मुंबई : (Khaleda Zia) बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्ष बेगम खालिदा झिया (Khaleda Zia) यांचे मंगळवार दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी ढाक्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. गेल्या वीस दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. १९९१ ते १९९६ आणि २००१ ते २००६ या काळात त्यांनी दोन वेळा बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली. त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. खालिदा यांच्या निधनाची बातमी त्यांच्या बीएनपी पक्षाने एक्स प्लॅटफॉर्मवर अधिकृत पोस्टद्वारे जाहीर केली आहे.(Khaleda Zia)
खालिदा झिया (Khaleda Zia) यांनी काळजीवाहू सरकारची संकल्पना रूजवून देशाच्या लोकशाही प्रक्रियेला नवी दिशा दिली. त्यांच्या निधनामुळे बांगलादेशच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत भारत-बांगलादेश संबंधांमधील त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली. त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव दोन्ही देशांच्या संबंधांवर दीर्घकाळ राहणार आहे. त्यांचे पती झियाउर रहमान बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे आणि अग्रगण्य व्यक्ती होते. ते १९७७ मध्ये बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष होते.(Khaleda Zia)
त्यांचे पुत्र तारिक रहमान हे तब्ब्ल १७ वर्षांनंतर परदेशी वास्तव्यानंतर बांगलादेशात परतले आहेत. त्यांनी परतल्यावर आपल्या पक्षाची सगळी सूत्रे हाती घेतली होती. खालिदा (Khaleda Zia) यांच्या निधनानंतर आता रहमान हेच बीएनपीचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. सध्या ते कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. आगामी काळात बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत. या सगळया पार्श्वभूमीवर खालिदा यांच्या निधनाचा काय निवडणुकांवर काय परिणाम होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.(Khaleda Zia)