कुत्र्याचे शेपूट वाकडेच राहणार!

04 Dec 2025 10:24:11
 
Parliament
 
संसदेच्या चालू अधिवेशनात घोषणाबाजी आणि नाटके न करता, लोकांच्या प्रश्नांवर गंभीर चर्चा करण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्याच दिवशी केली होती. मात्र, विरोधकांनी पहिल्या दिवसापासूनच संसदेत गोंधळ घालण्यास प्रारंभ केला. ते करताना विरोधक रोज आपल्या विध्वंसक आणि असभ्य वर्तनाची नवनवी उदाहरणे लोकांपुढे सादर करीत आहेत.
 
एखाद्याची जुनी सवय काहीही केले तरी जाणार नाही हे सांगताना, कुत्र्याच्या शेपटीचे उदाहरण दिले जाते. अगदी १२ वर्षे जरी एका सरळ नळीत घालून ठेवले, तरी ‘कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच’ राहते, असे सांगून हा मुद्दा पटविला जातो. संसदेचे कोणतेही अधिवेशन सुरू झाले की, भारतातील विरोधी पक्षांच्या अंगात संचारते. गेले अधिवेशन गदारोळात संपले आणि चालू अधिवेशनातही ‘एसआयआर’च्या मुद्द्यावरून गदारोळ घालण्याचा विरोधी पक्षांचा हेतू पहिल्याच दिवसापासून स्पष्ट झाला.
माजी केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी यांनी या अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी संसद भवन परिसरात आपल्या मोटारीतून एका कुत्र्याला आणले; पण त्यांना कुत्रा घेऊन संसद भवनात जाण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर पत्रकारांनी या प्रकारावर खुलासा विचारताच, रेणुका चौधरी यांनी माईकसमोर ‘भौ-भौ’ असा कुत्र्याचा आवाज काढून दाखविला आणि म्हटले, "हा कुत्रा काही चावत नव्हता. कारण चावणारे आत (संसदेत) बसले आहेत.” त्यांच्या या विधानामुळे साहजिकच नवा विवाद उत्पन्न झाला. रेणुका यांनी भाजप खासदारांना, किंबहुना सर्वच संसद सदस्यांना ‘चावर्‍या कुत्र्याची’ उपमा दिली, असे म्हणावे लागते. आता त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याचा विचार सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे.
 
रेणुका चौधरी यांच्या नाटकी कृत्यांची यादी मोठी असली, तरी काही अधिवेशनांपूर्वी मोदी यांनी त्यांना एका वायातच नामोहरम केले होते. चौधरी यांनी मोदी यांच्या भाषणादरम्यान मुद्दाम कृत्रिम गडगडाटी हास्य करीत, अडथळे आणण्याचा प्रयत्न चालविला होता. अध्यक्ष ओम बिर्ला हे त्यांना समज देत असताना, मोदी यांनी बोललेल्या एका वायाने चौधरी यांचा सारा नूर क्षणात पालटला. मोदी म्हणाले, "राहू दे बिर्लाजी, ‘रामायणा’नंतर फार काळानंतर हे हास्य कानावर आलं आहे!” टीव्हीवरील ‘रामायण’ मालिकेत ‘त्राटिका’ ही राक्षसी असे गडगडाटी हास्य करताना दाखविली आहे. त्याचा संदर्भ देऊन मोदी यांनी नाव न घेता रेणुका चौधरी यांची तुलना कोणाशी केली, हे सुज्ञांना सांगण्याची गरज नाही.
 
मात्र, कालच्या ‘कुत्रापुराणा’त पुढील गंमत राहुल गांधी यांनी केली. पत्रकारांनी रेणुका चौधरी यांचा किस्सा त्यांना सांगितला आणि त्यांची प्रतिक्रिया विचारली. तेव्हा त्यांनी सांगितले की, "संसदेत केवळ पाळीवांना (प्राण्यांना) प्रवेश आहे, कुत्र्यांना नव्हे.” भाजपचे, तसेच सत्ताधारी खासदार हे मोदी यांचे पाळीव कुत्रे आहेत, असे त्यांनी आपल्या वक्तव्यातून सूचित केले. राहुल गांधी यांच्याकडून यापेक्षा वेगळी प्रतिक्रिया अपेक्षितच नव्हती. कारण मोदी यांना ते अजूनही एकेरी नावाने संबोधतात. तसेच, त्यांच्यावर राहुल गांधी यांची अश्लाघ्य टीकाही सुरूच असते. काँग्रेसचे काही खासदार कालच संसदेत येताना तोंडावर प्राणवायूचे मुखवटे बांधून आले. इमरान मसूद यांनी तर आपल्याबरोबर प्राणवायू भरलेला सिलिंडर आणला होता. दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाच्या निषेधार्थ काँग्रेसच्या खासदारांची ही नाटकबाजी सुरू होती.
 
