समाजमाध्यमांवर सध्या एका १९ वर्षीय ‘जेन-झी’च्या विक्रमाने सारेच अचंबित आहेत; पण हा ‘जेन-झी’ सर्वस्वी आगळावेगळा आणि अस्सल भारतीय! ‘शुल यजुर्वेद माध्यंदिन शाखे’चे ‘दण्डक्रम पारायण’ पूर्ण करणार्या या तरुण वेदमूर्तीचे नाव देवव्रत महेश रेखे. महाराष्ट्राच्या अहिल्यानगरचा सुपुत्र असलेल्या महेश यांनी कोणतेही पुस्तक न चाळता, तब्बल दोन हजार मंत्रांचे पठण केले आणि तेही ५० दिवसांत. वेदाध्ययनातील ही अत्यंत अवघड अशी परीक्षा महेश रेखे यांनी सगळ्यात कमी वयात पूर्ण केली, हे विशेष. त्यांचे समाजमाध्यमांवरील व्हिडिओ, फोटो बघून एक हिंदू म्हणून कोणाचाही ऊर अभिमानाने अगदी भरून यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महेश यांच्यावर कौतुकवर्षाव केला; पण ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो...’ म्हणून आरोळी ठोकणार्या एकाही नेत्याने, त्यांच्या पक्षाने या महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या गौरवार्थ साधे ट्विटही करायचे सौजन्य दाखवले नाही. मग, महेश रेखे या नेत्यांच्या लेखी हिंदू नाहीत का?
‘आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही’, ‘आम्हाला कुणी हिंदुत्वाचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही’ वगैरे वल्गना करणारे उद्धव ठाकरे असतील अथवा मागे ‘हिंदुजननायक’ म्हणून भगवी वस्त्र ओढून झळकलेले राज ठाकरे असतील, यांना काशीतील महेश रेखे यांच्या अद्वितीय कामगिरीची माहितीच कानी पडली नसेल, असे कदापि मानण्याचे कारण नाही. मग, अडचण ती काय? थोडा विचार केला, तर असे लक्षात येते की, प्रबोधनकारांचा वारसा सांगणार्या ठाकरेंच्या दृष्टीने असे वेदपठन करणारे, ब्राह्मण, पुराणमतवादी हिंदू वगैरे त्यांच्या लेखी ‘हिंदू’ या व्याख्येतच मुळी बसत नाहीत. उद्धव ठाकरेंनीच वेळोवेळी म्हटले आहे की, "शेंडी-जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही.” महेश रेखेही मग त्यांच्यालेखी याच शेंडी-जानवेवाले हिंदूच! हिच खरी गोची! म्हणजे अचकट-विचकट चाळे करणार्या रीलस्टार वगैरेंना पक्षाचे व्यासपीठ द्यायचे, त्यांना मान-सन्मान देऊन प्रसिद्धी पदरात टाकायची; पण महेश रेखे यांच्यासारख्या हिंदू तरुणाने आणि त्यातही महाराष्ट्रातील मराठी मुलाच्या या अद्भुत कामगिरीसाठी साधा कौतुकाचा एक शब्दही नाही, पाठीवरची थाप तर मग दूरचीच. असो. यानिमित्ताने का होईना, पण, मराठी आणि हिंदुत्वाचा बुरखा पांघरणार्यांचे खरे चेहरे महाराष्ट्राच्या पुनश्च समोर आले, ते बरे झाले!
ठाकरेंचे सोयीचे हिंदुत्व
हिंदू धर्माआड वेडेवाकडे राजकीय हिंदोळे घेऊन, मतांचा जोगवा मागणार्यांच्या दुटप्पीपणाची ही काही पहिलीवहिली वेळ नव्हेच. खरं तर हिंदूंचा, हिंदुत्वाचा वेळोवेळी पाणउतारा केल्यानंतरही ‘आम्ही हिंदूच’ असे मानण्यात आणि मिरवण्यात यांना काडीचीही लाज कशी वाटत नाही, असा प्रश्न या नेत्यांची विधाने ऐकून सर्वसामान्य हिंदूंना पडावा. पण, तरीही या नेत्यांना त्यांच्यातील हिंदूपण, हिंदुत्वाची मशाल वगैरे आजही अगदी पेटती वगैरे आहे, असे वाटते. कारण, हे नेते एका भ्रामक जगात आणि ‘हांजी-हांजी’ करणार्यांच्या गराड्यातच जगत असतात. राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविलेले आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हे त्यांपैकीच एक. हिंदुत्वाची कास सोडून ठाकरेंनी खुर्चीसाठी काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत ‘किमान समान कार्यक्रमा’च्या नावाखाली ‘महाविकास आघाडी’चा प्रयोग केला, तिथेच मुळी त्यांनी हिंदुत्वाला तिलांजली वाहिली होती. पण, त्यानंतरही आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात ‘कोविड’ काळात मंदिरे बंद ठेवणे असेल, ‘हनुमान चालीसा’ म्हटल्यावरून राणा दाम्पत्याला तुरुंगवारी घडवणे असेल, ‘अझान’ स्पर्धेचे आयोजन, ‘ऊर्दू भवन’चा घातलेला घाट असेल, अशा कित्येक निर्णयांमधून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला खुंटीलाच टांगलेले दिसले.
तिच गत भूमिका सातत्याने बदलणार्या राज ठाकरेंचीही. एकीकडे दिवाळीत शिवाजी पार्कात नेत्रदीपक आतषबाजी वगैरे आयोजित करून मुंबईकरांचे डोळे दिपवायचे आणि दुसरीकडे गंगास्नानावरून हिंदूंच्या भावनाही दुखवायच्या. "नुकताच ‘कोरोना’ संपला. आपण ‘कोरोना’ विसरलो का? लोकांनी तिथे गंगेत घाण साफ केली आणि मी इथे गंगाजल प्यावे, अशी तुमची अपेक्षा आहे का? अशा भक्तीचा अर्थ काय? लोकांनी अंधश्रद्धेतून बाहेर पडणे आवश्यक आहे,” असे मत मागे राज ठाकरेंनी व्यक्त केले आणि हिंदूंसाठी पवित्र गंगेची अवहेलना केल्यामुळे ते टीकेचे धनीही ठरले. त्यामुळे उद्धव असो अथवा राज ठाकरे, यांनी वेळोवेळी राजकीय सोयीनुसारच हिंदुत्वाची भूमिका स्वीकारलेली किंवा सोडलेली दिसते. त्यामुळे मतदारांनीही या ठाकरे बंधूंच्या या हिंदुत्वाच्या काल्पनिक जाळ्यात न अडकलेलेच बरे!