कौटुंबिक परिस्थितीमुळे मागील पिढ्यांना शिक्षणाची संधी कमी प्रमाणात मिळाली; पण माणिक गवळी यांनी ठाम निर्धार केला की, आपण शिकायचं आणि याच मातीसाठी काम करायचं. अशा या मावळच्या ग्रामदूताविषयी..
आज मावळच्या ६८ गावांमध्ये माणिक गवळी यांचे नाव खूप आदराने आणि एक भावनाशील व्यक्ती म्हणून घेतले जाते. पण, या गावांपर्यंत जाण्याचा आणि तिथल्या जनजाती बांधवांची सेवा करण्याचा माणिकरावांचा प्रवास एवढा सहज उभा राहिलेला नाही.
मराठवाड्यातल्या धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी तालुयात विजोरा नावाचं एक छोटसं गाव. या छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. मराठवाडा तसाही मागास आणि दुष्काळी भाग असल्याने तेथील शेती बहुतेक कोरडवाहू. अनेक शेतकर्यांचे इतर कोणतेही व्यवसाय नाहीत. त्यामुळे अनेक कुटुंबांसारखी आर्थिक विवंचना गवळी कुटुंबातही कायमच पदरी पडलेली.
कौटुंबिक परिस्थितीमुळे मागील पिढ्यांना शिक्षणाची संधी कमीप्रमाणात मिळाली. पण, माणिक यांनी ठाम निर्धार केलेला की, आपण मात्र शिकायचं आणि मग याच मातीसाठी काम करायचं. लहानपणापासून मातीची छाया लागलेल्या माणिक यांचे बालपण ग्रामीण वातावरणात गेले. घरची परिस्थिती मध्यमवर्गीय असल्याने आणि शेतीआधारित साधी-सरळ जीवनशैली त्यांना अनुभवायला मिळाली. शेतकर्याच्या पोराला शेतीतली सगळी कामे आलीच पाहिजे, अशी त्यांच्या वडिलांची शिकवण होती. त्याचबरोबर, शेतीआधारित उद्योगाने स्वावलंबन आणि स्वतःच्या व्यवसायात पारंगत होण्यासाठी वडिलांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन असे. माणिक यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण विजोरा गावातल्या ‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळे’त झाले.
पुढील दहावीपर्यंतचे शिक्षण गावातल्याच ’विद्याविकास विद्यालया’त झाले. पदवीच्या शिक्षणाला तालुयाचे गाव असणार्या वाशी येथे गेल्यानंतर त्यांना पैशाची गरज भासू लागली. बारावीनंतर अनेकांना घरून पैसे मागणे म्हणजे कमीपणाचे वाटत असते. तिच अवस्था माणिक यांची झाली. त्यावर उपाय म्हणून त्यांनी महाविद्यालयात चालणार्या ‘कमवा व शिका’ या योजनेचा आधार घेत, शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मात्र नोकरी करत का असेना; पण उच्चशिक्षण घ्यायचेच, असा त्यांनी निर्धार केला. त्यानंतर ते ‘एमबीए’ शिक्षण व नोकरीसाठी मुंबई विद्यापीठात दाखल झाले. त्याचदरम्यान अंबरनाथ येथे राहत असताना त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी परिचय झाला आणि तिथूनच त्यांना समाजसेवा म्हणजे काय, याचा परिचय झाला. त्यानंतर, ते संघाच्या अनेक सेवाकार्यात सहभागी व्हायला लागले.
मुंबई विद्यापीठातील ‘एमबीए’चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती विक्रोळीतल्या ‘विवेक विद्यालया’त शिक्षक म्हणून झाली. त्याचदरम्यान, ’intel corporation’च्या ’ intel teach to the future’ या प्रकल्पात त्यांना राज्यप्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी भारतातील, तसेच महाराष्ट्रातील माध्यमिक शिक्षक व प्राचार्य यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांनी लीलया पार पाडली. २००५ ते २०१० या कालावधीत एक लाख दहा हजार शिक्षक व सहा हजार मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्याचा मान त्यांना मिळाला. एवढे होऊनही लहानपणापासून मातीशी जोडलेली नाळ आणि घट्ट नातं त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळेच त्यानंतर ते मुंबईच्या ‘श्री अशोक सिंघल मेमोरिअल ट्रस्ट’तर्फे मावळ तालुयात चालणार्या ‘ग्रामदूत’ प्रकल्पामध्ये कार्यासाठी उतरले. मावळ तालुयातील एकूण ६८ गावे विविध उपक्रम राबवून स्वयंरोजगारित आणि सक्षम व्हावीत, हा या प्रकल्पामागचा उद्देश. प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच सर्व जबाबदारी माणिक यांनीच सांभाळली आहे.
आजघडीला माणिक गवळी ‘ग्रामदूत’ प्रकल्पाअंतर्गत दत्तक घेतलेल्या ६८ गावांमध्ये आरोग्य, शिक्षण, कृषी, स्वावलंबन, सामाजिक संघटन, ग्रामविकास, जलसंधारण, तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित उद्योगनिर्मिती, उपजीविका व पायभूत सुविधा या विविध क्षेत्रांत सातत्याने काम करत आहेत. या भागात सुमारे ८० टक्के जनजाती बांधव वास्तव्यास असून, माणिक हे जनजाती बांधवांच्या वाड्यावस्त्यांवर जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काम करतात. तसेच, अनेक दुर्गम शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा नसल्यामुळे विद्यार्थी स्वतः प्रयोग करू शकत नाहीत. यामुळेच संस्थेच्या ‘फिरती विज्ञान प्रयोगशाळे’चे वाहन रोज दोन दिवसातून एका शाळेला भेट देते. त्यामुळे महिन्यात ११ शाळा पूर्ण केल्या जातात, ज्यामध्ये सहावी ते दहावी वर्गाचे एकूण ९६८ विद्यार्थी सहभाग घेतात.
संस्थेच्या माध्यमातून पिंपरी गावातील जनजाती समाजातील महिला बचतगटांना आर्थिक स्वावलंबी बनविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलून लोणचे उद्योगाला प्रोत्साहन दिले. गेल्या दोन वर्षांपासून अनेक महिला विविध प्रकारची लोणची तयार करून बाजारात विकून महिन्याकाठी आठ ते दहा हजारांपर्यंत व्यक्तिगत उत्पन्न मिळवत आहेत. लोणच्याबरोबरच तूप उद्योग, चिक्की उद्योग उभारून अनेक महिला स्वावलंबी बनत आहेत. ग्रामीण भाग स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यात अग्रेसर असणार्या माणिक यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!