तरुणाईच्या नीतिमान भविष्यासाठी...

30 Dec 2025 10:31:10
Dr. Nita Mohite
 
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात युवकांच्या उत्थानासाठी काम करणार्‍या पुण्याच्या डॉ. नीता मोहिते यांच्याविषयी...
 
भरधाव वेगात बाईक चालवणे, खोट्या स्वप्नांमागे धावत जिवाची आणि आपल्या घरातल्या कुणाचीही पर्वा न करणे, वाईट संगतीमध्ये नशेच्या अधीन जाणे, अशा एक ना अनेक समस्यांमध्ये युवकांचे भविष्य अंधारून गेले आहे का? डॉ. नीता मोहिते यांना प्रश्न पडत असे. यासाठी काहीतरी करायलाच हवे, असा निश्चय करत त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘युगंधरा’ आणि ‘फतेह-फोर्ट, अ‍ॅडव्हेंचर ट्रेकिंग अ‍ॅण्ड एक्सप्लोरशिन ऑफ हिस्ट्री’ हे उपक्रम सुरू केले. या उपक्रमांच्या माध्यमातून हजारो तरुण-तरुणींना त्या सकारात्मक विचारांची प्रेरणा देतात. इतर कोणतेही छंद जोपासण्यापेक्षा व्यक्तिमत्त्व विकासाद्वारे धर्म, समाज आणि देशाच्या विकास साधणारा छंद जोपासण्याची आवड त्या विद्यार्थ्यांमध्ये रूजवतात.
 
डॉ. नीता मोहिते या त्या पुण्याच्या एका नामांकित महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभाग प्रमुख, तसेच पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य आहेत. ‘क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती’च्या त्या सहकार्यवाहही आहेत, तर ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’च्या ‘भारतीय ज्ञान परंपरा’ विषयाच्या मास्टर ट्रेनर म्हणून त्या काम करतात. ‘सौरऊर्जा’ या विषयावर त्यांनी ‘पीएचडी’ केली असून, दुसरीकडे त्यांनी कायद्याचेही शिक्षण घेतले आहे. सध्या त्या संस्कृतचाही अभ्यास करत आहेत. त्यांचे भौतिकशास्त्र विषयातले आठ संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाले असून, ‘भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयावरचे इंग्रजी आणि मराठी भाषेतले त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे.
 
भौतिकशास्त्र विषयाची त्यांनी चार पाठ्यपुस्तके लिहिली आहेत. ‘भारतीय विज्ञान कन्या’, ‘सृजन यज्ञ’ ही त्यांची दोन प्रकाशित पुस्तके आहेत. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात स्वतःच्या प्रामाणिक कार्याचा ठसा उमटवणार्‍या डॉ. नीता मोहितेंच्या जीवनाचा मागोवा घेऊया. वाईचे शिवाजीराव बाबर आणि सुमनबाई हे मराठा समाजाचे कुटुंब. उभयतांना सात अपत्ये, त्यापैकी सहा मुली आणि एक मुलगा. यांपैकीच एक म्हणजे नीता. शिवाजीराव हे भारत सरकारच्या कस्टम्स, सेंट्रल एक्साईजमध्ये अधीक्षकपदी कार्यरत होते, तर सुमनबाई गृहिणी होत्या. घरचे वातावरण धार्मिक आणि नीतिमत्ता जपणारे होते. सुमनबाई या शिस्तप्रिय होत्या. हाती घेतलेले काम पूर्ण करण्याची शिस्त त्यांनी मुलांमध्ये बाणवली होती.
 
याबाबत एक घटना नमूद करावीशी वाटते. बाबर कुटुंबीयांच्या शेजारी एक आजी राहात होत्या. नजर अंधुक झाल्याने आजींना धार्मिक वाचन जमेनासे झाले. त्यावेळी आजींनी दहा-अकरा वर्षांच्या नीताला विचारले की, "तू अध्याय वाचशील का? अध्याय वाचले नाहीत, तरी ऐकू तर शकते.” नीताने आजींना होकार दिला. दोन-तीन आठवडे नीताचा हा परिपाठ सुरू होता मात्र, एका शनिवारी नीता खेळण्यात मग्न झाली. अध्याय वाचायला आजींकडे जायचे आहे, हेच ती विसरली. खेळून घरी आल्यावर पाहिले, तर शेजारच्या आजी घरात आईबाबांना सांगत होत्या, "आज नीता आली नाही, कुठे गेली?” आईबाबांनी नीताला कारण विचारले. आजी निघून गेल्यावर नीताचे बाबा शिवाजीराव नीताला म्हणाले, "दिलेला शब्द महत्त्वाचा आहे, तो पाळायलाच हवा. आपल्यावर एखादी व्यक्ती विश्वास ठेवते; तो विश्वास मोडायचा नाही.” बाबांचे हे शब्द नीताच्या मनात कायमचे कोरले गेले.
 
त्यांचे शिक्षण ‘हिंगणे स्त्रीशिक्षण संस्था’ आणि ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’मध्ये झाले. या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण, कार्यासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या शिक्षकांचा, तसेच वाईतील मराठी विश्वकोशाचे लक्ष्मणशास्त्री जोशी त्यांच्या पत्नी सत्यवतीबाई जोशी यांसारख्या अनेक दिग्गजांचा, त्यांना जवळून सहवास लाभला. लहानपणी नीता यांना वाटे की, आपण डॉक्टर व्हावे. तशा त्या अभ्यासात हुशारच होत्याच, पण दुर्दैवाने बारावीला काहीच गुणांनी त्यांचा ‘एमबीबीएस’ प्रवेश हुकला. त्यामुळे नीता काहीशा नाराज झाल्या; पण सावरल्याही. त्यानंतर त्यांनी ठरवले की, निराश होऊन थांबण्यापेक्षा पुढे शिक्षण घ्यायचे. त्यानंतर त्यांनी ‘बीएस्सी’, ‘एमएस्सी’ पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे नोकरीसाठी त्या पुणे येथे आल्या. त्यांच्या बाबांची त्यांना भक्कम साथ होतीच. याचदरम्यान त्यांचा विवाह सुरेश मोहिते यांच्याशी झाला.
 
त्यांनीही नीता यांना नेहमीच सगळ्याच प्रसंगांत साथ दिली. यामुळेच विवाहानंतरही नीता यांनी ‘पीएचडी’ पूर्ण केली, ‘एलएलबी’चे शिक्षणही घेतले. युवक आणि युवतींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी काम करण्याचेही त्यांना बळ मिळाले. नीतिमान युवक हेच देशाचे भविष्य घडवू शकतात, या विचारांनी त्यांनी युवकांसाठी प्रेरणादायी उपक्रम सुरू केले. पुण्यामध्ये शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात युवकांसाठी कार्य करणार्‍या डॉ. नीता म्हणतात की, "यापुढेही ‘भगवत् भजन वाढवीत जावे’ या न्यायाने युवकांसाठीचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य कायम करणार आहे.” डॉ. नीता मोहिते यांच्या कार्याला दै. ’मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
 
 
Powered By Sangraha 9.0