मुंबई : (Fire Aaji) लालबाग–परळ परिसरातील वॉर्ड क्रमांक २०२ हा नेहमीच शिवसेना (उबाठा) गटाचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याच वॉर्डमध्ये उबाठासाठी मोठं आव्हान उभं ठाकलं आहे, तेही विरोधकांमुळे नाही तर पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे. (Fire Aaji)
या वादाचं केंद्रबिंदू ठरल्या आहेत चंद्रभागा शिंदे, सर्वांना परिचित असलेल्या ‘फायर आजी’ (Fire Aaji). वय वाढलं असलं तरी शिवसेनेसाठी लढण्याची त्यांची तळमळ आणि आवाज आजही तितकाच बुलंद आहे. शिवसेनेसाठी आयुष्य झोकून दिलेल्या या ज्येष्ठ कार्यकर्तीने थेट मातोश्रीबाहेर आंदोलन करत उद्धव ठाकरे यांच्यावरच गंभीर आरोप केले. (Fire Aaji)
वादाचं मूळ कारण आहे वॉर्ड क्रमांक २०२ साठी दिलेली उमेदवारी. या वॉर्डमध्ये विजय इंदुलकर यांच्यासह अनेक शाखा प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने काम करत आहेत. आंदोलनं, निवडणुका, रस्त्यावरची लढाई या सगळ्या संघर्षात हे कार्यकर्ते अग्रभागी होते. मात्र उमेदवारी जाहीर करताना त्यांच्या नावांचा विचारही न झाल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. “आम्ही फक्त झेंडे लावण्यासाठी आहोत का?” असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. (Fire Aaji)
उबाठा गटाने वॉर्ड २०२ साठी माजी महापौर श्रद्धा जाधव यांना सलग सातव्यांदा उमेदवारी दिली आहे. मात्र स्थानिक पातळीवर त्यांच्या विरोधात आधीपासूनच नाराजी असल्याचा दावा कार्यकर्ते करत आहेत. एवढंच नव्हे तर, श्रद्धा जाधव स्वतः इच्छुक नव्हत्या, तर त्यांचा मुलगा पवन जाधव यांना तिकीट मिळावे यासाठी हालचाली सुरू होत्या, असा आरोपही केला जात आहे. ते शक्य न झाल्याने अखेर तिकीट आईच्या नावावर देण्यात आल्याची चर्चा आहे. (Fire Aaji)
लोकशाही, पारदर्शकता आणि कार्यकर्त्यांचा सन्मान याची भाषा करणाऱ्या पक्षात घराणेशाहीला प्राधान्य दिलं जात असल्याचा आरोप करत, नेहमी उबाठासाठी ढाल बनून उभी राहणारी ‘फायर आजी’ (Fire Aaji) आता थेट पक्ष नेतृत्वावरच फायर करताना दिसत आहेत. या अंतर्गत बंडामुळे लालबाग–परळच्या बालेकिल्ल्यात उबाठा गटासाठी डोकेदुखी वाढण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. (Fire Aaji)