‘एका पेक्षा एक’ची स्पर्धक ते अर्चना पाटकरांची सून, खंडणी प्रकरणातील हेमलता नेमकी कोण?

30 Dec 2025 19:06:59

मुंबई : अभिनेत्री हेमलता बाणे-पाटकरची मागच्या २ दिवसांपासून प्रचंड चर्चा आहे. अतिशय धक्कादायक प्रकरणात तिचे नाव समोर आले आहे. गोरेगावमधील एका नामांकित बिल्डरकडून मागितलेल्या १० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या खंडणीचा पहिला हप्ता म्हणून १.५ कोटी रुपये स्वीकारत असतानाच मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर आणि तिच्या एका सहकारी महिलेला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली.

तक्रारदार अरविंद गोयल यांनी असा आरोप केला आहे की, अंबोली पोलीस ठाण्यात त्यांच्या मुलाविरोधात दाखल असलेला गुन्हा मिटवण्यासाठी ही रक्कम मागण्यात आली होती. या घटनेनंतर अभिनेत्री हेमलता पाटकर हे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. पण हेमलता नेमकी आहे तरी कोण?  याशिवाय ती ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून देखील आहे.

हेमलता बाणे सर्वप्रथम टिव्हीवर एका पेक्षा एक या कार्यक्रामतून झळकली होती. या रियालिटी शोने तिला मोठी प्रसिद्धी दिली होती. ती उत्तम नृत्यांगणा आहे. त्यानंतर २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपट ‘लावू का लाठ’ मधून हेमलता विशेष प्रकाशझोतात आली. या चित्रपटात तिने लावणी कलाकार सुरेखा ही मध्यवर्ती भूमिका साकारत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यानंतर अनेक लहानमोठ्या भूमिकांमध्येही ती दिसली होती.

दरम्यान, हेमलताच्या या सगळ्या प्रकरणानंतर आणखी एक माहिती समोर आली आहे. हेमलताच्या सासूबाई म्हणजेच अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी तिच्याविषयी आणखी एक खुलासा केला आहे. तसेच आपला तिच्याशी कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. याविषयी अर्चना यांनी पोस्ट करत लिहिलं आहे,

‘मायबाप प्रेक्षकांना तसंच मीडियाला नमस्कार, मी गेली 40 वर्षे या सिनेसृष्टीत कार्यरत आहे. मी नेहमीच माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं आहे. पण सध्या मीडियाच्या माध्यमातून मला काही बातम्या समजल्या. हेमलता बाणे हिने मागितलेल्या दीड कोटी खंडणीबद्दल चर्चा होतेय आणि त्यात माझं नाव आणि फोटो वापरले जात आहेत. मी तमाम मीडियाला सांगू इच्छिते की माझा मुलगा 4 वर्षांपासून तिच्यापासून विभक्त झाला आहे. कोर्टात त्यांच्या घटस्फोटाचा खटला सुरू आहे. म्हणून मी त्यावर काही टिप्पणी करणार नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही. कृपया माझ्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करू नका’, असं अर्चना यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

नोव्हेंबर महिन्यात अंधेरी पश्चिमेतील एका हॉटेलमध्ये एका नामांकित बिल्डरच्या मुलाच्या साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी लेझर लाइट्सच्या वापरावरून हेमलता पाटकर आणि अमरिना झवेरी यांचा बिल्डरच्या मुलाशी वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक स्वरूपात असलेला हा वाद पुढे इतका चिघळला की त्याचे रूप हाणामारीत झाले.

या घटनेनंतर २३ नोव्हेंबर रोजी दोन्ही महिलांनी संबंधित तरुणाविरोधात पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली. ही तक्रार मागे घेण्यासाठी त्यांनी बिल्डरकडे सुरुवातीला १० कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. नंतर दोन्ही बाजूंमध्ये चर्चा होऊन ही रक्कम ५.५ कोटी रुपयांवर ठरवण्यात आली. मात्र सततच्या दबावामुळे त्रस्त झालेल्या बिल्डरने अखेर मुंबई गुन्हे शाखेकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत खंडणीचा पहिला हप्ता स्वीकारत असताना हेमलता आणि अमरिना यांना रंगेहाथ अटक केली.

दरम्यान, पोलिसांनी न्यायालयात माहिती दिली की हेमलता पाटकर हिच्याविरोधात मेघवाडी पोलीस ठाण्यात यापूर्वीच भारतीय दंड संहितेच्या कलम ४५२, ३२३ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींनी याआधीही अशा स्वरूपाचे गुन्हे केले आहेत का, याची सखोल चौकशी आवश्यक असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितलं. या कारणास्तव न्यायालयाने आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याचा निर्णय घेतला.



Powered By Sangraha 9.0