मुंबई : ( NSUI Rally ) काँग्रेस पक्षाची विद्यार्थी संघटना असलेल्या नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (NSUI)ने जयपूरमध्ये 'अरावली वाचवा' अशा आशयाच्या रॅलीचे आयोजन केले होते. मात्र या रॅलीत आलेले लोक भाड्याने आणल्याचे समोर आले आहे. रविवारी २८ डिसेंबर रोजी जयपूरच्या सुजानगड येथे संतप्त कामगारांनी पैसे मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरून काँग्रेस विरुद्ध घोषणाबाजी केली. या घटनेवर भारतीय जनता पक्षाने शोषणाचा आरोप केला असून कामगारांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एनएसयूआयने २६ डिसेंबर रोजी जयपूर येथे अरावली येथील झाडे तोडली जाऊ नयेत यासाठी एका रॅलीचे आयोजन केले होते. त्यासाठी जयपूर एनएसयूआय जिल्हाध्यक्ष संजय कटाला यांनी सुजानगडमधील सुमारे २५ कामगारांना रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी वेतन देण्याचे आश्वासन दिले होते. यामध्ये ५०० रुपयांची रोख रक्कम आणि अन्न देण्याचे सांगितले होते.
जिल्हाध्यक्ष संजय कटाला यांनी आश्वासन देऊनही कामगारांना काहीही न दिल्याने संतप्त कामगारांनी रस्त्यावर उतरून काँग्रेसविरुद्ध निषेध व्यक्त केला. याबाबत कामगारांकडून सांगण्यात आले की, त्यांनी वेतन मिळण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार मनोज मेघवाल यांची भेट घेतली, परंतु कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे त्यांना रस्त्यावर उतरण्यास भाग पडले.
हेही वाचा : Smriti Mandir : इस्त्रायलचे महावाणिज्यदूत याविन रेव्हाच यांनी 'स्मृती मंदिरा'स दिली भेट
भाजपकडून टीका
भाजपने या घटनेवर म्हटले आहे की, काँग्रेस पक्ष अरावली प्रदेशाच्या नावाखाली केवळ नाटक करत आहे. पैसे आणि अन्नाचे आश्वासन देऊन कामगारांना रॅलीत आणण्यात आले, परंतु त्यांना काहीही दिले गेले नाही. या घटनेने काँग्रेस पक्षाचे खरे चरित्र आणि खरे स्वरूप उघड झाले. काँग्रेसला फक्त शोषण कसे करायचे एवढेच माहित आहे.