भावना, त्या योग्याच्या मनात उचंबळून आल्या असतील? बाबाजी रस्त्याच्या वाकड्या वळणावर अदृश्य झाले. थोड्या वेळाने लोक ओरडायला लागले, "कोण रस्त्यावर पडला? धावा धावा...”
 
योगी समजले, बाबाजींनी देह ठेवला. योगी धावले. बाबाजींचा देह रस्त्यावर धुळीत अस्ताव्यस्त पडलेला पाहिला. ’माती अससी, मातीत मिळसी!’ नंतर पोलीस आले, पंचनामा झाला. मृत्यूचे कारण न समजल्यामुळे त्यांनी ‘हृदयक्रिया बंद पडून ती अनामिक व्यक्ती वारली,’ असे जाहीर केले. नंतर पोलिसांनी ते शव योगी कृष्णानंदांच्या स्वाधीन केले, उत्तरक्रिया झाली. जिवंत मृत्यू! निरोगी मृत्यू! अमर मृत्यू!
 
योगी कृष्णानंद २० वर्षांनंतर कोलकात्याला गेले व त्यांनी बेहाला वेटाळातील हरिमोहन लोहाराच्या घरी चौकशी केली, सर्व गोष्टी खर्‍या निघाल्या. त्या लोहाराला बाबाजींच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनीच एक मुलगी झाली होती. ती मुलगी १७ वर्षांची होऊन मरण पावली. ती म्हणे, रोज जवळच्या शिवमंदिरात जाऊन तासन्तास साधना करीत बसे. मागील जन्मीचा महान साधक मुक्तीकरिता स्त्रीजन्म घेतो. सर्वच विलक्षण, सर्वच चमत्कारिक!
- योगिराज हरकरे 
 
 
Powered By Sangraha 9.0