ढाका : (Khaleda Zia’s funeral) बांगलादेशच्या माजी पंतप्रधान, देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (BNP) प्रमुख बेगम खालिदा झिया यांच्या निधनानंतर बुधवारी (३१ डिसेंबर २०२५) ढाका येथे अंत्यसंस्काराची प्रार्थना कडक सुरक्षेत पार पडली. त्यांच्या निधनाच्या एक दिवसानंतर माणिक मिया अव्हेन्यू येथे ही प्रार्थना करण्यात आली. विविध देशांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. (Khaleda Zia’s funeral)
भारताच्या वतीने परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ढाक्याला भेट देऊन शोक व्यक्त केला. त्यांनी बीएनपीचे कार्यवाहक अध्यक्ष आणि खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांची भेट घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शोकपत्र त्यांना सुपूर्द केले. या भेटीस तारिक रहमान यांची कन्या झैमा रहमानही उपस्थित होती.या भेटीनंतर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितले की, “भारत सरकार आणि जनतेच्या वतीने तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. खालिदा झिया यांचे दृष्टिकोन आणि मूल्ये भारत–बांगलादेश संबंधांच्या विकासाला मार्गदर्शक ठरतील, असा विश्वास व्यक्त केला.” (Khaleda Zia’s funeral)
तारिक रहमान तब्बल १७ वर्षांनंतर अलीकडेच बांगलादेशात परतले असून, आगामी फेब्रुवारीत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांत ते प्रमुख उमेदवार मानले जात आहेत. त्यांनी अलीकडेच बीएनपीची सूत्रे हाती घेतली आहेत.शेख हसीना यांच्या बंडानंतर बांगलादेशला भेट देणारे एस. जयशंकर हे पहिले वरिष्ठ भारतीय अधिकारी ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा राजनैतिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. बांगलादेशातील सद्यस्थिती आणि प्रादेशिक स्थैर्याबाबतही या दौऱ्याकडे लक्ष वेधले जात आहे. (Khaleda Zia’s funeral)
८० वर्षांच्या खालिदा झिया यांचे मंगळवारी (३० डिसेंबर) दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव त्यांच्या दिवंगत पती आणि माजी राष्ट्रपती झियाउर रहमान यांच्या शेजारी दफन करण्यात येणार आहे. झियाउर रहमान यांची १९८१ मध्ये राष्ट्रपतीपदावर असताना हत्या झाली होती.
(Khaleda Zia’s funeral)