नवी दिल्ली : (Nimesulide ban) वेदना आणि तापासाठी वापरल्या जाणाऱ्या निमेसुलाइड औषधाबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुरक्षिततेच्या कारणास्तव १०० मिलीग्रामपेक्षा जास्त डोस असलेल्या निमेसुलाइडच्या सर्व तोंडी (ओरल) फॉर्म्युलेशन्सच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर तात्काळ बंदी जाहीर केली आहे.
देशातील सर्वोच्च वैद्यकीय संशोधन संस्था इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांच्या शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, उच्च डोस असलेल्या निमेसुलाइडमुळे मानवी आरोग्यास गंभीर धोके निर्माण होऊ शकतात. तसेच वेदना व तापासाठी सुरक्षित आणि प्रभावी पर्यायी औषधे उपलब्ध असल्याचेही सरकारने नमूद केले आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, १०० मिलीग्रामपेक्षा जास्त डोस असलेल्या निमेसुलाइडच्या तोंडी औषधांचा वापर केल्यास यकृतासह इतर अवयवांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही बंदी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.दरम्यान, औषध उत्पादक कंपन्यांना या आदेशाचे तात्काळ पालन करण्याचे निर्देश देण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.