चालू अधिवेशनात राज्यसभेत बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे स्वागत करताना, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या राजीनाम्याचा उल्लेख केला आणि त्यांच्यासाठी सरकारने रीतसर निरोप समारंभही आयोजित केला नाही, याबद्दल खेद व्यक्त केला; पण धनकड यांनी राजीनामा देण्यापूर्वी याच धनकड यांच्याविरोधात काँग्रेसने अविश्वासाचा प्रस्ताव आणण्याची कारवाई सुरू केली होती. त्यामुळे खर्गे यांना आता धनकड यांच्याबद्दल आलेले प्रेमाचे भरते आणि हा खेद निव्वळ नाटकी आहे, हे उघड होते. तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसदेबाहेर जगदीप धनकड यांच्या हातवार्‍यांची आणि बोलण्याच्या शैलीची नक्कल करून त्यांची टिंगल उडविली होती. तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये बॅनर्जी यांचे हे चाळे तत्परतेने चित्रित करून ठेवले होते. याच बॅनर्जी यांनी ‘वफ बोर्ड’ कायद्यातील सुधारणांसाठी नेमलेल्या ‘संसदीय समिती’त काचेची बाटली फोडून आपला राग व्यक्त केला होता. हा राग आपल्या पक्षाच्या बाजूने मुस्लीम मते राहावीत यासाठी होता, हे सर्वच जाणतात.
 
आता कालच काँग्रेसच्या प्रवक्त्या रागिणी नायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणखी एक डीप फेक व्हिडिओ प्रसृत करून आपल्या कोत्या आणि नीच प्रवृत्तीचे दर्शन घडविले आहे. मोदी हे एका हातात चहाची किटली आणि दुसर्‍या हातात रिकामे कप घेऊन ‘चाय, चाय’ असे ओरडत चालले आहेत, असे या व्हिडिओत दाखविण्यात आले आहे. मोदी यांना काँग्रेसच्या नेत्यांनी नेहमीच ‘चायवाला’ म्हणून हिणविले आहे. २०१४ मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनाबाहेर, "आपण मोदी यांना चहाचा ठेला उघडून देऊ, त्यांनी तेथे चहा विकावा,” हे मणिशंकर अय्यर यांचे विधान प्रसिद्धच आहे. ज्या व्यक्तीने सलग तिसर्‍यांदा जनतेचा मतादेश मिळविला आहे आणि ज्याच्या पक्षाने एकापाठोपाठ एक राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला धूळ चारली आहे, त्या पक्षाच्याच नव्हे; तर देशाच्या सर्वोच्च नेत्याबद्दल इतका हलका व्हिडिओ प्रसारित करून काँग्रेसने आपलीच बेअब्रू करून घेतली आहे.
 
चहा विकणे हा काही लज्जास्पद व्यवसाय नव्हे; पण काँग्रेसच्या दरबारी राजकारणात व्यक्तीच्या कार्याची नव्हे, तर गांधी घराण्याच्या हुजरेगिरीची कदर केली जाते. मोदी यांच्यावर थेट टीका केली, तर भाजपला निवडणुकीत अधिकच फायदा होतो, ही गोष्ट काँग्रेसचे नेते विसरलेले दिसतात. त्यामुळे एकाअर्थी, या व्हिडिओमुळे काँग्रेसने भाजपची मदतच केली आहे. असो.
काँग्रेस असो की, अन्य विरोधी पक्ष; त्यांच्याकडून शुचितेची, सभ्य वर्तन आणि वक्तव्याची अपेक्षा करणे जनतेने सोडून दिले आहे. केवळ, ‘विरोधासाठी विरोध’ हेच या विरोधी पक्षांचे व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना गांभीर्याने घेण्याऐवजी त्यांची नौटंकी पाहून आपली करमणूक करून घेतल्यास लोकांच्या जीवनात तेवढाच विरंगुळा निर्माण होईल.
 
- राहुल बोरगांवकर 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0